Onion Market : कांदा लिलाव पाडले बंद; दर पडले‘नाफेड’, ‘एनसीसीएफ' खरेदीपासून लांब; शेतकरी संतप्त

Onion Export Duty : केंद्राचे खरेदीदार कुणीही नव्हते. त्यातच लिलावाच्या बोलीत सरासरी दरात घसरण झाली. प्रमुख बाजार समित्यांत आवक निम्म्यावर येऊनही दरांत १०० ते ४०० रुपयांपर्यंत घसरण झाली.
Onion Protest
Onion ProtestAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Onion News : नाशिक ः कांदा निर्यातीवरील ४० टक्के शुल्काविरोधात बंद झालेले लिलाव गुरुवारी (ता. २४) सुरळीत होतील, अशी अपेक्षा होती. ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ कडून ही खरेदी बाजार समित्यांत खुल्या बाजारात व्हावी, अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटनांनी केली होती. मात्र लिलाव सुरू झाल्यानंतर खरेदीसाठी व्यापारी उपस्थित होते.

केंद्राचे खरेदीदार कुणीही नव्हते. त्यातच लिलावाच्या बोलीत सरासरी दरात घसरण झाली. प्रमुख बाजार समित्यांत आवक निम्म्यावर येऊनही दरांत १०० ते ४०० रुपयांपर्यंत घसरण झाली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक होत नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी लिलाव बंद पाडले. परिणामी, अद्यापही कांदाप्रश्न मार्गी न लागल्याची चिन्हे आहेत.

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने २,४१० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे २ लाख क्विंटल कांदा खरेदी करण्याची घोषणा केली होती. नाशिक जिल्ह्यात बंद असलेले कांदा लिलाव सुरू करण्यासाठी बुधवारी (ता.२३) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मध्यस्थी केली होती. त्यामुळे चार दिवसांनी गुरुवारी कांदा लिलाव सुरळीत होतील, अशी आशा होती.

जिल्ह्यातील बाजार समिती व उपबाजार आवारांत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’चे प्रतिनिधी खरेदीसाठी नव्हते. एकीकडे आवक कमी होती. व्यापारी बोली लावू लागले. मात्र दरात घसरण दिसून आली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. परिणामी, जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगाव, येवला, कळवण, उमराणे, नामपूर, चांदवड या बाजार आवारांत लिलाव बंद पाडले गेले. दुपारच्या सत्रात काही ठिकाणी लिलाव झाले. मात्र, त्यास प्रतिसाद नव्हता.

कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले,‘‘बैठकीत डॉ. भारती पवार, ‘नाफेड’चे व्यवस्थापकीय संचालक रितेश चौव्हाण यांनी सर्व बाजार समित्यांमध्ये ‘नाफेड’ची कांदा खरेदी २,४१० रुपये क्विंटल दराने होईल, असा शब्द दिला होता. मात्र जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ‘नाफेड’च्या कांदा खरेदीसाठी खरेदीदार उतरले नाहीत. व्यापाऱ्यांनी लिलावात कांदा १५०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्यास सुरवात केल्यानंतर शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. शेतकऱ्यांचा संताप सरकारला महागात पडेल.’’

Onion Protest
Onion Issue : पुण्यात कांदा निर्यातीवर शुल्क वाढीच्या विरोधात बाबा आढावांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

...या प्रमुख ठिकाणी लिलाव बंद
पिंपळगाव बसवंत, लासलगाव, येवला, कळवण, उमराणे, नामपूर, चांदवड

केंद्र नामानिराळे; भांडण शेतकरी-व्यापाऱ्यांत
निर्यात शुल्काविरोधात व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले;तर यामुळे दर पडणार असल्याने शेतकऱ्यांनी आक्रोश केला. परिणामी बाजार कामकाज विस्कळित झाले. त्यातच चार दिवसानंतर लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात पडझड दिसून आली. त्यामागे निर्यात शुल्क हे कारण पुढे येत आहे. मात्र केंद्र सरकार अधिसूचना काढून नामानिराळे झाले, तर अप्रत्यक्षपणे हा संघर्ष शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये सुरू झाल्याची स्थिती आहे

कांदा खरेदी नेमकी कुठे? काही समजेना
केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ या दोन प्रमुख खरेदीदारांमार्फत पहिल्या टप्प्यात ३ लाख टन खरेदी झाली. तर दुसऱ्या टप्प्यात २ लाख टन खरेदी होईल. सध्या नाशिक, नगरसह, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत खरेदी सुरू आहे. मात्र याची खरेदी केंद्रे नेमकी कुठे आहेत? याची कुठलीही माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नेमका दराचा फायदा कसा होणार, हा मोठा प्रश्न आहे.

कांद्याची तुलनात्मक दर स्थिती
बाजार समिती...१९ ऑगस्टची आवक, दर...गुरूवारची आवक, दर...दरात घसरण (रूपये)
पिंपळगाव बसवंत...१९,५०५/२,२०१...७,२००/२,०००...२०१
लासलगाव...१५,०९०/२,०५०...४,८९२/२,१५१...+१००
विंचूर(लासलगाव)...२०७००/२१००...३,५००/२२००....+१००
येवला...८,२०९/१,९००...२,०००/१,९५०...५०
कळवण...११,०००/२,२००...३,१००/१,८००....४००
मनमाड...२,५७५/२,०००...२,३००/२,१००....+१००
(संदर्भ: कृषी पणन मंडळ)

येवल्यात लिलाव बंद; रास्ता रोको
येवला येथे कांदा खरेदी करणार कोण? २४१० रुपये हा दर आहे कुठे? हा सवाल करत शेतकरी संतप्त झाले. येथील बाजार समितीत लिलावात १५०० ते १७०० रुपयांचे दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक होत लिलाव बंद पाडून नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांदा आवक झाली होती. सकाळचे लिलाव बंद पाडत तोडगा निघेपर्यंत लिलाव सुरू न करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. मात्र दुपारनंतर समजूत काढत विक्रीस आलेल्या कांदा ट्रॅक्टरचे लिलाव पूर्ण करण्याचे सर्वानुमते ठरल्यावर लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com