Sugar Factory : साखर कारखान्यांना सौरऊर्जेची दारे खुली

Sugar Factory solar energy : साखर आयुक्तालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Solar Energy : पुणे ः राज्यातील साखर कारखान्यांना सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे मार्ग खुले झाले आहेत. तसेच, कारखान्यांनी तयार केलेली सौर ऊर्जा आता सहवीजेप्रमाणेच खरेदी केली जाईल, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.

सौरऊर्जा निर्मितीच्या अनुषंगाने साखर कारखान्यांना दिशादायक ठरणाऱ्या मार्गदर्शक सूचना साखर आयुक्त कुणाल खेमनार यांनी नुकत्याच जारी केल्या आहेत. एक मेगावॉटचा प्रकल्प उभारण्यासाठी कारखान्याला साडेतीन एकरांची जागा व अंदाजे चार कोटी रुपयांपर्यंत भांडवल गुंतवावे लागेल. त्यातून १६ लाख युनिट वीज तयार होईल. परंतु, हा खर्च केवळ चार वर्षांत कारखाना वसूल करू शकतो, असे श्री. खेमनार यांचे म्हणणे आहे.

सौरऊर्जा निर्मितीबाबत साखर उद्योगात गेल्या काही वर्षांपासून संभ्रमाचे वातावरण होते. सहवीज प्रकल्प असलेल्या कारखान्यांना सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभे करण्यास महावितरण मान्यता देत नव्हते. तसेच, नेट मिटरिंगची सुविधादेखील ‘महावितरण’कडून दिली जात नव्हती. सहवीज प्रकल्प व सौर प्रकल्प असे दोन्ही उभारल्यास ‘महावितरण’ला वीज नेमकी कशी विकायची, याबाबतदेखील संभ्रम होता. साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, आता सौर प्रकल्पांना महाराष्ट्र राज्य ऊर्जा नियामक आयोगानेच मान्यता दिली आहे. त्यामुळे कारखाने आता बिगर हंगामी कालावधीत नेट मिटरिंगची सुविधा प्राप्त करू शकतील, असा निर्वाळा दिला आहे.

Sugar Factory
Sugar Factory : थकित रकमांच्या पुनर्बांधणीमुळे साखर कारखान्यांना दिलासा

‘भविष्यात हरित हायड्रोजनसाठी कारखान्यांना संधी आहे. त्यासाठी बायोसीएनजी प्रकल्प कारखान्यांना उपयुक्त ठरतील. बायोसीएनजीचे विघटन करून हायड्रोजन इंधन निर्मितीत कारखान्यांना वाव आहे. परंतु, त्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प आधी साकारले गेल्यास कारखान्यांना वर्षभर ऊर्जा मिळू शकते. विशेष म्हणजे सौर प्रकल्पांना पाच मेगावॉटपर्यंत ‘नेट मिटरिंग’चा लाभ मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे,’ असे आयुक्तालयाने मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

सौरऊर्जा प्रकल्पातून तयार झालेल्या विजेची आकारणी कशी करायची याची कार्यपद्धती आता निश्चित झाली आहे. सहवीज व सौर असे दोन्ही प्रकल्प असलेल्या कारखान्यांना वीज खरेदीसाठी दोन स्वतंत्र करार तयार करण्याची आवश्यकता आता नाही. केवळ एका करारातदेखील कारखान्यांची सौरवीज ‘महावितरण’ने खरेदी करावी, असे स्पष्ट आदेश नियामक आयोगाने दिले असल्याचे साखर आयुक्तालयाने नमूद केले आहे.

सौर प्रकल्पांपासूनचे फायदे असे...
- प्राप्तिकर वाचविण्यासाठी सौर प्रकल्प उपयुक्त ठरतील
- एकूण १०० मेगावॉटचे सौर प्रकल्प उभारल्यास कार्बन फूट प्रिंटनुसार २४ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केल्याचे गणले जाणार
- चार वर्षांत प्रकल्प खर्च वसूल होईल व २१ वर्षे ऊर्जा मिळत राहील
- कारखान्यात वाफ व वीज तयार करण्यासाठी सौरऊर्जा उपयुक्त
- सौरऊर्जा विकून अतिरिक्त महसूल मिळू शकेल
- सिंचन व्यवस्था, आसवनी प्रकल्पांसाठी सौरऊर्जेचा वापर शक्य

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com