डॉ. एस. डी. सावंतWeather Impact: एका पाठोपाठ येणाऱ्या प्रभावी पश्चिमी प्रक्षोभामुळे हिमालयामध्ये पाऊस आणि हिमवर्षाव काही दिवसापासून चालूच आहे. याच्याच प्रभावामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प येत असल्याची उपग्रहाने घेतलेली छायाचित्रे वाहिन्यांवर दाखवली जात होती. हवेतील बाष्प भारताच्या मैदानी भागातील उष्णतेमुळे समुद्रसपाटीपासून ८ ते ९ कि.मी. उंचीवर पोचतील. तिथे उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेच्या झोताबरोबर मिसळले जातील. .त्यामुळे भारतातील बऱ्याच ठिकाणी ३० मार्चपासून पुढील काही दिवस होण्याचा गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार ३० व ३१ मार्चला महाराष्ट्रातील द्राक्ष विभागासह बऱ्याच ठिकाणी वादळी पाऊस झाला. या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार हवा आणि विजा चमकत पाऊस झाला. काही ठिकाणी भरपूर गाराही पडल्या. सुदैवाने द्राक्ष बागेचे नुकसान झाल्याच्या बातम्या कालपर्यंत तरी कानावर आलेल्या नाहीत. मात्र गारपिटीसह वादळी पावसाच्या धोक्याचा इशारा शनिवार (ता.४) पर्यंत आहे. .Crop Disease Management: मूग, उडदावरील केवडा रोग व्यवस्थापन.गुरुवारी संध्याकाळपर्यंत हा धोका सांगली, मिरज, विटा, मायनी, फलटण, बारामती या पट्ट्यात आणि नाशिकच्या ईशान्येकडील भागात म्हणजेच निफाड, विंचूर, सटाणा भागात अन्य भागांपेक्षा जास्त दिसत आहे. अशाच पावसाची शक्यता बार्शी, धाराशिव, लातूर या भागातही आहे. शुक्रवार - शनिवारी (ता. ३, ४) ही पावसाची शक्यता कमी होत जाईल. शनिवार व त्यानंतर सर्व द्राक्ष विभागात वातावरण हलके ढगाळ किंवा संपूर्णपणे निरभ्र राहू शकते. या दोन दिवसाच्या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान होणार नाही, अशी अपेक्षा करू. .दोन ते तीन दिवस ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमान कमी होईल व सापेक्ष आर्द्रता वाढेल. परंतु, लगेच वातावरण निरभ्र राहून व हलके वारे वाहण्याची शक्यता असल्याने तापमान पुन्हा पूर्ववत होऊन सापेक्ष आर्द्रताही कमी होईल. विशेषतः द्राक्षे सुकवण्याचे काम होणाऱ्या सांगोला व जवळपासच्या भागात दुपारची सापेक्ष आर्द्रता दोन दिवसातच २० टक्क्यांपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे..येत्या आठवड्यात बऱ्याच बागांमध्ये छाटण्या होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी बागेमध्ये द्राक्षाचा लोड जास्त नव्हता. ऑक्टोबर महिन्यात तापमान खालावल्यामुळे व छाटणीनंतर पावसाचे वातावरण फारसे न राहिल्यामुळे बागेमध्ये करपा व केवडा रोगाचा फारसा प्रादुर्भाव झालाच नाही. त्यामुळे काढणीपर्यंत पाने चांगलीच राहिली आहेत. कदाचित याचमुळे बहुतांशी बागांमध्ये काढणीनंतर ८ ते १० दिवसांतच छाटणीचे नियोजन होत आहे. .