Village Development : पाणी, कृषी क्षेत्रामध्ये लोक शिक्षणाची गरज

Public education : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अत्यंत चांगले उपक्रम कृषी शिक्षणाबाबत राबवले जातात त्यांचे अनुकरण मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे.
Village Development
Village Development
Published on
Updated on

डॉ.सुमंत पांडे

Agriculture Education : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अत्यंत चांगले उपक्रम कृषी शिक्षणाबाबत राबवले जातात त्यांचे अनुकरण मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत स्तरावरील शालेय शिक्षण समिती तसेच जलसंधारण आणि पाणी पुरवठा समिती यांनी समन्वयाने आपापल्या गावातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन असे अनुकरण नक्कीच करू शकतील.

ग्रामीण अर्थव्यवस्था कृषी आणि कृषिपूरक उद्योगाच्या दृष्टीने पोषक आहे. परंतु अजूनही म्हणावे त्या पटीत आर्थिक मोबदला मिळत नाही. यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब महत्त्वाचा आहे.
पाणी आणि शेतीतील तरुणाचा सहभाग :
तरुणांचा शेतीमध्ये किती सहभाग आहे हा अलीकडे अभ्यासाचा विषय झाला आहे. पंचक्रोशीत एखादा दुसरा शेतकरी प्रगतिशील आढळतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सिंचन, जमीन, बियाणे,खते, शेतीमाल उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात नव्याने सुरु होत असलेले स्टार्टअपसाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे.तथापि त्यांना ते मिळत नाही हे वास्तव आहे. शेतीवर आर्थिक, सामाजिक, हवामान बदल, आणि धोरणे याचा परिणाम होत असतो. त्यामुळे शालेय शिक्षणामध्ये कृषी आणि संलग्न शिक्षणाचा समावेश झाल्यास मुलांमध्ये रुची वाढून त्याचे चांगले परिणाम दिसू शकतील.

शालेय शिक्षणात जलसाक्षरता आणि कृषी शिक्षणाची गरज: गेल्या काही वर्षात पाणी आणि कृषी या विषयावर सातत्याने चर्चा होत आहे. हवामान बदलाच्या संकटांना सामोरे जाताना तंत्रज्ञान,कौशल्य यांचा वापर वाढणे अत्यंत गरजेचे आहे. पाण्याचा ताळेबंद आणि त्याचे लेखापरीक्षण हा महत्त्वाचा विषय असून देखील दुर्लक्षित आहे. आपल्या पाणलोटात पडणाऱ्या पाण्याचा हिशोब मांडून, किती पाणी पिण्याला लागते, जनावरांना किती लागते, उद्योग आणि सिंचनाची पाण्याची गरज हे गणित अजूनही मांडले जात नाही. पीक लागवड आणि पर्जन्याचे गणित अजूनही जुळत नाही. परिणामी भूजलाचा वारेमाप उपसा होत असून जमिनी खालचे पाणवठे कोरडे होत आहेत या बाबत आपण किती संवेदनशील आहोत ?

Village Development
Village Development : पंचायतीचा आराखडा सक्षम करा...

जीवनशैली बदलामुळे होणाऱ्या परिणामाचा अभ्यास आणि उपाय:

भूपृष्ठावरील पाण्याचे प्रदूषण,सांडपाण्याचा निचरा, उद्योगामुळे होणारे प्रदूषण. या सर्वांचा परिणाम शेती,अर्थकारण आणि आरोग्यावर होत आहे, हे आता स्पष्टपणे दिसते आहे. अनेक असाध्य आजार बळावत असल्याचे दिसते आहे. यासाठी पारंपारिक आणि आधुनिक तंत्राचा वापर होणे गरजेचे आहे. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करता कृषी शिक्षणाचा समावेश शालेय शिक्षणात करणे गरजेचे होते.

कृषी विषयाचा शालेय शिक्षणामध्ये समावेश :

नवीन युगामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर विविध प्रकारच्या बाबी अभ्यासक्रमात समाविष्ट झालेल्या आहेत. मात्र शेतीच्या संदर्भात कोणतेही कौशल्य किंवा ज्ञान नवीन पिढीला शिक्षणातून मिळत नाही. ते जर मिळाले तर त्याला कोणताही रोजगार मिळाला नाही तरी किमान शेतीबाबत त्याला ज्ञान मिळाल्यास, कौशल्य मिळाल्यास तो सजग राहील. त्यातून रोजगार निर्माण करण्याची क्षमता त्याला येईल.

Village Development
Village Development : ग्रामपंचायतीने तयार करावा शाश्‍वत विकासाचा आराखडा

या हेतूने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये कृषी विषयाचा देखील समावेश केला जाणार आहे. यासाठी राज्याच्या कृषिमंत्र्यांनी देखील शालेय शिक्षण विभागाकडे त्याबाबत सूचना केली असल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. हे नक्कीच स्वागतार्ह आहे.

भारतातील कृषी शिक्षण :

वेदकालीन संस्कृत ग्रंथांतील कृषिव्यवसायासंबंधी आढळणाऱ्या उल्लेखांवरून त्या काळी लोकांना शेतीची मशागत, खते, पिकांचे फेरपालट इत्यादी बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींची माहिती होती, असे दिसून येते. परंतु कृषी शिक्षणाची सोय असल्याचे कोठे नमूद केलेले आढळत नाही. त्या काळी भारतातील कृषिव्यवसायाची भरभराट झालेली असली, तरी तो व्यवसाय परंपरागत पद्धतीनेच केला जात होता. कृषी व्यवसायात सुधारणा करण्याकरिता संशोधन व प्रयोग करण्याचा आणि शिक्षण देण्याचा बऱ्याच काळापर्यंत प्रयत्न न झाल्यामुळे पुढे कृषी व्यवसायाची अवनती होऊ लागली.

