
आश्विनी कुलकर्णी, संदीप पटनायक, शिरीष जोशी
शास्त्रीय संगीतामध्ये जशी घराणी असतात तशीच नैसर्गिक शेतीमध्येही असतात. नैसर्गिक शेती, शाश्वत शेती, सेंद्रिय शेती अशा विविध नावांनी ही शेती संबोधली जाते. या लेखामध्ये हे विविध शब्द एकमेकांना पर्यायी म्हणून वापरले आहेत. जनुकीय तंत्रज्ञान वापरून तयार केलेले बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा वापर न करता केलेली शेती अशी नैसर्गिक शेतीची व्याख्या या लेखात अपेक्षित आहे.
गेल्या काही वर्षांत शाश्वत शेतीच्या महत्त्वावर खूप चर्चा झाली आहे. एकीकडे सिक्कीम हे पूर्णपणे सेंद्रिय शेती राज्य बनले आहे, तर दुसरीकडे श्रीलंकेमध्ये सेंद्रिय शेतीमुळे आर्थिक संकट कोसळले असे म्हटले जाते. रासायनिक शेतीचा अन्नसुरक्षा आणि पर्यावरणावर होणारा परिणाम या दृष्टिकोनातून हा विषय खूप महत्त्वाचा आहे.
या प्रश्नाचा ग्राहक आणि शेतकरी अशा दोन बाजूंनी विचार करता येऊ शकेल. हा लेख सेंद्रिय शेती पद्धतीने पिकवलेले अन्न लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे, ते कसे स्वस्त करायचे आणि लोकांना ते कसे आवडेल, याबद्दल आहे. पुढील लेखात शेतकऱ्यांच्या बाजूने यासंबंधीची मांडणी केली जाईल.
सेंद्रिय शेती करणारे लोक म्हणतात, की सेंद्रिय शेती करणे शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आहे आणि त्यातून रासायनिक शेती इतकेच उत्पन्न मिळते. तसेच ते आरोग्यासाठी चांगले असते आणि त्याची चवही चांगली असते. हे खरे असेल, तर सेंद्रिय शेती आतापर्यंत सगळ्या जगात पसरायला पाहिजे होती. पण भारतातील अन्नाच्या बाजारपेठेत सेंद्रिय अन्नाचा वाटा २ टक्क्यांपेक्षा कमी आहे. डेन्मार्कमध्ये सेंद्रिय अन्नाचा वाटा १३ टक्के आहे, पण तुलनेने तो ही खूप कमी आहे.
स्टोअरमध्ये मिळणाऱ्या ब्रॅण्डेड वस्तू, जसे की डाळ, तांदूळ, गहू आणि इतर शेतीमाल, ज्याच्या उत्पादनासाठी रासायनिक खते व कीटकनाशके वापरलेली असतात, त्याच्याशी सेंद्रिय शेतीमालाची तुलना केली तर सेंद्रिय उत्पादने साधारणपणे ५० टक्के जास्त महाग असतात. भाज्यांसारख्या नाशवंत शेतीमालाच्या बाबतीत हा फरक १०० टक्क्यांपेक्षा जास्त असतो.
शेतकऱ्यांच्या मते सेंद्रिय शेतीमध्ये जास्त माणसांची गरज असते, त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. सेंद्रिय शेतीमध्ये पिकांना रोग आणि किडीपासून वाचविण्यासाठी आधीपासूनच प्रतिबंधक उपाय करावे लागतात, त्यामुळे या शेतीत जास्त लक्ष द्यावे लागते. रासायनिक शेतीतून सेंद्रिय शेतीकडे वळताना आणखी अडचणी येतात.
(सेंद्रिय शेतीत रासायनिक शेतीइतकेच उत्पन्न मिळते की नाही, यावर खूप वाद आहेत.) स्वतंत्र साठवण व्यवस्था आणि वाहतूक खर्चामुळे सेंद्रिय उत्पादनांचा खर्च आणखी वाढतो. प्रमाणीकरणाचा खर्चही असतोच. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट अशी आहे, की सेंद्रिय उत्पादने सध्या कमी असल्यामुळे रासायनिक खतांनी पिकविलेल्या उत्पादनांप्रमाणे त्यांच्या भावात तितके चढ-उतार होत नाहीत.