छाटणीनंतर येणाऱ्या नवीन फुटी लवकरात लवकर आणि एकसारख्या येणे गरजेचे आहे. नवीन फुटीमध्ये जेवढा एकसारखेपणा असेल, तितकेच पुढील नियोजन सोपे होते. या दृष्टिकोनातून काढणीनंतर बागेवर आलेला ताण कमी करण्यास खताचा एक हलकी मात्रा देऊन हलके पाणी देणे फायद्याचे असते. त्यानंतर सिंचन थांबवून रसायनाचा (इथेफॉन) वापर करून पानगळ करून घ्यावी लागेल. या रसायनाचा परिणाम लवकर व चांगला मिळण्यासाठी पाण्याचा ताण आवश्यक आहे. नवीन फुटी एकसारख्या येण्यासाठी संपूर्ण पानगळ होणे आवश्यक आहे. .पानगळ झालेली नसताना छाटणी केल्यास फुटी लवकर आणि एकसारख्या येण्यास अडथळा होतो व त्यामुळे पुढे सर्व नियोजन एकसारखे करणे शक्य होत नाही. म्हणूनच छाटणीची कितीही घाई असली तरी संपूर्ण पानगळ झाल्याशिवाय छाटणी करू नये. संपूर्ण पानगळ झाल्यानंतर भरपूर पाणी देऊन नंतरच छाटणी घ्यावी. द्राक्ष काढणीनंतर सुचविलेल्या उपाययोजनांचा क्रम काटेकोरपणे पाळावा..Crop Disease Management: एकात्मिक रोग व्यवस्थापनामध्ये ट्रायकोडर्माचे महत्त्व.सध्या पाऊस झाल्यानंतर बागेमध्ये पाण्याचा ताण लगेच शक्य होणार नाही. जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीतील पाणी वाफशापेक्षा कमी पाणी होईपर्यंत २ ते ३ दिवस थांबून नंतरच रसायनाचा वापर करावा. त्यामुळे पाने लवकर गळतील. ९० टक्के पानगळ झाल्यानंतर बागेत पाणी द्यावे व त्यानंतर १-२ दिवसांत छाटणी घ्यावी. आता दिवस वाया चाललेत असे वाटले तरी छाटणीनंतर बाग लवकर व एकसारखे फुटल्यानंतर या कामांचे महत्त्व लक्षात येईल..काही भागात पावसानंतर लगेच तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा वाढून सापेक्ष आर्द्रता २० टक्क्यांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी छाटणीनंतर बागेतील आर्द्रता वाढवणे व ओलांड्याचे तापमान कमी ठेवणे या साठी दुपारी १२ वाजल्यानंतर ओलांड्यावर पाणी फवारणी करावी. सर्वसाधारणपणे दुपारी २ वाजता वातावरणातील तापमान सर्वात जास्त असते. .वातावरणातील सापेक्ष आर्द्रता आणि छाटणीनंतर उघडा पडलेला ओलांडा ५० ते ५५ अंश सेल्सिअसपर्यंत तापल्यामुळे फुटी उशिरा व एकसारख्या येत नाहीत. जास्त गरम वातावरण असल्यास ओलांड्यावरील भाग सुकून त्याचे लाकडांमध्ये रूपांतरणास सुरुवात होते. नवीन फुटी येईपर्यंत दुपारचे तापमान जास्त असल्यास पाण्याची फवारणी करणे शक्य झाल्यास जरूर करावी. काही शेतकरी या फवारणीमध्ये युरिया २ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात मिसळतात..भुरीचा प्रादुर्भावमागील मोसमात ऑक्टोबर छाटणीनंतर अगदी काढणीपर्यंत भुरी रोगाने सातत्याने त्रास दिला आहे. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय द्राक्ष बागांमध्ये भुरी वर्षभर कुठे ना कुठे कार्यरत राहते. थंड प्रदेशामध्ये थंडीच्या दिवसात बागेमधील वेलीसुद्धा सुप्तावस्थेमध्ये जातात. अशा ठिकाणी भुरीसुद्धा मोहरीच्या आकाराच्या ‘कलिस्टोथेसिया’ हे सुप्त अवशेष बनवतात. अशा प्रकारचे अवशेष भारतात बनत नाहीत. आपल्याकडे कोनिडीया नावाचे बीजाणू किंवा भुरीच्या बुरशीचे धागे (MYCELIUM) वेलींवर कार्यरत राहतात..