
Nashik News: यंदा रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रामुख्याने लागवडी फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहापर्यंत चालल्या. मात्र कांदा वाढीच्या अवस्थेत तापमानात कमालीची वाढ झाल्याने कांदा पक्वतेच्या अगोदरच काढणीसाठी आला. कांद्याची पात जळून गेली तर कांदा पोसला नसल्याने आकार, वजन व गुणवत्तेचा अभाव दिसून येत आहे. उत्पादकता नाही, कांद्याला भाव नाही त्यामुळे केलेला खर्चही वसूल होत नसल्याची बिकट स्थिती आहे.
जिल्ह्यात यंदा २ लाख ५१ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावर लागवडी आहेत. त्यात कसमादे भागात सर्वाधिक क्षेत्र आहे. मात्र अगोदर मॉन्सूनोत्तर पावसामुळे कांदा रोपांचे नुकसान झाल्याने लागवडी लांबणीवर गेल्या. त्यामुळे १५ जानेवारीनंतर झालेल्या लागवडीत मोठा फटका आहे. प्रामुख्याने देवळा, मालेगाव, बागलाण व कळवण तालुक्यांतही नुकसान आहे. जानेवारीपासून पुढे झालेल्या कांदा लागवडी पक्वता कालावधीच्या अगोदरच एप्रिलच्या पहिल्या सप्ताहापासून काढणीस आल्या आहेत.
त्यात नुकसान दिसून येत आहे. देवळा तालुक्यातील विठेवाडी, झिरेपिंपळ, भऊर, सटवाईवाडी, खामखेडा आदी गावांमध्ये हे नुकसान मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. एकरी सरासरी ६० ते ७० क्विंटल उत्पादन काहींच्या हाती आले आहे. त्यामुळे ६० टक्क्यांवर एकरी उत्पादकता कमी झाली आहे.
कांदा पिकास शाखीय वाढ होण्यासाठी ७५ दिवसांपर्यंत थंड वातावरण गरजेचे असते. मात्र चालू वर्षी लागवडी फेब्रुवारी मध्यापर्यंत झाल्याने थंडीचा कालावधी पूर्णतः मिळालेला नाही. परिणामी तापमान वाढीमुळे पक्वता कालावधीपूर्व (फोर्स मॅच्युरिटी) कांदा काढणीसाठी आलेला आहे. डिसेंबरअगोदर झालेल्या लागवडीमध्ये उत्पादन सरासरीच्या तुलनेत चांगले आहे. मात्र नंतरच्या टप्प्यात उत्पादकता व गुणवत्ता या दोन्ही बाबतीत मोठा फरक दिसून येत आहे. कमालीचे तापमान अधिक काळ टिकून राहिल्याने हा परिणाम प्रामुख्याने आहे.
ही आहे पिकाची स्थिती :
सध्या लागवडी ९० दिवसांतच काढणीयोग्य दिसून येत आहेत. कांद्याला पात राहिलेली नसून ती वाळून गेली आहे. तर कांदा उपटून पाहिल्यानंतर त्यास अपेक्षित आकार नाही. कांद्याचे आवरण व टरफले जमीन तापल्यामुळे राहिलेले नाहीत. कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत यंदा सर्वच टप्प्यांवर शेतकऱ्यांना अडचणी आल्या. हंगामात कमाल तापमानाचा कालावधी वाढला आहे. त्यामुळे हा कांदा दीर्घकाळ टिकवणक्षम असणार नाही. त्यामुळे विक्री नियोजन काळजीपूर्वक करण्याची गरज आहे. सरासरीच्या तुलनेत कांदा उत्पादन खर्चात ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
या गोष्टीमुळे पिकावर परिणाम :
- थंडीचा अभाव आणि तापमानात कमालीची वाढ झाल्याने वाढीच्या व पोषण अवस्थेत अडचणी
- कांदा लागवडी उशिराने झाल्याने फूल किडे व करपा रोगांचा प्रादुर्भाव अधिक
- अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे काढणीपूर्व नुकसान
- कांदा काढणीस आल्याचे दिसत असून पात राहिली नाही
- काढणी खर्चात ३० टक्क्यांवर दरवाढ होऊन काढणीला मजूर मिळेनात
- उन्हाच्या चटक्यामुळे जमिनीतील कांद्याचे नुकसान वाढते
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.