Pune News : धाराशिव शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. १४) मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवप्रेमीं कार्यकर्त्यांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला होता. यावरून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानंतर मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या लाठीचार्जच्या निषेधार्ध पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच रस्त्यावर टायर जाळले. हे प्रकरण अजून ताजे असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे.
निंबाळकर यांनी फडणवीस यांच्यावर निशाना साधताना ट्वीट करत टीका केली आहे. यावेळी निंबाळकर यांनी, हेच का तुमचे हिंदुत्व.. असा सवाल केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आपल्या धाराशिव शहरामध्ये काल मिरवणुका निघाल्या होत्या. या मिरवणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांकडून शिवभक्त तरुणांवर लाठीचार्ज करण्यात आला. ही बाब अत्यंत निंदनीय असून याचा मी जाहीर निषेध करतो असे निंबाळकर यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेला राज्याचे गृहमंत्रालय जबाबदार असून दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच यापूर्वीही आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. नंतर आंतरवली सराटी येथेही निष्पाप मराठा बंधू, माता-भगिनीवर असा लाठीचार्ज करण्यात आला. महाराष्ट्रात सध्या फक्त आणि फक्त हुकूमशाही चालू आहे असा आरोप निंबाळकर यांनी केला आहे.
तसेच निंबाळकर यांनी, महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था हाताळता न येणाऱ्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
नेमकं काय झाले धाराशिव शहरात?
धाराशिव शहरात छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असतानाच गोंधळ उडाला होता. तसेच यात पोलिसांनी लाठिचार्ज केला होता. पोलिसांनी विविध मंडळाच्या २२ मिरवणुकांना परवागनी देताना डीजे लावण्यास परवानगी नाकारली होती. मात्र संघमित्र मंडळाच्या मिरवणुकीत डीजे वाजला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मिरवणूक थांबविण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांनी संभाजी महाराजांची मुर्ती रस्त्यावर ठेवल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले अन् पोलीसांनी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यावरून आता धाराशिव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलकांनी रस्त्यांवर टायर जाळले
धाराशिव शहरात तणावाचे वातावरण तयार झाले असून सकल मराठा समाज आक्रमक झाला. बुधवारी (ता.१५) यावरून मराठा समाजाच्या आंदोलकांनी पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच पोलीस अधिक्षक कार्यालयासमोरील रस्त्यांवर टायर जाळले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.