Chandrapur News: धान उत्पादनासाठी ओळख असलेल्या नागभीड तालुक्यात शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, पंचनामे, आश्वासने... आणि शेवटी शून्य मदत! पंचनामे होऊनही नुकसानभरपाई न मिळाल्याने तालुक्यातील शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला असून आर्थिक संकटाने संपूर्ण ग्रामीण भाग हादरला आहे..मागील वर्षी मे महिन्यात झालेल्या भीषण गारपिटीने उन्हाळी धान भुईसपाट झाले. जवळपास दोन हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे केले, मदतीची ग्वाही दिली. मात्र महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झाला नाही. त्यानंतर सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पुन्हा अवकाळी पावसाने उभ्या पिकांचे नुकसान केले. त्याचेही पंचनामे झाले; पण मदतीचा पत्ता नाही. तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत शेतकरी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे..Crop Damage Compensation: तांत्रिक अडचणींमुळे अतिवृष्टीचे अनुदान मिळेना.याच दरम्यान आदिवासी विकास महामंडळाकडे धान विकलेल्या शेतकऱ्यांचे १५ ते २० हजार क्विंटलचे चुकारे महिन्यांपासून अडकलेले आहेत. पीक विकूनही पैसे नाहीत, कर्ज फेडण्याची ताकद नाही, पुढील हंगामासाठी भांडवल नाही. अशा स्थितीत शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. या विवंचनेतून गेल्या आठ दिवसांत नागभीड तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नवेगाव हुंडेस्वरी येथील दिवाकर गुरुनुले आणि रामदास मोहुर्ले यांनी नैराश्यातून जीवन संपवले..Crop Damage Compensation: अतिवृष्टीला चार महिने उलटूनही मदत मिळेना!.प्रशासनासाठी ही आकडेवारी असली, मात्र हे सरकारी उदासीनतेमुळे झाले आहे. यातच कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान आणि सौरपंप योजनांचा घोळ कायम आहे. २०१७ च्या कर्जमाफीपासून १२९५ शेतकरी अजूनही वंचित आहेत. नियमित कर्ज भरणाऱ्यांना जाहीर केलेले ५० हजारांचे प्रोत्साहन २८५ शेतकऱ्यांना मिळालेले नाही. दुबार पेरणीसाठी बोअरवेल खोदूनही १४० शेतकऱ्यांना सौरपंप जोडणीच झाली नाही. उन्हाळी धान हातातून जाण्याची भीती आता अधिक गडद झाली आहे..धानाच्या कोठारातच शेतकरी उपाशी, कर्जबाजारी आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. पंचनामे, चुकारे आणि योजना यांची कागदावरची यादी मोठी; प्रत्यक्ष मदत मात्र शून्य. आता तरी शासन आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का? हा प्रश्न नागभीडचा शेतकरी संतापाने विचारत आहे..शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर होतात, निधी मंजूर होतो; पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचत नाही. निधी जाहीर होतो, पण जातो कुठे? हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. शेतकरी स्वतः मालक असून गुलामासारखा जगतो. धानाला भाव नाही, नुकसानभरपाई वेळेवर नाही. निर्णय घेतले जातात, पण अंमलबजावणी होत नाही. ही शासनाची शोकांतिका आहे.- दिनेश गावंडे, स्वीकृत नगरसेवक, नागभीड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.