Omar Abdullah : केंद्रशासित जम्मू आणि काश्मीरच्या पहिल्या मुख्यमंत्री पदी 'ओमर अब्दुल्ला'

Omar Abdullah Oath Ceremony : ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी (ता.१६) केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला सर्वाधिक ४२ जागा मिळाल्या.
Omar Abdullah Oath Ceremony
Omar Abdullah Oath CeremonyAgrowon
Published on
Updated on

Pune News : जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच विधानसभा निवडणूका लागल्या. यावेळी नॅशनल कॉन्फरन्सने सर्वाधिक ४२ जागा मिळवत सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर बुधवारी (ता. १६) ओमर अब्दुल्ला यांनी केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.

यावेळी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे, पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती, सीपीआयचे डी राजा आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव उपस्थित होते. यावेळी मात्र काँग्रेसने सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असून बाहेरून पाठिंबा दिला आहे.

Omar Abdullah Oath Ceremony
Haryana Election 2024 : हरियाणात भाजप तर जम्मू अन् काश्मीरमध्ये जेकेएनसी, कॉँग्रेस आघाडीवर

ओमर यांच्याशिवाय जम्मू-काश्मीर सरकारमध्ये पाच मंत्री करण्यात आले आहेत. सीएम उमर यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांमध्ये सतीश शर्मा, सुरेंद्र चौधरी, सकीना येट्टू, जावेद दार आणि जावेद राणा यांचा समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांचा पराभव करणारे सुरेंद्र चौधरी आणि सतीश शर्मा यांच्या रूपाने उमर मंत्रिमंडळात दोन हिंदू चेहरेही सहभागी झाले आहेत. तर या मंत्रिमंडळाच्या स्थापनेतून काश्मीर खोरे तसेच चिनाब खोरे आणि जम्मू प्रदेश यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. काश्मीर खोऱ्यातून दोन मंत्री, जम्मू प्रदेशातील दोन आणि चिनाब खोऱ्यातील एका नेत्याला मंत्री करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीर विधानसभेत बलाबल

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ४२, भाजप २९, काँग्रेस ६, पीडीपी ३, जेपीसी १, सीपीआयएस २, आप २ आणि ७ अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आघाडी करून निवडणूक लढवली होती. यात आता यश आले असून येथे नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यात आले आहे.

Omar Abdullah Oath Ceremony
Heavy Rain Warning : आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकला मुसळधारा; चेन्नईसह चार जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद

शेख अब्दुल्ला यांना श्रद्धांजली

यावेळी शपथ घेण्यापूर्वी ओमर अब्दुल्ला यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे संस्थापक शेख मुहम्मद अब्दुल्ला यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. पठाणी सूट आणि कोट परिधान केलेल्या ५४ वर्षीय अब्दुल्ला यांनी स्मारकावर पुष्प अर्पण केले.

खरगे यांच्या शुभेच्छा

दरम्यान ओमर अब्दुल्ला यांनी शपथ घेतल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुभेच्छा देताना पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी खरगे म्हणाले, "मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो आहे. येथे मुख्यमंत्री आमच्या मित्रपक्षाचा झाला याचा आम्हाला आनंद आहे आणि बऱ्याच काळानंतर येथे लोकशाही प्रस्थापित झाली आहे. यामुळे येथे राज्यत्व पुनर्संचयित होईल, याची आम्ही खात्री करू शकतो, असेही खरगे यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com