Nagpur News : बांगलादेश सरकारकडून आयात शुल्कात प्रती किलो ८६ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम नागपुरी संत्र्याच्या निर्यातीवर झाल्याचा दावा करीत हा माल देशाअंतर्गत मोठ्या शहरांमध्येच विकावा लागत आहे. परिणामी यंदा संत्रा फळांचे दर दबावात राहतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
कृषी विभागाने मात्र बुरशीजन्य रोगांच्या परिणामी गळती झाल्याने माल कमी असल्याने बाजार तेजीत राहतील, असा अंदाज वर्तविला आहे. सध्या कळमना बाजारासह इतर खासगी बाजारामध्ये संत्र्याला २००० ते २२०० असा दर मिळत आहे.
नागपूर बाजार समितीत होणारी आवक गेल्या आठवड्यात एकाच दिवशी १००० क्विंटल होती. या आठवड्यात ती ३०० क्विंटलपर्यंत खाली आली आहे. कळमना बाजाराचा विचार करता मोठ्या आकाराच्या फळांना २००० ते २२००, मध्यम १५०० ते २००० आणि लहान आकाराच्या फळांना १००० ते १२०० रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. हा दर तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. वरुड, मोर्शी परिसरात खासगी बाजारातून देखील संत्रा खरेदी होतो. त्यांच्याद्वारे २२०० ते २५०० रुपये क्विंटलचा दर चांगल्या प्रतीच्या फळांना दिला जात आहे.
बाजारात मोसंबीची देखील आवक असून याचे दर मोठ्या आकाराच्या फळांसाठी २००० ते २५००, मध्यम १५०० ते २००० आणि लहान साठी १००० ते १२०० रुपये क्विंटल असे आहेत. मोसंबीची आवक ३००० क्विंटल इतकी अधिक आहे. कीड, रोगांमुळे संत्रा फळांची कमतरता बाजारात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृषी विभागानेही याला दुजोरा दिला आहे.
राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड आहे. त्यातील सर्वाधीक १ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात असून एकट्या अमरावती जिल्ह्यातील संत्र्याखालील क्षेत्र ७० हजार हेक्टरच्या आसपास आहे. परिणामी संत्रा हे विदर्भाचे मुख्य फळपीक असल्याने या फळ पिकातील उलाढालीवरच या भागातील शेतकऱ्यांचा हंगाम अवलंबून राहतो.
यंदा संत्रा बागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने त्याच्या परिणामी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत मोठ्या प्रमाणावर गळती झाली. त्यामुळेच यंदा बाजारात फळांची उपलब्धता कमी राहील, अशी शक्यता अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी व्यक्त केली आहे. बाजारात फळांची उपलब्धता कमी राहणार असल्याने साहजीकच दरात तेजी असेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.