Heatwave Impact: उष्णतेच्या दाहला योजनेचा मुलामा

Heat Crisis: वाढत्या उष्णतामानाने पिकांसह शेतकरी-शेतमजूर यांच्यावर फारच प्रतिकूल परिणाम होत आहे. यात प्रामुख्याने ग्रामीण कष्टकरी महिलांची होरपळ वाढली आहे. वाढत्या उष्णतेचा एकंदरीतच दाह कमी करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्यनिहाय ‘उष्णता प्रतिबंध कृती योजना’ तयार करायला हव्यात.
Heat Wave
Heat WaveAgrowon
Published on
Updated on

- प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

Climate Change Impact on Farmers in India: शेती करणाऱ्या आणि खेड्यात राहणाऱ्या भारतीय स्त्रियांच्या दृष्टीने एक जिव्हाळ्याचा मुद्दा म्हणजे उष्णतेच्या लाटेचा परिणाम. वर्ष २०२५ मध्ये उष्णतेची लाट नेहमीपेक्षा लवकर आली, त्याची तीव्रताही अधिक आहे. कोकणात फेब्रुवारीच्या मध्यापासूनच या लाटेचा प्रभाव दिसू लागला आहे. हिवाळ्यातील प्रतिकूल वातावरणाने गव्हासारख्या पिकांवरही परिणाम झाला आहे. संख्येने मोठ्या असलेल्या अल्पभूधारक महिला शेतकरी अशा बदलत्या हवामानाने चिंतेत आहेत. त्यांची तक्रार आहे, की २०२४ मध्ये राज्यभर तापमान अभूतपूर्व पातळीवर वाढले. त्यामुळे हवामान बदलाच्या तीव्र परिणामांना तोंड देण्यासाठी त्या पूर्णपणे तयार नव्हत्या.

एका इंग्रजी साप्ताहिकाच्या अहवालानुसार भारतात ३६५ दिवसांपैकी ३१८ दिवस हवामान अत्यंत प्रतिकूल होते. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. देशाची जवळपास अर्धी लोकसंख्या उपजीविकेसाठी शेतीत काम करते आणि नैसर्गिक पाऊस हा त्यांचा सिंचनाचा मुख्य स्रोत आहे. अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना याचा सर्वाधिक फटका बसतो. स्त्रियांच्या शारीरिक क्षमतेवर व पिकांवर देखील अति उष्णतेचा परिणाम होतो. ‘मनरेगा’मध्ये ४० टक्के स्त्रिया काम करतात. पश्‍चिम राजस्थानमध्ये ४५ अंश सेल्सिअस तापमानात शेतात काम करणे अशक्य होते. अशीच काहीशी परिस्थिती आता विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात दिसून येते.

Heat Wave
Weather Update : राज्यात ८ जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट; तापमानाचा पारा ४५ अंशाच्या पार

‘इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या एका अभ्यासानुसार हवामान बदलामुळे २०५० पर्यंत भारतात गव्हाच्या उत्पादनात १८.६ टक्के, तर तांदळाच्या उत्पादनात १०.८ टक्के घट होईल. शेतीत पुरुषांच्या तुलनेत जवळपास ६० टक्के स्त्रिया काम करतात. पीक कापणीनंतरच्या कामात हे प्रमाण सुमारे ९० टक्के असते. खेड्यातल्या स्त्रियांचा दररोज खूपसा वेळ पाणी आणण्यात जातो.

हीच अवस्था शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या स्त्रियांचीही आहे. या स्त्रियांना पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह अशा मूलभूत सुविधांशिवाय दीर्घ वेळ काम करावे लागते. त्यामुळे थकवा येऊन त्या उष्माघाताला बळी पडतात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत स्त्रिया व बालकांवर उष्णतेच्या लाटांचा अधिक परिणाम झाल्याचे जागतिक बँकेच्या अहवालात नोंदवले आहे. अकाली प्रसूती, मृत बाळ जन्माला येणे असे ते परिणाम आहेत. आशियायी विकास बँकेच्या अहवालानुसार एक अंश तापमान वाढले, तर अकाली जन्माचे प्रमाण ६ टक्के, तर मृत जन्माचे प्रमाण ५ टक्के वाढते. स्त्रियांची कार्यक्षमताही वाढत्या उष्णतामानाने घटत आहे.

Heat Wave
Climate Change India : वातावरणीय बदलांचे जलसंसाधनांवरील परिणाम

अंतर्गत विस्थापन संनियंत्रण केंद्राच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये हवामानाशी संबंधित आपत्तींमुळे विस्थापित झालेल्या लोकांची सर्वाधिक संख्या भारतात होती. सुमारे ५ दशलक्षांहून अधिक लोकांवर याचा परिणाम झाला. यात स्त्रिया आणि मुलींचे प्रमाण अधिक होते. हवामान बदलाचे परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. गंगा नदीच्या खोऱ्यात दुष्काळ, पूर व इतर नैसर्गिक आपत्ती येत आहेत.

