
Nashik Paddy : आदिवासी विकास महामंडळाने सुरगाण्यात खरेदी केलेले धान थेट गुजरातमध्ये विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर त्याच्या चौकशीसाठी सोमवारी (ता. ५) दुसरे पथक सुरगाण्याला जाणार आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोषींवर कठोर कारवाई करण्याची तंबी संबंधित विभागप्रमुखांनी दिली. दरम्यान, खरेदी आणि वितरण प्रक्रियेत समावेश असलेल्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे समजते.
आधारभूत खरेदी योजनेंतर्गत सुरगाणा तालुक्यात खरेदी केलेले धान (भात) भरडाईसाठी करारानुसार रेणुका राईस मिल, पांढुर्ली (ता. सिन्नर) येथे पाठविण्यात येते. महामंडळाने ५ फेब्रुवारीला धान भरडाईबाबत करार केला आहे. गिरणीधारकांनी धानाची तातडीने उचल करून भरडाईनंतर एफआरके मिश्रित तांदूळ जिल्हा शासकीय पुरवठा गुदामात जमा करणे अपेक्षित आहे; परंतु त्याची गुजरातला चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले.
याबाबत आदिवासी विकास महामंडळाने चौकशीसाठी पथक पाठविले. धान्य खरेदी केंद्रावरून ट्रकमध्ये धान (भात) वाहतुकीसाठी केव्हा भरले, याची शहानिशा करण्यात येत आहे. हे ट्रक खासगी व्यापाऱ्यांचे असावेत, असा महामंडळाचे अधिकारी आता दावा करीत असले तरी ट्रकचे क्रमांक, वजनकाट्याच्या पावत्या, रेणुका राईस मिलचे पावतीवरील नाव याकडे कसे काय दुर्लक्ष केले जात आहे, याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, सोमवारी जाणारे पथक वस्तुनिष्ठ चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करेल.
महामंडळाच्या सुरगाणा येथील खरेदी केंद्रावर कर्मचाऱ्यांची वानवा आहे. रामभरोसे चालणाऱ्या या कारभारावर अधिकाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही. धान खरेदी व वितरण प्रक्रियेशी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदिवासी विकास महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे समजते.
संपूर्ण चौकशी, वस्तुनिष्ठ अहवाल येण्याआधीच गुजरातमध्ये वाहतूक होत असलेले धान हे खासगी व्यापाऱ्यांचे असावे, असा जावईशोध महामंडळाकडून लावला जात आहे. हे सरळ-सरळ दिशाभूल करण्यासारखे असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. असे असले तरी धानाचे वजन ट्रकसह करताना ट्रक क्रमांक हा वजन पावतीवर नमूद केला जातो.
याबाबतचे पेमेंट हे भरडाई राईस मिल मालकास कोणाकडून, कधी, केव्हा, कोणत्या बॅंकेतून कोणाच्या नावे मिळाले, या धानाने (भाताने) भरलेल्या ट्रक नेमक्या कोणत्या मार्गाने कधी, कोणत्या तारखेला पांढुर्ली येथील राईस मिलमध्ये पोहोचल्या याबाबतचा तपशील सीसीटीव्ही तपासून हाती येणे बाकी आहे. या ट्रकला जीपीएस सिस्टिम का बसविली नाही, हाही प्रश्न आहे. दशकभरापूर्वी सुरगाणा तहसीलमध्ये कोट्यवधींचा रेशनिंग तांदूळ घोटाळा झाला होता. यामुळे सर्वांच्याच नजरा या घटनेच्या नेमक्या तपासाकडे लागल्या आहेत.
सुरगाणा तालुक्यातून गुजरातमध्ये जाताना निदर्शनास आलेल्या ट्रक रेणुका राईस मिलमध्ये भरलेल्या नाहीत. आमच्याकडे आलेल्या आणि रिकाम्या झालेल्या गाड्यांचे व्हीडीओ चित्रण केलेले आहे. यासह सखोल माहिती सोमवारी (ता.५) आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा प्रशासनाला देणार आहे.
- राहुल भागवत, संचालक, रेणुका राईस मिल, पांढुर्ली (सिन्नर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.