Dahanu News : शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीशी निगडित असणाऱ्या सर्व विभागांनी संघटितपणे काम करून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीबरोबरच रानभाज्यांविषयी जागृती करणे गरजेचे आहे.
तसेच विविध प्रकारच्या अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित पिकांच्या जातीची लागवड करण्याचे उपक्रम कृषी विज्ञान केंद्राने प्राधान्याने आयोजित करावेत, असे आवाहन दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
डहाणू येथील कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथे कृषी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रमोद सावंत होते.
कृषी संशोधन केंद्राचे अधिकारी डॉ. विजय सागवेकर, कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव, खादी ग्रामोद्योग केंद्राचे संचालक शिशपाल सिंग, कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. मंदार खानविलकर, तालुका कृषी अधिकारी अनिल नरगुरवार, मंडळ कृषी अधिकारी जगदीश पाटील, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजेश घरत, कृषी भूषण यज्ञेश सावे, शेतीनिष्ठ शेतकरी देवेंद्र राऊत, प्रगतशील शेतकरी लक्ष्मी भोये आणि कृषी केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.
पालघरमध्ये तेलबियांची लागवड मोठ्या प्रमाणावर घेण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने अधिक प्रात्यक्षिके घेण्याची सूचना डॉ. सागवेकर यांनी केली, बासमती भाताची लागवड अधिक प्रमाणात करून भातभरडाई मिलमध्ये न मोडणाऱ्या जातीच्या वाणाचे प्रात्यक्षिक घेण्याचे देवेंद्र राऊत यांनी सुचविले. सूत्रसंचालन उत्तम शहाणे यांनी केले. आभार रूपाली देशमुख यांनी मानले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.