परिणामी, या भागात गंभीर आव्हाने उभी राहताहेत. येथील जनतेची उपजीविका नैसर्गिक संसाधनावर अवलंबून आहे. हवामान बदलामुळे २०५० पर्यंत भारतातील मासेमारी १० टक्के कमी होऊन चार कोटी लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, असा अंदाज जागतिक वन्यजीव निधीने वर्तवला आहे. मासेमारी व्यवसायांत स्त्रियांचे प्रमाण लक्षणीय असल्याने त्यांना याचा फटका बसेल. गंगेच्या खोऱ्यात दरवर्षी येणारे प्रचंड पूर म्हणजे मानवी शोकांतिकाच होय.

ग्रामीण महिलांना आणखी एक गंभीर समस्या भेडसावत आहे. कारखाने, बहुमजली घरे आणि रस्ते बांधण्यासाठी विकासकांना मोठ्या प्रमाणात शेतजमीन विकली जात असल्याने, शेतीशी संबंधित रोजगारांतही मोठी घट होत आहे. तसेच शेतीमध्ये यंत्रांच्या वाढत्या वापरामुळे स्त्रियांच्या रोजगार संधी कमी होताहेत. त्यांना बिगरशेती पर्याय शोधावे लागताहेत. बेरोजगारीबरोबरच शेतकरी कुटुंबांमध्ये कर्जाचे प्रमाणही वाढत आहे.

Heat Wave
Skymet Monsoon Predication : यंदा मॉन्सून हंगामात चांगला पाऊस बरसणार; स्कायमेटचा अंदाज

याचाच परिपाक म्हणजे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या! राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार गेल्या दशकभरात एक लाख १२ हजार २०० शेतमजूर-शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. पण ही आकडेवारी खरी वाटत नाही. एकट्या पंजाबमध्येच पाच पट जास्त आत्महत्या झाल्या आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घेतलेल्या कर्जामुळे वाढलेला कर्जबाजारीपणा, हवामान बदलामुळे पडणारा सततचा दुष्काळ ही आत्महत्येची प्रमुख कारणे दिसताहेत.

केंद्र सरकारने प्रत्येक राज्यासाठी उपयुक्त होतील अशा ‘उष्णता प्रतिबंध कृती योजना’ तयार करायला हव्यात. ज्यामुळे उष्णतेच्या प्रतिकूल परिणामांचा सामना पिकांबरोबर शेतकरी, शेतकरी महिला-शेतमजूर यांना करता येईल. जोवर प्रभावी उपाययोजना अमलात येत नाही तोवर शेतात राबणाऱ्या स्त्रियांचा त्रासही थांबणार नाही.

‘उष्णता प्रतिबंध कृती योजना’ कशी असावी?

उष्णतेच्या लाटेची पूर्वसूचना देणारी हवामान खात्याची प्रभावी यंत्रणा हवी.

उष्णतेच्या लाटेबद्दल शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृतीची मोहीम राबवावी.

वाढत्या उष्णतामानात तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती आणि प्रसार करावा लागेल.

पिकांच्या लागवडीच्या व्यवहार्य वेळा ठरवायला हव्यात.

परिणामकारक सिंचन व्यवस्था निर्माण करावी लागेल.

थेट सूर्यप्रकाशापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आच्छादन, शेडची व्यवस्था करावी लागेल.

उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून सर्वत्र स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता झाली पाहिजे.

उष्णतेमुळे उद्‌भविणाऱ्या आजारांबाबत शेतकऱ्यांना अवगत करावे लागेल.

उष्माघातासारख्या आजारांत तत्पर आणि कार्यक्षम वैद्यकीय सुविधा शहरी-ग्रामीण भागात हव्यात.

उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या परिणामांचा (पिकांवर आणि शेतकऱ्यांवर) अभ्यास करावा लागेल.

या उपाय योजनांमुळे पिकांसह शेतकरी कुटुंबांना उष्णतेच्या प्रतिकूल परिणामांचा सामना करता येईल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने हवामान बदलाच्या घातक परिणामांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी सक्षम ‘उष्णता प्रतिबंध कृती योजना’ अमलात आणून लोकांचे उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण केले पाहिजे. तसेच उष्णतेची लाट निर्माण व्हायला कारणीभूत ठरणाऱ्या मानवनिर्मित घटकांचे उच्चाटन करणेही गरजेचे आहे. अशा प्रभावी उपाययोजनांनी शेतकऱ्यांसह शेतात राबणाऱ्या स्त्रियांचा त्रास आणि पिकांच्या उत्पादकतेतील घटही थांबवता येईल,

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com