Nashik News : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेशाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांसाठी सोमवार (ता.१९) पर्यंत नोंदणी करून प्रवेशप्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे.
विद्यापीठाच्या प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार (ता.१३) पासून सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी कृषी शिक्षणक्रम माहिती पुस्तिकेसह अन्य माहिती वाचून घ्यावी.
अर्ज भरताना वैयक्तिक माहितीसह आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल, तर त्याच्याशी संबंधित कागदपत्रांची सुस्पष्ट प्रत (स्कॅनकॉपी) अपलोड करावी लागणार आहे. प्रथमच नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला यूजर आयडी व पासवर्ड काळजीपूर्वक जतन करून ठेवावा, अशा सूचना विद्यापीठातर्फे देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. परंतु गुणवत्तायादी जाहीर झाल्यानंतर कुठल्याही एकाच कृषी अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक:
प्रवेश अर्ज भरण्याची मुदत...१९ जूनपर्यंत
-प्रथम फेरी गुणवत्तायादी प्रसिद्धी ...२६ जून
-यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी...२७ जून ते २ जुलै
-दुसरी गुणवत्तायादी प्रसिद्धी...७ जुलै
-यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी...७ ते ११ जुलै
-शिल्लक जागांची माहिती प्रसिद्धी...१४ जुलै
-शिल्लक जागांवर प्रवेश...१७ व १८ जुलै(प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य)
-पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज ----- १ ते १० ऑगस्ट
-कृषी शिक्षण केंद्रांना पुस्तके वितरण ----- १ ते १० ऑगस्ट
राज्यातील विविध दहा विभागीय केंद्रांतर्गत येणाऱ्या कृषी शिक्षण केंद्रांवर एकूण ३५ हजार ४४० जागांवर प्रवेश दिले जातील. यामध्ये माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र (३,२००), कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम (४,८८० आणि ३,०४०), उद्यानविद्या पदविका अभ्यासक्रम (५,०४०), कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका (४,९६०), कृषी पत्रकारिता पदविका (४,९६०), फळबागा उत्पादन पदविका (३,१२०), भाजीपाला उत्पादन पदविका (३,१२०), फूलशेती व प्रांगण उद्यान पदविका (३,१२०) या अभ्यासक्रमांचा समावेश असेल.
‘यूजीसी’च्या २० मार्च २०१९ च्या पत्रानुसार कृषी विज्ञान विद्या शाखे अंतर्गत कृषी विषयातील पदवी शिक्षणक्रम (बी. एस्सी. ॲग्री आणि बी. एस्सी. हॉर्टिकल्चर) बंद केले आहेत. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षातही पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जाणार नाहीत. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०१९ पूर्वी मुक्त विद्यापीठाच्या पदवीला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी या दोन्ही पदवी शिक्षणक्रम ग्राह्य धरण्यात येतील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.