Onion Rate : कांदा दरवाढ ठरली औट घटकेची

Onion Market : कांदा दरात पुन्हा सरासरी प्रतिक्विंटल ३७९ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची नाहक पिळवणूक होत असल्याची स्थिती आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon

Nashik News : निर्यातबंदी मागे घेण्याच्या चर्चेची बातमी आल्यानंतर कांदा दरात सरासरी ५२० रुपये वाढ झाली. मात्र, ही वाढ तत्कालिक ठरली आहे. निर्यातबंदी कायम असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर कांदा दरात पुन्हा सरासरी प्रतिक्विंटल ३७९ रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. केंद्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची नाहक पिळवणूक होत असल्याची स्थिती आहे.

निर्यातबंदी मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेनंतर प्रतिक्विंटल १,२८० रुपयांवर असलेला कांदा दर १,८०० रुपयांवर पोचला. मात्र निर्यातबंदी उठविली नसल्याचे स्पष्टीकरण मंगळवारी (ता. २०) केंद्रातील सूत्रांनी दिले. त्यानंतर कांद्याचे दर १,८०० रुपयांवरून कमी होत १,४२१ रुपये क्विंटलवर आले आहेत.

Onion Market
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीवरून विरोधक आक्रमक, सरकार निवडणुकांची वाट पाहतय का?

त्यामुळे उत्पादकांना फटका बसला आहे. कोट्यवधी रुपयांचा तोटा शेतकरी सोसत असताना केंद्र सरकार ग्राहकधार्जिण्या भूमिकेवर ठाम आहे. केंद्राच्या या अस्थिर भूमिकेचा शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसतो आहे. नोव्हेंबर महिन्यात केंद्राचे पथक कांदा लागवड व उत्पादन स्थिती पाहण्यासाठी राज्य दौऱ्यावर होते.

मात्र बाजार समित्यांच्या वातानुकूलित दालनात बसून आढावा घेतला गेला. वस्तुनिष्ठ अहवाल न देता चुकीचा अहवाल केंद्र सरकारकडे देण्यात आला. परिणामी पुन्हा तिसऱ्यांदा केंद्राने डिसेंबरच्या सुरवातीला निर्यातबंदीचे हत्यार उपसले. मात्र या निर्णयाने शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली आहे. प्रतिक्विंटल ३,९०० रुपयांवर असलेले दर थेट १,२०० रुपयांवर आल्याने २ हजार कोटींहून अधिक नुकसान कांदा उत्पादकांचे झाले आहे.

Onion Market
Onion Export Ban : चुकीच्या माहितीच्याच आधारे कांदा निर्यातबंदी

केंद्राने बदललेले निर्णय आणि नुकसान (दर रुपये, प्रतिक्विंटल)

तारीख निर्णय निर्णयापूर्वी निर्णयानंतर दरातील तफावत

१९ ऑगस्ट २०२३ निर्यात शुल्क ४० टक्के २,३०० २,००० -३००

२८ ऑक्टोबर २०२३ किमान निर्यातमूल्य प्रतिटन ८०० डॉलर ४,८०० ३,५०० -१,३००

७ डिसेंबर २०२३ ३१ मार्चपर्यंत निर्यातबंदी ३,९५० १,२७३ -२६७७

१८ फेब्रुवारी २०२४ निर्यातबंदी मागे घेण्याची चर्चा १,२८० १,८०० +५२०

२० फेब्रुवारी निर्यातबंदीवर ठाम १,८०० १,४२१ -३७९

केंद्र सरकारने शेतकऱ्याला वेड्यात काढले आहे. आवक वाढल्याने सरकारने निर्यातबंदी उठवावी. दुष्काळी स्थितीत दिलासा द्या, दोन पैसे मिळू द्या. अडचणीतील कांदा उत्पादकांची गळचेपी करू नका. विकत पाणी आणून कांदा जगविला आहे. फसवणूक केली, शिवाय संभ्रम निर्माण केला जात आहे.
नानासाहेब बच्छाव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, भारत राष्ट्र समिती पक्ष
लोकसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी ठरवून कांद्याचे भाव पाडून ग्राहकांना खूष करण्यासाठी सरकारने निर्यातबंदी केली आहे. त्यामुळे कांदा विक्रीतून मिळणारे उत्पन्न निम्म्याने कमी झाले आहे. तोंडचा घास हिरावणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी शेतकरी मतपेटीतून आपली ताकद दाखवून देतील.
भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com