Hingoli News : राज्य शासनाने कापूस व सोयाबीन उत्पादकांना जाहीर केलेल्या अर्थसाह्य योजनेअंतर्गत शुक्रवारपर्यंत (ता. २७) हिंगोलीतील २ लाख ४० हजार २० शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले होते. तर १ लाख ६३ हजार ५६१ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित होते.
उर्वरित शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले. गतवर्षी (२०२३) बाजारभाव कमी झाल्यामुळे कापूस व उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याबद्दल राज्य शासनाकडून खरिपातील ई-पीकपाहणी पोर्टलवर नोंद असलेल्या कपाशी व सोयाबीनच्या क्षेत्रानुसार परिगणना करून अर्थसाह्य देण्यात येणार आहे.
२० गुंठ्यांपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार रुपये, तर २० गुंठ्यांपेक्षा अधिक क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अर्थसाह्य २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व नाहरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत संकलित करून शासनाने महाआयटीकडून तयार केलेल्या www.scagridbt.mahait.org.in वेबपोर्टलवर माहिती भरली जात आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये एकूण १६८ कृषी सहायक आहेत. कापूस उत्पादक ३७ हजार ९६ व सोयाबीन उत्पादक ३ लाख ६६ हजार ४६० मिळून एकूण ४ लाख ३ हजार ५५६ शेतकरी आहेत. त्यापैकी ३ लाख ३ हजार ५५९ शेतकऱ्यांची (७५.२२ टक्के) माहिती भरणे पूर्ण झाले. पात्र लाभार्थ्यांच्या आधारक्रमांक संलग्न बँक खात्यांत अर्थसाह्याची रक्कम जमा होते याची खात्री करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.
हिंगोली जिल्हा कापूस, सोयाबीन अर्थसाह्य स्थिती
तालुका ई-केवायसी पूर्ण ई-केवायसी प्रलंबित
हिंगोली ४८२१५ ३७१६७
कळमनुरी ४२६२४ ३५२१२
वसमत ५०८५८ ३०८४५
औंढा नागनाथ ३८२६३ २६१९८
सेनगाव ६००६० ३४१२९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.