Agriculture Education : ऑस्ट्रेलियातील आधुनिक कृषी शिक्षणातील संधी

Educational Opportunities : आजच्या लेखात आपण विद्यापीठातील शेती आणि तत्सम विषयातील शिक्षणाच्या संधींची माहिती घेत आहोत.
Modern Agriculture
Modern AgricultureAgrowon

डॉ. विनायक पाटील, डॉ. प्रशांत बोडके

Educational Opportunities in Agriculture : लेखमालेतील मागील तीन लेखांतून आपण ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठात शेती, पर्यावरण, हवामान बदल, शाश्‍वत विकास या विषयांत होणारे संशोधन तसेच विविध उपक्रमांचा आढावा घेतला. आजच्या लेखात आपण विद्यापीठातील शेती आणि तत्सम विषयातील शिक्षणाच्या संधींची माहिती घेत आहोत.

प्रसिद्ध झालेले तीन लेख वाचून अनेकांना स्वत:साठी किंवा त्यांच्या मुलामुलींसाठी ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घ्यायला जायचे असेल तर कशा संधी आहेत आणि काय तयारी करावी लागेल अशी विचारणा केली होती. त्यादृष्टीने आजच्या लेखातील माहिती निश्‍चितपणे मार्गदर्शक ठरणारी आहे.

वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील शिक्षण संधी

वेस्टर्न सिडनी विद्यापीठ हे ऑस्ट्रेलियातील एक अग्रगण्य विद्यापीठ असण्यासोबतच जगातील एक नावाजलेली शिक्षण संस्था आहे. जागतिक क्रमवारीत उच्च स्थानावरील दोन टक्के विद्यापीठांपैकी एक आहे.

तरुण विद्यापीठांमध्ये ३३वे तर शाश्‍वत विकास उद्दिष्टांच्या प्रभाव क्रमवारीत सलग दोन वर्षे शिखरावर आहे. त्याचप्रमाणे कृषी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील उत्कृष्ट दहा विद्यापीठांमध्ये वेस्टर्न सिडनी विद्यापीठाचा समावेश होतो.

Modern Agriculture
Agriculture Education : कोकणभूमीतील शैक्षणिक नंदनवन

सिडनी ही न्यू साउथ वेल्स या राज्याची राजधानी आणि ऑस्ट्रेलियाची आर्थिक राजधानी आहे. पूर्व किनाऱ्यावर वसलेल्या या शहराचा विस्तार पश्चिम दिशेला झाला आहे. या विस्तारित पश्चिम सिडनी शहराच्या उच्च शिक्षणाच्या बहुतेक गरजा हे विद्यापीठ भागवते. या विद्यापीठात ऑस्ट्रेलिया तसेच १७० देशांतील विद्यार्थी शिक्षण घेतात.

परदेशी विद्यार्थ्यांना दरवर्षी सुमारे दोनशे कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यातील काही शिष्यवृत्ती विद्यापीठाकडून मिळते. तसेच काही दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून दिली जाते. यापैकी अधिक प्रमाणात शिष्यवृत्ती विकसनशील देशांतील विद्यार्थ्यांना मिळते. त्यासाठी गुणवत्ता हा एकमेव निकष असतो.

शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत नाही. येथील विद्यार्थाला वर्षाला दीड लाख रुपये, तीन लाख रुपये किंवा शैक्षणिक शुल्काच्या पन्नास टक्के शिष्यवृत्ती मिळू शकते. पदव्युत्तर पदवीचे शैक्षणिक शुल्क सुमारे वीस लाख रुपये आहे. पीएचडीचे वार्षिक शुल्क सुमारे सतरा लाख रुपये आहे.

या विद्यापीठात दर महिन्याचा राहाणे आणि जेवणाचा खर्च साधारणपणे एक लाख रुपये येतो. मात्र ऑस्ट्रेलियातील प्रचलित पद्धतीनुसार उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातील २० तास काम करता येते. तासाला पंचवीस ते पन्नास ऑस्ट्रेलियन डॉलर इतके मानधन मिळते. म्हणजेच महिन्याला सुमारे एक लाख रुपये मिळकत होऊन त्यातून बराचसा खर्च निघू शकतो.

शिक्षणाची पद्धत विद्यार्थिकेंद्रित असल्याने कामासाठी वीस तास काढणे अजिबात कठीण जात नाही. प्रवेशासाठी इंग्रजी भाषेची अट असते. आपल्या कृषी विद्यापीठातील शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असल्यामुळे तशा आशयाचे पत्र विद्यापीठाकडून घेतल्यास येथील प्रवेश सुकर होतो.

हॉक्सबरी कॅम्पस

वेस्टर्न सिडनी विद्यापीठात कृषीमधील पदव्युत्तर आणि पीएचडी शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे. पदव्युत्तर पदवी ही अन्नशास्त्र, हरितगृह उद्यानिकी किंवा कृषी या विषयामध्ये घेता येते.

