शेखर गायकवाड
Shekhar Gaikwad Article : भरत नावाच्या एका शेतकऱ्याने १९४८ मध्ये गावामध्ये एक सरकारी दवाखाना होणार असे माहीत झाल्यावर स्वतःहून दोन गुंठे जमीन गावाला दान देण्याचे ठरविले. त्याने रीतसर दोन गुंठ्यांचे बक्षीसपत्र गावाच्या नावाने करून दिले. शासनाने पण या ठिकाणी एक छोटा दवाखाना सुरू केला.
पुढे १९६० मध्ये पंचायत राज व्यवस्था निर्माण झाल्यावर लोकल बोर्डाची ही इमारत आपोआपच ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झाली. गावाची लोकसंख्या वाढत होती आणि हळूहळू दवाखान्याची इमारत पण जुनी होऊ लागली होती. पाच-सहा पायऱ्या वर चढून लोकांना दवाखान्यात जावे लागत असे. म्हाताऱ्या लोकांना दवाखान्यात जाणे देखील गैरसोयीचे होऊ लागले.
शासनाने नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्याचा जेव्हा निर्णय घेतला, तेव्हा अशा केंद्रांचा टाइप प्लॅन तयार झाला. त्यामध्ये डॉक्टरांची खोली, प्रयोगशाळा, औषधाची खोली, पेशंटसाठी काही खोल्या अशी रचना आली. त्यासाठी गावाच्या बाहेर दोन एकर जागा गायरानमधून घेण्याचे ठरले. साहजिकच जुना दवाखाना बंद करून गावाच्या बाहेर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. भरत हा शेतकरी आता जिवंत नव्हता, तर त्याचा नातू अनंता हा त्या गावात राहत होता.
महत्त्वाच्या रस्त्यावरील गाव म्हणून गावातल्या जमिनीचे भाव वाढू लागले होते. या गावातल्या जमिनीचा भाव तीन लाख रुपये गुंठा झाला, तेव्हा अनंताने ग्रामपंचायतीला अर्ज करून आजोबांनी बक्षीस दिलेली जमीन मला फुकट परत मिळावी, अशी मागणी केली. त्याने अर्जात असे लिहिले होते, की ज्या कारणासाठी जमीन गावाला दिली त्या कारणासाठी गाव त्या जमिनीचा वापर करत नसल्यामुळे व मला शेतात घर असले, तरी गावात घर नसल्यामुळे दोन गुंठे जमीन परत मिळावी, अशी त्याने मागणी केली.
अशा जमिनीचे भांडण कोणतीही वकील फी न घेता, परंतु एक गुंठा जमीन घेण्याच्या बदल्यात फुकटात चालवण्याचे गावातल्याच एका वकिलाने ठरविले. भांडणातून सर्वांना आर्थिक फायदा होईल व भांडणदेखील अखंड सुरू राहील असा हा अद्भुत जुने बक्षीसपत्र योग! त्या वकिलाने लगेच सर्व जमीन परत मिळण्यासाठी दिवाणी कोर्टात दावा लावला.
आता ग्रामसेवक व सरपंच जुनी कागदे शोधू लागली. बक्षीसपत्राची प्रत काही दफ्तरात सापडेना. त्या वेळी बक्षीसपत्र रजिस्टर केले होते की फक्त १० रुपये स्टॅम्पवर घेतले होते, याची शोधाशोध सुरू झाली. आणि आणखी एक खटला सुरू झाला.
...................................
- शेखर गायकवाड
ई-मेल- shekharsatbara@gmail.com