
Dairy Business and Land Conflict : भरत आणि जगन नावाचे दोन चुलत भाऊ आपापली जमीन कसत होते. जगनला एका कंपनीमध्ये मोठ्या पदावर नोकरी मिळाली आणि त्यानंतर तो मुंबईला राहायला गेला. काही वर्षे तो जाऊन येऊन गावची जमीन पाहत होता. परंतु १-२ वर्षांनंतर प्रत्येक आठवड्याला गावी येऊन जमीन कसणे त्याला अवघड जाऊ लागले. त्याचा चुलत भाऊ भरत याने अर्ध्या वाट्याने त्याची जमीन कसायला घेतली.
जमिनीतला नांगरणीचा, मजुरांचा, विजेचा, बी-बियाणे व खते यांचा सर्व खर्च दोघांनी अर्धा करायचा आणि उत्पन्नसुद्धा दोघांनी अर्धे घ्यायचे अशा पद्धतीने ४-५ वर्षे जगनची जमीन वहिती होत होती. त्यानंतर मात्र अर्धा खर्च करूनसुद्धा फारसे उत्पन्न हाती येत नाही, हे जगनच्या लक्षात आले. शहरात असल्यामुळे हेच पैसे बँकेत ठेवले असते तर किती झाले असते असा हिशेब करायला तो आता शिकला होता. कमी वेळात जास्त पैसे शेतीतून मिळायचे असतील तर कोणता तरी शेती आधारित उद्योग करायला पाहिजे असे त्याच्या लक्षात आले.
शेवटी ७०-८० म्हशी विकत घेऊन भरत आणि जगन यांनी डेअरी टाकायचे ठरविले. दोघांच्या जमिनी शेजारी शेजारी असल्यामुळे आणि त्यांच्याच नावावर असल्यामुळे डेअरीला लागणारा गोठा, गव्हाण, पशुखाद्य ठेवायची जागा, मजुरांच्या खोल्या, थ्रेशर इत्यादी सर्वांचा मिळून कागदावर प्लॅन तयार झाला. त्यासाठी आर्किटेक्टची मदत घेण्यात आली. बँकेकडून कर्ज घ्यायचे म्हटल्यावर सर्व कागदपत्रे, प्लॅन, जमिनीचे सातबारा, मालकी हक्क, इत्यादी गोष्टींबद्दल घ्यायची सगळी काळजी त्या दोघांनी घेतली.
३-४ महिने धावपळ करून व हरियानामध्ये अनेक म्हशींचे गोठे पाहून तसे बांधकाम करायचे त्यांनी निश्चित केले. सुमारे ८० लाख रुपये एवढे कर्ज या प्रकल्पासाठी मंजूर झाले. अर्थातच डेअरी ज्या जमिनींवर उभारली जाणार होती त्या दोघांच्या पण आठ अ उताऱ्यावर असलेली सर्व मिळकत बँकेला गहाण द्यावी लागणार होती. त्याप्रमाणे गहाण खत पूर्ण झाल्यावर डेअरीच्या साठी लागणारी सर्व बांधकामे हाती घेण्यात आली व सर्व कामे पूर्ण होऊन त्यांची डेअरी सुरू झाली.
सुरुवातीला दूध उत्पादनास २०० लिटरपासून सुरुवात होऊन दोन वर्षांत दररोज १२०० लिटरपर्यंत ही मजल गेली. तरी सुद्धा बँकेचा हप्ता व खर्च यांचा फारसा मेळ जमत नव्हता. हळूहळू यामध्ये सुधारणा होईल अशा आशेवर व्यवसाय सुरू झाला. त्यानंतर मात्र दुभत्या म्हशी कमी झाल्यामुळे व सलग दोन वर्षे दुष्काळ पडल्यामुळे, ओला चारा विकत घ्यावा लागला. त्यामुळे खर्चामध्ये वाढ झाली. अचानक आजारी पडल्यामुळे दरम्यानच्या काळात दोन म्हशी दगावल्या. प्रत्येक एक लाख रुपयाला घेतलेली दुभती म्हैस गमावल्यामुळे नुकसानीत भर पडली.
थकलेल्या दोन-तीन हप्त्यांमुळे बँकेने दंडनीय व्याज लावले. आता दर आठवड्याला जगन आणि भरत यांच्यामध्ये भांडणे वाढू लागली. मेलेल्या दोन म्हशींचे सगळे पैसे प्रत्यक्ष काम करणाऱ्या भरतने द्यावेत असे जगनचे म्हणणे होते. तर त्याविरुद्ध दररोज मीच शेतावर राबतो आणि तू मात्र उंटावरून शेळ्या हाकतोस असे सांगून मलाच दर महिना २५-३० हजार पगार तू दिला पाहिजेस असे भरतचे म्हणणे होते.
पुढे पुढे ही भांडणे विकोपाला गेली. निवडणुका जवळ आल्यावर ऐनवेळी जगनच्या विरोधात विरोधी पार्टीत उघडपणे भरतने प्रवेश केला. त्या पार्टीतल्या लोकांनी भरतला पाठिंबा देऊन तू दोन वर्षे जी मेहनत घेतली त्या काळातला तुझा सगळा पगार आम्ही जगनकडून वसूल करून घेऊ असे भरतला आश्वासन दिले. जगन गावी राहत नसल्यामुळे तू हळूहळू डेअरीकडे दुर्लक्ष कर. जे काही व्हायचे ते दोघांच्या बाबतीत होईल, असे त्याला सांगितले. शिवाय मुंबईवरून येऊन जगन काही दररोजच्या डेअरीच्या प्रश्नांकडे लक्ष देऊ शकणार नाही हे पटवून दिले.
बघता बघता दोघेही एकमेकांशी बोलेनासे झाले. दुधाचे उत्पादन आता ३०० लिटरपर्यंत खाली आले होते. दूध देणाऱ्या आता केवळ ३५ म्हशी होत्या. जगनने अनेक लोकांच्या ओळखीने शेजारच्या गावातला एक व्यक्ती मॅनेजर म्हणून २० हजार पगारावर घेतला. आता जगनच्या खिशातून बँकेच्या हप्त्याशिवाय मॅनेजरचा पगार वाढला होता. शेवटी अशा व्यवसायाचे जे काही होते तसेच या डेअरीचे झाले.
सर्व जनावरे विकून सुद्धा सुमारे २५ लाख रुपये बँकेचे देणे शिल्लक राहिले होते. पुढील तीन वर्षे दंडनीय व्याज कमी व्हावे म्हणून जगन बँकेकडे हेलपाटे मारत होता. डेअरीची शेड मात्र पूर्णपणे भरतच्या जमिनीत असल्याचे पहिल्यांदाच जगनच्या लक्षात आले. स्वतःकडे कर्ज घेऊन शेड मात्र दुसऱ्याच्या शेतात अशी अवस्था जगनची झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.