Ajwain Crop: सोयाबीन, कपाशी, तूर ही खरिपातील मुख्य पिके आहेत त्या पाठोपाठ येणाऱ्या रब्बी हंगामात हरभरा, गहू आणि इतर पिके घेतली जातात. पण तीच ती पिके एकाच जमिनीवर वारंवार घेतल्याने जमिनीचा कस कमी होतो आणि जमिनीची उत्पादन क्षमता सुद्धा कमी होते. त्यामुळे पीक पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे.
पीक पद्धतीत फेरबदल करण्यासाठी कमी लागवड खर्च आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळवून देणाऱ्या पिकांची निवड केली पाहिजे. या पिकांमध्ये मसाला वर्गीय पिकांचा पर्याय पुढे येतो. महाराष्ट्रात रब्बी हंगामात घेता येतील अशी कोणती मसाला पिके आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
यामध्ये बडीसोप, काळेजिरे म्हणजे कलौंजी, धने, कसुरी मेथी आणि ओवा यासारख्या पिकांचा समावेश होतो. यापैकी ओवा या मसाला पिकाची माहिती घेऊया.
भारतात ओवा पिकाची लागवड प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थान या राज्यात होते. पण आता महाराष्ट्रातही छत्रपती संभाजीनगर आणि विदर्भात ओवा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जातेय.
मसाल्यांमध्ये ओव्याचा खूप कमी प्रमाणात वापर होत असला तरी औषधी गुणधर्मामुळे ओव्याचा उपयोग औषध म्हणून जास्त प्रमाणात होतो. ओवा हा पाचक असल्यामुळे अपचन, कफ, दमा या यासारख्या विकारांमध्ये खूप उपयुक्त आहे. त्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये ओव्याची मागणी जास्त आहे.
लागवड तंत्र
विगवेगळ्या विभागातील परिस्थितीनूसार या पिकाची पेरणी सप्टेंबर ते ऑक्टोबर पर्यंत करता येते. ओलिताची जर सोय असेल तर ओव्याची पेरणी ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील करतात.लेट खरिपासाठीही ओवा पीक उत्तम पर्याय ठरतो.
फक्त बियाणे तयार होताना वातावरण कोरड आणि पाऊस नसेल अशा प्रकारे आपल्याला ओव्याची पेरणी करायची आहे. हे पीक १५० ते १६० दिवसात तयार होत. या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी वाळुयुक्त जमीन निवडा. पेरणीसाठी हेक्टरी अडीच ते पाच किलो बियाण लागत. पेरणी करताना बियाणे वाळूत मिसळून पेरणी करावी लागते.
पेरताना दोन ओळीतील अंतर ४५ ते ६० सेंटीमीटर ठेवून पेरणी करावी. बियाणे अडीच ते ३ सेंटीमिटर पेक्षा जास्त खोलीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. ओलीताखाली ओवा लागवडीकरिता सरी वरंबा पद्धतीचे ३ बाय २ मीटर लांबी रुंदीचे वाफे तयार करुन घ्यावे. त्यामध्ये ३० ते ४० सेंटीमीटर अंतरावर वरंब्यावर मधोमध बी टोकुन पेरावे.
बियाणे कुठे मिळेल?
ओव्याच बियाण तुम्हाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात मिळेल. विद्यापीठाने ओव्याच ए ए- १-१९ हे वाण महाराष्ट्रासाठी विकसीत केल आहे. याशिवाय ओव्याच्या काही गावरान जातींचीही पेरणी तुम्ही करु शकता. कारण ओव्याच्या गावराण जातींनाही मार्केटमध्ये चांगला भाव मिळतो.
ओव्याच्या लाम सिलेकन, आर-ए-१-८० आणि एए-०१-१९ हे वाण उपलब्ध आहेत. हे सर्व वाण आयसीएआऱ अंतर्गत असलेल्या राजस्थान राज्यातील ताबीजी अजमेर याठिकाणी उपलब्ध आहेत. याशिवाय ड़ॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्येही तुम्हाला ओव्याचं बियाणं मिळू शकेल.
ओवा पिकावर कीड, रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. पण मावा कीड आणि भुरी हा रोग येण्याची शक्यता असते. त्यावर योग्यवेळी उपाय केले तर सहजपणे नियंत्रण होतं.कोरडवाहू पीक पद्धतीत जमनीनूसार पाणी देण्याच नियोजन करावं.
फुलोराअवस्थेत म्हणजे लागवडीपासून ७० ते ८५ दिवसापर्यंत एक संरक्षित पाणी दिल्यास उत्पादन वाढण्यास मदत मिळते. ओवा पीक साधारणपने १६० ते १८० दिवसात तयार होते. फुलांचा किंवा बोंडाचा रंग तपकिरी व्हायला सुरुवात झाल्यानंतर बिया तयार झाल्या असं समजावं.
जमिनीपासून ४० सेंटीमीटर अंतर ठेवून झाडं कापावीत आणि त्यांच्या पेंढ्या बांधाव्यात. योग्य काळजी घेऊन ओव्याची लागवड केल्यास बागायतीमध्ये ओव्याचं हेक्टरी १० ते १२ क्विंटल उत्पादन मिळत तर कोरडवाहू मध्ये हेक्टरी ६ ते ८ क्विंटल उत्पादन मिळत. काढणीनंतर ओवा जास्त काळ साठवून ठेवता येतो आणि साठवणीत कीडही लागत नाही.
मार्केट कुठे आहे? आणि भाव काय मिळतो?
ओव्याची तुम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासुर स्टेशन येथील बाजारात विक्री करु शकता. शेगाव, नंदूरबार या ठिकाणीही ओव्याच मार्केट आहे. याशिवाय आपल्या भागातील आठवडे बाजारातही तुम्ही ओव्याची विक्री करु शकता.
ओव्याची जर स्वच्छता, प्रतवारी यासह आकर्षक पॅकिंग केल्यास उत्तम ब्रँड तयार होऊ शकतो. या पिकावर आधारीत एखाद्या प्रक्रिया उद्योगाची उभारणी शक्य झाल्यास जास्त दर मिळू शकेल. ओव्याला प्रतवारीनूसार क्विंटल ला १० ते १२ हजार रुपये भाव मिळतो.
बेकरी इंडस्ट्री, वाइन इंडस्ट्री, मसाला उद्योग आणि आयुर्वेदिक क्षेत्रात भारतात आणि भारताबाहेर ओव्याला मागणी वाढतेय. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामासाठी ओवा पिकाचा नक्की विचार करा.
माहिती आणि संशोधन - डॉ. श्याम घावडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.