सेंद्रिय उत्पादनांचा खप वाढविण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय करणे शक्य आहे ः
1. जागरूकता वाढवणे
सेंद्रिय अन्नाच्या बाजारपेठेचा आकार वाढवणे शक्य आहे. सध्या प्रामुख्याने सेंद्रिय अन्नावर निष्ठा असलेले ग्राहक, ज्यांना स्वतःचे आणि जगाचे कल्याण हवे आहे, असे ध्येयवादी लोक सेंद्रिय अन्न खरेदी करतात. उपलब्ध प्रकाशित साहित्यात असे दिसते, की रासायनिक कीटकनाशक मुक्त अन्न खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे सिद्ध करता येऊ शकतात. कीटकनाशक मुक्त अन्नाच्या प्रोत्साहनासाठी मोहीम चालवणे शक्य आहे.
ही मोहीम राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या (NECC) यशस्वी जाहिरात मोहिमेच्या धर्तीवर असू शकते. अशा मोहिमा केवळ श्रीमंत ग्राहकांनाच आकर्षित करत नाहीत, तर स्तन्यपान देणाऱ्या माता, लहान मुलं, मधुमेहासारख्या जीवनशैली रोगांना बळी पडलेल्या लोकांनाही आकर्षित करू शकतात. विपणन तज्ञांच्या मते सेंद्रिय शेतीतील उत्कृष्ट उत्पादनांना १५ टक्के बाजारपेठ हिस्सा मिळू शकतो (हे डेन्मार्कमधील सेंद्रिय अन्नाच्या १३ टक्के वाट्यासारखे आहे).
रासायनिक कीटकनाशकांचा मानवी आरोग्यावर होणारा वाईट परिणाम रासायनिक खतांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांपेक्षा अधिक स्पष्टपणे सिद्ध झाला आहे. त्यामुळे ग्राहक मोहिमांमध्ये ‘विषमुक्त अन्न’ हा मुख्य संदेश असावा. पर्यावरण संरक्षण, शाश्वत शेती यासारखे व्यापक संदेश ग्राहकांवर प्रभाव टाकणार नाहीत.
2. सेंद्रिय शेतीसाठी अनुदान आणि पायाभूत सुविधा
सेंद्रिय शेतीचे चार फायदे आहेत :
- ग्राहकांना विषमुक्त अन्नाचा फायदा होतो आणि ते त्यासाठी पैसे देण्यास तयार असतात.
- मातीची गुणवत्ता सुधारणे, स्थानिक ज्ञानाचा वापर, महिला शेतकऱ्यांच्या ज्ञानाचा वापर, पाणी, हिरवा चारा यासारख्या नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर सेंद्रिय शेतीमध्ये होतो.
- समाजाला चांगले पर्यावरणीय परिणाम मिळतात.
- देशाला रासायनिक खतांवरील अनुदान कमी करता येते आणि विदेशी चलनाची बचत करणे शक्य होते.
परंतु हे फायदे असूनदेखील सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळत नाही. देशातील रासायनिक खतांना अनुदान दिले जाते. मोफत/अनुदानित वीज यामुळे पाण्याच्या गैरवापराला प्रोत्साहन मिळते.
या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी पुढील तीन मार्गांपैकी एका मार्गाचा अवलंब करावा लागेल.
- सध्या खत कंपन्यांना अनुदान दिले जाते. त्याऐवजी, घरातील महिलेच्या नावे असलेल्या बॅंक खात्यात शेतकऱ्यांना खताचे रोख अनुदान दिले जाऊ शकते. (भले ती स्त्री जमीन मालक असो वा नसो.)