शेती शाळा :

माध्यमिक शालेय शिक्षण झालेल्यांना कृषी शिक्षण देण्याकरिता दोन वर्षांचा शिक्षणक्रम असलेल्या शेतीशाळा सुरू झाल्या. १९४७ साली पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे एक शाळा स्थापन करण्यात आली. पुढे १९४७ ते १९५५ या काळात आणखी १६ शाळा मुंबई प्रांतात निघाल्या. या शाळांना मांजरी शेतीशाळा पद्धतीच्या शाळा म्हणून ओळखतात. या शाळांतील शिक्षण ज्या त्या राज्यांतील अधिकृत भाषेतून दिले जात असे. या शाळांत शेत जमीन, जमीन मशागत, खते, पिके, कोरडवाहू व बागायती शेती, पशू-पक्षीपालन, अवजारे, पिकांवरील कीड,रोग नियंत्रण, सहकार इत्यादी विषय शिकवतात. वर्गात दिलेल्या शिक्षणाबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांकडून तज्ञ शिक्षकांच्या देखरेखीखाली शाळेच्या कृषिक्षेत्रावर शेतीची कामे प्रत्यक्षात करवून घेतली जातात.

कृषी आणि भूसंरक्षण प्रशिक्षण :

शालेय विद्यार्थी सामान्यतः या विषयाबाबत अनभिज्ञ असतात. याच बाबीवर मूलभूत शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. यामध्ये जमीन व्यवस्थापनाची सामान्य तत्त्वे ,शाश्वत शेतीसाठी जमीन वापर आणि जमीन संवर्धन, कृषी अर्थशास्त्राची तत्त्वे जसे, की पुरवठा आणि मागणी, किंमत, बाजार विश्लेषण आणि इतर आर्थिक बाबी,

मृद् विज्ञान :

मातीची निर्मिती, प्रकार, रचना, पोत, तापमान, सुपीकता, धूप आणि संवर्धन, निचरा आणि सिंचन, जलचक्र, वनस्पतींच्या वाढीची तत्त्वे, वनस्पती शरीरविज्ञान आणि वनस्पती सामग्रीची वाहतूक कशी पीक उत्पादन, तण, कीड आणि रोग नियंत्रण, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि शेतातील रसायनांचा जबाबदारीने वापर, पशुधन शरीरशास्त्र, पशुधन उत्पादन, कुरण व्यवस्थापन.

कृषी, पर्यावरण शिक्षणातील प्रयोग ः

नयी तालीम, सेवाग्राम येथील प्रयोग : काही वर्षापूर्वी सेवाग्राम येथे जाण्याचा योग आला असता, वर्धा येथील सेवाग्राम मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक स्तराच्या विद्यार्थ्यांना शेतीचे प्रात्यक्षिक देण्यात येते. मुलांनी गट करून त्यांना दिलेल्या छोट्या तक्यातील जमिनीवर प्रात्याक्षिके करावयाची असतात. यामध्ये कोथिंबीर ,मेथी इत्यादी प्रकारच्या भाज्या लावण्यास शिकवले जाते. या प्रात्यक्षिकांचा दूरगामी परिणाम मुलांच्या शेतीबद्दल आकलनात होतो.

नदी की पाठशाला : महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘चला जाणू या नदीला‘ हे नदी समजून घेण्याचे अभियान राज्यभर सुरु केलेले आहे. यामध्ये शालेय शिक्षण विभाग देखील हिरिरीने सहभागी झालेला आहे. शालेय विद्यार्थ्यांना नदी आणि विविध हंगामातील भिन्नता लक्षात येते. थोड्या मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना काही प्रकल्प दिले जातात. या सर्वांचा परिणाम नदी समजाऊन घेण्यात होतो. ज्यांना नदी चांगली समजली त्यांच्या कडून आयुष्यभर नदी संबंधी चांगले व्यवहार होतात.

जीवित नदी : पुण्यातील शैलजा देशपांडे आणि त्यांच्या गटाने गेल्या काही वर्षांपासून पुण्यात ‘जीवित नदी अभियान' सुरू ठेवले आहे. दर आठवड्याला नदी भ्रमंती असते. मुलांना नदीची गोष्ट सांगितली जाते. याचाही खूप सकारात्मक परिणाम होत आहे. अनेक तरुण युवक, युवती या कामात आपले योगदान देत आहेत.नदी सोबत मानवी व्यवहार हा यातील शिक्षणाचा गाभा आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अत्यंत चांगले उपक्रम कृषी शिक्षणाबाबत राबवले जातात त्यांचे अनुकरण मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत स्तरावरील शालेय शिक्षण समिती तसेच जलसंधारण आणि पाणी पुरवठा समिती यांनी समन्वयाने आपापल्या गावातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन असे अनुकरण नक्कीच करू शकतील. शाळांना ,विद्यार्थ्यांना शिक्षकांना प्रोत्साहनपर उपक्रम देखील राबविले जाऊ शकतात

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com