Pune News : राज्यात गेल्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे यंदा राज्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची घट झाली असून नद्या कोरड्या पडल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. तर अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांना पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत आहे.
शासनाच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या माहिती नुसार, राज्यातील सर्व २,९९४ धरणांमध्ये मंगळवारी (ता.१६) ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर गेल्या वर्षी याच दिवशी तो ४१.६५ टक्के होता. मात्र यंदा वाढत्या उन्हामुळे आणि गेल्या वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील सुमारे १८०० आणि सव्वा चार हजारांच्या वर गावे आणि वाड्यावस्त्यांना जवळ जवळ २३०० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
राज्यातील सहा महसूल विभागांतील धरणांची स्थिती पाहता सर्व मोठ्या अशा १३८ धरणांमध्ये एप्रिलच्या मध्यावधीत ३२.११ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जो गेल्या वर्षी याच दिवशी ३९.४४ टक्के होता. तर फक्त एका दिवसात राज्यातील या मोठ्या धरणातील पाणीसाठा सुमारे ७ टक्क्यांनी घटला आहे.
राज्यातील सर्व मोठ्या १३८ धरणातील पाणीसाठा
नागपूर - ४४.६५, अमरावती-४१.६९, छ.संभाजीनगर-१७.०९, नाशिक - ३४.१३, पुणे - ३०.०१ आणि कोकण - ३९.९४ टक्के इतका पाणीासाठा आहे.
एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५२७ टँकर
यामुळे राज्यात सध्या पाणीबाणी दिसत असून विविध जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. राज्यात सगळ्यात जास्त टँकर हे छत्रपती संभाजीनगर विभागास लागत आहे. येथे सोमवारी (ता.१५) १ हजार १६४ टँकर लागत असून एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५२७ टँकर फिरत आहेत. तर राज्यातील १८३७ गावे ४३१८ वाड्यावस्त्यांवर खाजगी ८२ सरकारी २१९९ अशा २२८१ टँकरमधून पाणी पोहचले जात आहे.
मराठवाडा तहानला
गेल्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्याने अनेक धरणातील पाण्याच्या साठ्यात म्हणावी तसी वाढ झालेली नाही. उलट तापमान वाढ आणि पाण्याची मागणी यामुळे धरणातील पाणीसाठ्याची वाटचाल तळ गाठण्याकडे सुरू आहे. मराठवाड्याची जीवनदायिनी म्हणून मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणात यंदा फक्त १४.७५ टक्के पाणी शिल्लक आहे. जो गेल्या वर्षी ५२.३६ टक्के होता. यामुळे मराठवाड्यात टँकरचे प्रमाण वाढले आहे. राज्यात सुरू असणाऱ्या टँकरच्या अर्धे टँकर एकट्या मराठवाड्याला लागत आहेत. येथे ११६४ टँकर फिरत असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५२७ टँकर आहेत. यापाठोपाठ जालन्यात ३५४, बीड - १९९ आणि धाराशिवमध्ये ७२ टँकर पाणीपुरवठा करत आहेत.
नाशिक विभागात पाणीटंचाईचे सावट
मराठवाड्यापाठोपाठ नाशिक विभागात पाणीटंचाईचे सावट गडद होत असून येथे ५२१ टँकर तहान भागवत आहेत. नाशिक विभागात एकट्या नाशिकला २५५ टँकर लागत आहेत. नाशिकनंतर धुळ्यात - ०७, जळगाव - ७८ आणि अहमदनगरमध्ये १८१ टँकर गावे आणि वाड्यावस्त्यांवर फिरत आहेत.
पुणे विभागातील धरणांमध्ये ३०.०१ टक्के पाणी
पुणे विभागात देखील तीव्र पाणीटंचाई जाणवत असून येथील सर्व धरणांमध्ये ३०.०१ टक्के पाणी शिल्लक आहे. यामुळे पुणे विभागात ४६१ टँकर फिरत असून पुण्यास १३८, सातारा- १६२, सांगली -९३ आणि सोलापूरला ६८ टँकर लागत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.