महेश शेटकार, डॉ. स्वप्नजा मोहिते
Fish Farming : पाकू हा दक्षिण अमेरिकेतील गोड्या पाण्यातील मासा आहे. या माशाचे शास्त्रीय नाव पियरॅक्टस ब्रॅचिपोमस. काही ठिकाणी हा मासा रूपचंद म्हणून ओळखला जातो. २०१२ पासून हा मासा आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात आढळल्याच्या नोंदी आहेत. हा मासा तेलंगणा राज्यातील कृष्णा आणि गोदावरी या नद्यांमध्ये देखील आढळून आला आहे.
कदाचित हा अवैधरीत्या आपल्याकडे हा मासा आणला गेला असावा आणि त्याची मत्स्यशेती अवैधरीत्या करताना यातील काही मासे तलावातून सुटून नद्यांमध्ये वाढू लागल्याचा अंदाज आहे. पाकू मासा शाकाहारी असला तरी, त्याचे खाद्य न मिळाल्यास तो मांसाहारी बनून इतर मासे आणि जलचर खातो असे आढळून आले आहे. त्याच्या रंगामुळे हा शोभिवंत मासा म्हणून लोकप्रिय होत आहे.
याचे शरीर हे खाऱ्या पाण्यातील हलवा माशासारखा दिसते, म्हणून यास गोड्या पाण्यातील हलवा असे म्हणतात. हा मासा त्याच्या विविध गुणवैशिष्ट्यांमुळे, जसे की वेगाने वाढणे, प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणे, सर्वभक्षी असल्याने मत्स्य संवर्धनाकरिता प्रसिद्ध झाला आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे, की या माशाच्या चवीची संकरित स्ट्रिप्ड बास, टिलापिया म्हणजे चिलापी आणि रेनबो ट्राउटच्या यांच्याशी तुलना केली जाते. कॅटफिशपेक्षा या माशाची चव चांगली आहे असे सांगितले जाते.
शरीर रचना
हा मासा गडद राखाडी, फिकट काळ्या रंगाचा ‘काळा पाकू’ आणि लाल रंगाचे पोट असणारा ‘लाल पाकू’ अशा वेगवेगळ्या रंगात आढळतो.
मासा ३ फूट लांब व २५ किलो वजनाचा होतो. अनुकूल परिस्थितीमध्ये ४० किलो इतका वाढू शकतो.
जबडा मजबूत व अगदी माणसासारखे दिसणारे दात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
पाकू आणि पिऱ्हाना हे शरीराने दिसायला सारखेच असतात, म्हणून ओळखण्यात गडबड होते. पिऱ्हाना हा मासा मांसाहारी आहे. पिऱ्हाना माशाचे दात वस्तऱ्यासारखे धारदार आणि टोकदार असतात. पाकू माशाचे दात सरळ कडा असलेले काहीसे चौकोनी असतात.
आहार
पाकू हा सर्वभक्षी मासा आहे. बोटुकली अवस्थेत तो प्लवंगावरती निर्भर असतो. मत्स्य बीज, कीडे, कुजलेल्या पाण वनस्पती, लहान मासे, कवचधारी प्राणी इत्यादी त्याचे प्रमुख अन्न आहे.
प्रतिकूल काळात हा मासा, प्राणिजन्य किंवा वनस्पतिजन्य खाद्य खाण्यास पसंती देतो. काही वेळेस खाद्य उपलब्ध न झाल्यास हा मासा मनुष्यावर हल्ला करतो, म्हणून त्याला बॉल कटर असे म्हणतात.
प्रजनन
हा मासा नोव्हेंबर ते मार्च या काळात प्रजनन करतो. प्रजननासाठी २७ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते.
अनुकूल परिस्थितीत एक किलो वजनाचा मासा एक लाख अंडी देतो. पिलांच्या वाढीस लागणारे पोषक वातावरण जिथे असेल त्याच ठिकाणी हा मासा अंडी घालतो.
समस्या आणि उपाययोजना
हा मासा नदी, डबके, तलावात दिसू लागल्याने तेथील देशी माशांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या माशाच्या खाद्यप्रणालीमुळे तेथील नैसर्गिक जैवविविधता नष्ट होत चालली आहे. काही ठिकाणी सुसर, मगरी चे वास्तव्य नष्ट होताना दिसत आहे.
हा मासा अधाशी असल्यामुळे इतर देशी माशांसोबत अन्नासाठी प्रतिस्पर्धी बनला आहे, अन्नसाखळी वारंवार बदल घडत आहेत.
देशी माशांच्या जातीमध्ये पाकू माशामुळे आजाराचा प्रसार होत आहे. त्यामुळे पाकू मस्त्यसंवर्धनासाठी कडक नियमावली तयार करावी. जैविविधतेवर होणारे परिणाम या विषयावर जनजागृतीची गरज आहे.
माशाच्या योग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने संवर्धन तलाव आणि हॅचरीची तातडीने नोंदणी आवश्यक आहे.
मत्स्यपालनाची पद्धत
विदेशात सुरुवातीच्या काळात मातीच्या तलावात याचे संगोपन केले जात असे. अलीकडे मोठ्या प्रमाणात पिंजरा पद्धत किंवा प्लॅस्टिक आच्छादन असणारे तळे निर्माण करून मत्स्यशेती केली जाते.
भारतात लाल पोटाचा पाकू मासा पश्चिम बंगालमध्ये शोभिवंत मासा म्हणून आणला गेला आणि त्याच्या वाढीच्या उच्च दरामुळे शेतकऱ्यांनी २००३ पासून तो खाण्यासाठी उपयुक्त म्हणून संवर्धन सुरू केले. आजमितीस आंध्र प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगाल राज्यात २५०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र या माशाच्या संवर्धनाखाली आहे. मत्स्यसंवर्धनातून एका वर्षात १.२ किलो वजनाचा मासा तयार होतो.
भारतीय प्रमुख कार्प माशांच्या तुलनेत जलद वाढीचा दर आणि संवर्धनाचा कमी कालावधी यामुळे भारतातील मत्स्यशेतीसाठी पाकू मासा एक संभाव्य प्रजाती म्हणून विकसित झाली आहे. कार्प माशांच्या पॉलिकल्चर पद्धतीमध्ये पाकू माशामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, असे आढळून आले आहे.
हा मासा वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक देशात गेला. काही देशात स्थानिक लोकांच्या आहारात त्याचा समावेश केला गेला. त्याचा आकार, जास्त तापमानात तग धरून राहण्याच्या प्रवृत्तीमुळे, हा मासा ज्या देशात अन्नाचा तुटवडा किंवा महाग असेल तिथे लोकप्रिय होत आहे. सध्या अलंकारिक मासा, शाकाहारी पिऱ्हाना म्हणून नावारूपास आला आहे.
नैसर्गिक वातावरण तयार करून शोभिवंत मत्स्यपालनासाठी या माशाला पसंती मिळाली आहे.
- डॉ. स्वप्नजा मोहिते, ९५४५०३०६४२
(मत्स्य जीवशास्त्र विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.