Parali News : परळी वैजनाथ येथे २१ तारखेपासून राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा सोमवारी (ता. २६) समारोप झाला.
परळी वैजनाथ येथील स्व. पंडितअण्णा मुंडे सभा मंडपात हा राज्यस्तरीय प्रदर्शन व महोत्सव एकत्रितपणे आयोजित करण्यात आले होते. सोबतच पशुपालन प्रदर्शनदेखील स्वतंत्रपणे आयोजित करण्यात आले होते. सहा दिवस चाललेल्या या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साडेचार लाखांवर लोकांनी या महोत्सवास भेट दिली. तर साधारण ३ कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल या महोत्सवाच्या निमित्ताने झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
समारोप समारंभास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी मिश्रा तर प्रमुख उपस्थितांमध्ये बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी संगितादेवी पाटील, संचालक आत्मा अशोक किरनळी, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे व साहेबराव दिवेकर, संचालक डॉ. आसेवार आदी मान्यवरांचा समावेश होता.
या वेळी भारुडकार गोविंद महाराज आळंदीकर यांच्या प्रबोधनपर भारूडाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. तुकाराम मोटे यांनी केले. सूत्रसंचालन गोरख तारै, मंजुश्री कवडे यांनी तर आभार सुभाष साळवे यांनी मानले. शेतकरी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधारणपणे ४३४ स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले होते.
या व्यतिरिक्त महिला बचत गट यांचे वेगळे प्रदर्शन या ठिकाणी झाले. या ठिकाणी रानभाज्या तसेच धान्य महोत्सव आदींचेही स्टॉल लावण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनानुसार या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेती तंत्राची माहिती देण्यासाठी तांत्रिक स्वरूपाचे परिसंवाद व माहिती सत्र आयोजित करण्यात आले. शक्ती तंत्रापासून अगदी ड्रोनद्वारे फवारणी करण्यापर्यंत तसेच शेततळे व इतर नवीन साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या पथकांनी भेटी दिल्या. तसेच काही पथके धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी व नांदेड येथून देखील प्रदर्शन बघण्यासाठी आली होती. या ठिकाणी एकूण ४३४ दालने मांडण्यात आली होती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.