भुरी बागेत वाढू द्यायची नसेल तर त्यांचा वेळोवेळी नायनाट करणे आवश्यक असते. खरड छाटणीनंतर फक्त ओलांडेच उघडे असतात. त्यावर असलेले भुरीचे अवशेष मारणे तुलनेने सोपे असते. त्यामुळे भुरी नियंत्रणासाठी खरड छाटणीनंतर लगेच नवीन फुटी फुटण्याआधी सल्फर (८० डब्ल्युडीजी) २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी निश्चित घ्यावी. या फवारणीने बागेतील भुरीचे अवशेष निश्चितपणे कमी होतील, यात शंका नाही..किडीचा प्रादुर्भावकाही दिवसापूर्वी झालेल्या गरम वातावरण व खालावलेली सापेक्ष आर्द्रता यामुळे बागेत मिली बग (पिठ्या ढेकूण) आणि लाल कोळी या किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. नवीन बागेत री-कट नंतर आलेल्या फुटींवरसुद्धा या किडी दिसत आहेत. छाटणीनंतर त्यांच्या नियंत्रणासाठी बागायतदारांनी ICAR-NRCG च्या ANNEXURE ५ नुसार कीडनाशकांची निवड करावी. ही यादी त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. खरड छाटणीनंतर कीटकनाशकाच्या उर्वरित अंशाचा प्रश्न नसला तरी कोवळ्या फुटींवर द्राक्षावर वापरण्याची शिफारस असलेल्या कीटकनाशकाचाच वापर करणे अपेक्षित आहे. .सध्याच्या परिस्थितीत आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य असलेली कीटकनाशके वापरणे अधिक फायद्याचे होईल. मिली बग आणि लाल कोळी या दोन्ही किडी फुटणाऱ्या डोळ्यांवर व नवीन कोवळ्या फुटींचे नुकसान करतात. दोन्हीसाठी स्पर्शजन्य व आंतरप्रवाही कीटकनाशके उपयोगी आहेत. एक रणनीती म्हणून छाटणीपूर्वी ज्या ज्या वेलींवर प्रादुर्भाव जास्त आहे, तिथे खुणा करून ठेवाव्यात. छाटणीनंतर तेवढ्याच वेलींवर बॅकपॅक स्प्रेअरने फवारणी करून घ्यावी. छाटणीनंतर कॅनोपी नसल्याने ट्रॅक्टरचलित फवारणीयंत्राद्वारे फवारणी केल्यास कीटकनाशक वाया जाते व ओलांड्यावरही व्यवस्थित पोचतेच असे नाही. .उन्हाळ्यामध्ये लाल कोळी ही कीड फक्त पाण्याच्या फवारणीने कमी होऊ शकतो. बऱ्याच वेळा लाल कोळी हा बागेत उडणाऱ्या धुळीमुळेही वाढत असतो. पाण्याच्या फवारणीने पानांवरील धूळ धुवून जाते. मात्र अशा युक्त्या लाल कोळीच्या सुरुवातीच्या अवस्थेतच प्रभावी ठरतात. त्यांची वाढ झाल्यानंतर आंतरप्रवाही कीटकनाशकाशिवाय नियंत्रित होत नाहीत. सध्या झालेल्या पावसामुळे लाल कोळी निश्चितच धुवून गेला असेल. मात्र पुढील अपेक्षित गरम वातावरणात तो पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच कीटकनाशकांची फवारणी आवश्यक आहे. .कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा.पीएचआय, एमआरएल तपासावेत. .पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.- डॉ. एस. डी. सावंत ९३७१००८६४९ (लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे निवृत्त संचालक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.