विद्यापीठाच्या एकूण सात कॅम्पसपैकी हॉक्सबरी कॅम्पस म्हणजे एकेकाळचे कृषी महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय सुमारे दीडशे वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आले होते. आता हे कृषी महाविद्यालय कागदोपत्री बंद असले तरी तेथील जीवशास्त्र महाविद्यालय आणि हॉक्सबरी पर्यावरण संस्था यांचे बरेचसे संशोधन शेतीशी संबंधित आहे.

Modern Agriculture
Modern Agriculture Technology : आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढवावे

न्यू साउथ वेल्स राज्याच्या सकल उत्पन्नात शेतीचा वाटा साधारण दोन टक्के आहे. गहू, कापूस, बार्ली आणि कॅनोला ही महत्त्वाची पिके आहेत. देशातील फळांचे वीस टक्के आणि भाजीपाल्याचे बारा टक्के उत्पादन या राज्यात घेतले जाते.

द्राक्षे, सफरचंद, मॅकाडेमिया, स्ट्रॉबेरी ही मुख्य फळपिके आहेत. या सर्व पिकांसाठी उपयुक्त संशोधन या विद्यापीठात केले जाते. कृषी संशोधनासाठी आवश्यक शेती किंवा फळबागा प्रक्षेत्र कॅम्पसवर नाहीत. मात्र विद्यापीठाने अनेक शेतकऱ्यांशी करार करून त्यांच्या शेतीमध्ये विविध संशोधन प्रकल्प चालवले आहेत.

कॅम्पसवर संपूर्णपणे नियंत्रित वातावरण असलेली अत्याधुनिक हरितगृहे आहेत. मृदाशास्त्र, जैवतंत्रज्ञान विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा आहेत. कृषिविषयक अनेक संशोधन प्रकल्प विद्यापीठात असल्याने त्यांच्याशी संबंधित संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन खर्चाचा अतिरिक्त बोजा पडत नाही.

या विद्यापीठात जल व्यवस्थापन, मृद् शास्त्र, अन्नशास्त्र, कृषी शास्त्र, उद्यानविद्या, पर्यावरण शास्त्र विभागामध्ये भारतीय प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. त्यांचे चांगले मार्गदर्शन विद्यार्थांना मिळते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर ऑस्ट्रेलियामध्ये नोकरीच्या विपुल संधी आहेत. ऑस्ट्रेलिया हा खंडप्राय देश आहे. या देशात बहुतेक शेतीचे यांत्रिकीकरण झाले आहे. येथील एका शेतकऱ्याची शेती शेकडो एकरात असल्यामुळे शेतीतील तांत्रिक ज्ञानासोबत यांत्रिकीकरण, रोबोटिक्स, आधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेल्या तरुणांना या शेतकऱ्यांच्या शेतावर नोकरी करण्याची चांगली संधी आहे. तसेच काही विद्यार्थी त्यांच्या नवोन्मेषी संकल्पना घेऊन विद्यापीठाच्या लाँचपॅड सुविधेतून आपला स्वतंत्र व्यवसाय उभा करू शकतात.

- डॉ. विनायक पाटील, ९४२३८७७२०६

(डॉ. विनायक पाटील हे वनशास्त्र महाविद्यालय, दापोली येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.

डॉ. प्रशांत बोडके, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक आहेत.)

भारतीय कृषी संशोधन परिषदेसोबत सामंजस्य करार

वेस्टर्न सिडनी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेसोबत सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत देशातील विविध कृषी विद्यापीठातील पदवीचे सुमारे दोनशे विद्यार्थी एक महिना तेथे राहून प्रशिक्षण घेऊन आले आहेत.

विशेषतः पंजाब कृषी विद्यापीठ, तमिळनाडू कृषी विद्यापीठाने त्यांचे पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रम या विद्यापीठाशी जुळवून घेत अर्धी पदवी भारतात आणि अर्धी ऑस्ट्रेलियात अशी दुहेरी पदवीची रचना केली आहे. त्यामुळे विद्यार्थांना परदेशी विद्यापीठाची पदवी मिळते, खर्च मात्र पूर्ण परदेशी पदवीचा येत नाही.

पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पदव्युत्तर व पीएचडी करण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे पंजाब, हरियाना, तमिळनाडू, ओडिशा अशा राज्यांतील विद्यार्थी तिथे शिक्षण घेत आहेत. सध्या धुळे जिल्ह्यातील चार कृषी पदवीधर तेथील अन्नशास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत दुहेरी पदवी अभ्यासक्रमाचे नियोजन होत आहे. लवकरच विविध अभ्यासक्रम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com