
Akola News : उद्यानविद्या पिकांची गुणवत्ता, अधिसूचना आणि वाण प्रसारण उपसमितीच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या ३१ व्या बैठकीत येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या संशोधन विभागाने विकसित केलेली हळद व वांगी वाणांना राष्ट्रीय पातळीवर अधिसूचित करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे या वाणांचा प्रसार होण्यास मोठी मदत होईल. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (उद्यानविद्या) प्रा. संजयकुमार सिंह होते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पीडीकेव्ही वायगाव हा हळदीचा वाण तयार केला आहे. त्याला आता प्रसारणासाठी मंजुरी देण्यात आली. मध्यम व निचरा होणाऱ्या जमिनीत, उष्ण दमट वातावरणात ही हळद घेतली जाऊ शकते.
सहा महिन्यांत तयार होणाऱ्या या वाणापासून हेक्टर कमाल ३०० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. स्थानिक वाणांच्या तुलनेत या वाणाची २१ टक्के अधिक उत्पादन क्षमता आहे. कुरकुमीचे प्रमाण ६.२ टक्के एवढे उच्चांकी आहे. हळद पावडर पिवळ्या रंगाची व आकर्षक सुगंधी आहे. महत्त्वाचे म्हणजे पानांवरील ठिपके रोगास प्रतिबंधक आहेत.
वांग्याचा एकेएलबी-९ (AKLB-9) हा वाण सन २०१४ मध्ये प्रसारित झालेला आहे. मध्यम ते भारी जमिनीत खरीप व उन्हाळी अशा दोन्ही हंगामांत लागवडीसाठी योग्य असलेला हा वाण आहे. पाच ते सहा महिन्यांचा कालावधी पिकाला लागतो. हेक्टरी २७५ क्विंटलपर्यंत वांगी मिळू शकतात. बिनकाट्याचे हे वाण असून फळे हिरव्या रंगांची व पांढरे पट्टे असलेली आहेत. फळ व देठ एकमेकांना घट्ट धरून ठेवते. लवकर परिपक्वता होते.
कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी हे वाण विकसित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संशोधकांचे अभिनंदन केले आहे. उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, भाजीपाला शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरविंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनात पीकेव्ही वायगाव हळद वाणाचे ब्रिडर म्हणून प्रा. डॉ. विजय काळे, डॉ. व्ही. एन. दोड, प्रो. डॉ. पी. के. नागरे, सहयोगी प्रा. डॉ. एस. जी. भराड तसेच वांग्याच्या वाणाचे डॉ. व्ही. एस. काळे, डॉ. व्ही. एन. दोड आणि डॉ. डी. एम. पंचभाई यांनी योगदान दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.