
Nashik News : जिल्ह्यातील रब्बी तसा बेभरवशाचाच... खरिपात अतिरिक्त पाऊस झाला तरच रब्बीचे स्वप्न फुलते. या वर्षी हंगामाच्या शेवटी झालेल्या पावसाने जिल्ह्यातील रब्बी फुलविला आहे. चांगल्या पावसामुळे क्षेत्रात वाढ झाली असली तरी मक्यावरच शेतकऱ्यांनी विश्वास ठेवल्याचे दिसते. काही भागात गव्हासह हरभऱ्याची वाढ झाली असून, रब्बीच्या आतापर्यंत ९५ टक्क्यांवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
खरिपासाठी अनुकूल असलेला जिल्हा रब्बीसाठी मात्र काहीसा प्रतिकूल आहे. त्यामुळे अर्ध्या जिल्ह्यात रब्बी जवळपास पावसावर अवलंबून असतो. जिल्ह्यात धरण, कालवा लाभक्षेत्र मर्यादित असून, विशेषतः पावसाच्या पाण्यावरच शेतीचे भवितव्य अवलंबून असते. दिवाळीच्या दरम्यान चांगला पाऊस होतो, ते वर्ष रब्बीसाठी फलदायी असते अन्यथा अर्धा जिल्हा रब्बीपासून दूरच असतो.
येवला, मालेगाव, नांदगाव, सिन्नर या तालुक्यांना तर दर दोन किंवा तीन वर्षांच्या आत एक वर्ष रब्बीच्या पिकावर पाणी सोडण्याची वेळ येते. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यातील रचना विषमतेची असून, अनेक भागात कालव्याचे पाणी पोचलेले नाही. जोडीनेच सह्याद्रीच्या पर्वतरांगा, डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरात फेब्रुवारीनंतर पाण्याची टंचाई जाणवते. त्यामुळे जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्रही अल्प आहे.
जिल्हा तसा खरिपाचा असून, खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख ३५ हजार असताना रब्बीचे क्षेत्र मात्र एक लाख १३ हजार हेक्टरच्या आसपास आहे. तर एक हजार ६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावेच रब्बी हंगामाची असून, दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पाऊस समाधानकारक झाल्यास खरिपाच्या पेरण्या शंभर टक्क्यापेक्षा अधिक होतात, अन्यथा रब्बी हंगाम अडचणीतच सापडतो. मागील वर्षी दुष्काळामुळे तर रब्बीवर पाणी भरावे लागले होते, या वर्षी थोडी समाधानकारक स्थिती आहे.
असे आहे क्षेत्र..
सरासरी क्षेत्र १,१३,५७६
झालेली पेरणी १,०७,७५७
पेरणी क्षेत्र टक्के ९५
तीस हजार हेक्टरवर वाढ
गेल्या वर्षी जिल्ह्यातील तुरळक भागातच पेरणी झाली होती. बागायतदारांच्या तालुक्यात खरिपात ७६ हजार हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली होती. या वर्षी मात्र एक लाख सात हजार हेक्टरवर पेरणी उरकली आहे. या वर्षी कमी भांडवलात अधिक उत्पादन देणाऱ्या मक्याने खरिपात शेतकऱ्यांना मालामाल केले आहे. त्यामुळे रब्बीतही मक्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. गव्हाचे क्षेत्रही वाढले असून, जिरायती व बागायती क्षेत्रात हरभरा वाढला आहे. त्याचवेळी ज्वारीत घट झाली आहे. बदलत्या परिस्थितीत पीक पॅटर्न काहीसा बदललेला दिसतोय.
अवर्षणप्रवण भागात पाणीबाणी!
जिल्ह्याच्या अवर्षणप्रवण पट्ट्यात, पूर्व भागात काही ठिकाणी विहिरी व कूपनलिकांनी माना टाकल्याने टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांवर संक्रांत येऊ शकते. अनेक शेतकऱ्यांचे पीक शेवटच्या टप्प्यात असताना पाणी आटले आहे. परिणामी, शेततळ्यावरच आता भिस्त उरली आहे, तर बागायतदारांच्या पट्ट्यात उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.