- दुसरा पर्याय म्हणजे, बिगर -रासायनिक निविष्ठा इत्यादींसाठी महिलेच्या नावे अनुदान दिले जाऊ शकते. अशा प्रकारच्या योजना देशात आधीपासून राबविण्यात आलेल्या आहेत. यामुळे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होणारा तोटा कमी करता येऊ शकतो.
- तिसरा पर्याय म्हणजे, रासायनिक खते आणि मोफत/सवलतीची वीज यावरील अनुदान टप्प्याटप्प्याने रद्द करणे.
प्रत्येक मार्गाचे फायदे आणि तोटे आहेत आणि त्यासंदर्भात विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. आमच्या अहवालात आम्ही खत आणि विजेचे अनुदान टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा युक्तिवाद केला आहे. हा निर्णय टप्प्याटप्प्याने, सहभागी पद्धतीने अमलात आणावा लागेल जेणेकरून सेंद्रिय शेतीकडे सुलभ संक्रमण होऊ शकेल. अर्थात, त्यासाठी खूप मोठी राजकीय इच्छाशक्ती आणि एकमत निर्माण करणे आवश्यक आहे. रासायनिक शेतीतील अनुदाने कमी झाली तर साहजिकच त्यांचे भाव वाढतील आणि त्यामुळे रासायनिक आणि सेंद्रिय वस्तूंच्या भावात आज असलेले अंतर कमी होईल.
3. शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन
सेंद्रिय शेतीमुळे ग्राहकांच्या आरोग्याला होणारे फायदे याबरोबरच पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणाम हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. वाढत्या प्रदूषणाच्या समस्येवर सेंद्रिय शेती हा एक उपाय ठरू शकतो. त्यामुळे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक प्रोत्साहन मिळायला हवे. आणि त्यासाठीचा निधी प्रदूषण करणाऱ्या व्यक्ती/कंपन्यांकडून भरपाई म्हणून घेतला पाहिजे. त्यासाठी कार्बन क्रेडिट बाजारपेठेची यंत्रणा आहे.
या व्यवस्थेत प्रदूषण करणाऱ्या कंपन्या सेंद्रिय शेती करून पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या शेतकऱ्यांकडून कार्बन क्रेडिट खरेदी करू शकतात. आणि त्याद्वारे ते कंपन्यांच्या पर्यावरणावरील नकारात्मक प्रभावाची अंशतः भरपाई करू शकतात. कार्बन क्रेडिट पर्यावरणीय संकटावर मात करण्यासाठी प्रभावी यंत्रणा आहे की नाही हा चर्चेचा मुद्दा आहे. पण हे पैसे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना खर्च कमी करण्यास मदत करू शकतात.
अर्थात, कार्बन क्रेडिट शेतकऱ्यांसाठी पूर्ण उत्तर नाही कार्बन क्रेडिटचे प्रमाणीकरण (सर्टिफिकेशन) करण्यात आणि त्याची विक्री करण्यात गुंतलेले मध्यस्थ कार्बन क्रेडिट बाजारपेठेतून शेतकऱ्यांपेक्षा अधिक फायदा मिळवतात. या अपरिपूर्ण (imperfect) बाजारपेठेचे एक मुख्य कारण म्हणजे माहितीची विषमता. व्यापाराच्या युक्त्या माहीत असलेल्या मध्यस्थांशी स्पर्धा करण्याची शेतकऱ्यांना संधी खूप कमी असते.
कार्बन क्रेडिटच्या बाजारपेठेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करू शकतील आणि त्यांना कार्बन क्रेडिट बाजारपेठेतून त्यांचे देय मिळवण्यास सक्षम करू शकतील अशा यंत्रणा निर्माण होणे गरजेचे आहे. सरकारने कार्बन क्रेडिट बाजारपेठेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे; जेणेकरून शेतकरी त्यांच्या स्वातंत्र्याचा त्याग न करता कार्बन क्रेडिट मार्केटचा जास्तीत जास्त लाभ मिळवू शकतील. वरीलपैकी अनेक उपाय हे वादग्रस्त ठरू शकतात. तिथे जाण्यासाठी काय टप्पे असू शकतात याची मांडणी पुढील लेखात केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.