Monsoon Update : कुठे दडला मॉन्सूनचा पाऊस?

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात सहा जुलैपर्यंत किती पाऊस होतो ते बघायला हवे. त्या पावसामुळे जमिनीत किती ओल येते याचा अंदाज घेऊन सहा जुलैनंतर पुरेशी ओल असेल तेथे योग्य वाफशावर तीन ते साडेतीन महिने कालावधीच्या खरीप पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon
Published on
Updated on

माणिकराव खुळे

Today Monsoon News : या वर्षीच्या मॉन्सूनमध्ये जोरच दिसत नाही. घाट माथ्यापर्यंतच संथपणे साधारणच पाऊस बरसत आहे. परंतु पालघर, ठाण्यासह तळ कोकणात मात्र गेल्या पंधरवाड्यापासून चांगलाच पाऊस कोसळत आहे.

मॉन्सूनच्या सध्याच्या ताकदीनुसार साधारण एक ते दीड किमी उंच अशा सह्याद्रीवर चढून आल्यावर सह्याद्रीच्या साधारण २०० किमी रुंदीच्या घाट माथ्यावरील पूर्व- पश्‍चिम पट्ट्यातच पाऊस पडून मॉन्सूनची ताकद सध्या तेथेच संपून जात असल्याचे जाणवते.

मॉन्सूनची ताकद तेथेच का संपून जात आहे? तर या २०० किमी रुंद घाटमाथ्यावरच मॉन्सूनच्या रेंगाळण्यामुळे पुढे सह्याद्रीचा दक्षिणोत्तर घाट उतरायला व तेथून पुढे सरकण्यास मॉन्सूनला लागणारी अधिक आवश्यक असणारी ताकद कमी पडल्यामुळे मॉन्सून सह्याद्रीचा एक ते दीड किमी उंचीचा घाट खाली उतरण्यास तयार नाही.

मग या मोसमी पावसाला घाटमाथ्यावरून वर निर्देशित केलेल्या मध्य महाराष्ट्रातील वर्षाछायेच्या जिल्ह्यांत उतरण्यासाठी अरबी समुद्राहून त्याच्याबरोबर आलेल्या व आवश्यक लागणाऱ्या आर्द्रतेच्या ऊर्जेच्या ताकदीबरोबरच त्याला कवेत उतरून घेण्यासाठी बंगालच्या उपसागरावरून आलेली एखादी मजबूत कमी दाब क्षेत्र प्रणालीची आवश्यकता असते.

सध्याच्या त्याच्या सरासरी कालावधीत नेहमी असते तशी नैसर्गिकपणे बंगालच्या उपसागरात तयार होऊन मध्य भारतात येणे आवश्यक आहे. आणि नेमकी तीच मजबूत प्रणाली बंगालच्या उपसागराहून सध्या आलेली नाही. आणि त्याचं उत्तर कदाचित ‘एल-निनो’तच असावं, असे वाटते.

मग ती प्रणाली मजबूत तयार होऊन का आली नाही? तर त्या जागी त्या ठिकाणी सध्या बंगालच्या उपसागरातून हवेचा कमी दाब क्षेत्राची आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे कूच करणारी प्रणाली आहे, परंतु ती कमकुवत आहे.

Monsoon Update
Monsoon Rain : जुलैमध्ये महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे संकेत

सह्याद्रीतील घाटमाथ्यावरच पडत असलेला मॉन्सून मध्य महाराष्ट्राच्या वर्षाछायेच्या प्रदेशातील काहीशा मैदानी भागात घाट उतरून घेण्यासाठी व वेगाने खेचून कोसळण्यास मदत करण्यासाठी त्याची ताकद फारच अपुरी पडत आहे.

म्हणून सध्या केवळ घाटमाथ्यावरच किरकोळच पाऊस पडत आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्राच्या १० व मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांतील पश्‍चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्या प्रणालीचा कमकुवतपणा ‘एल-निनो’त आहे.

हाच तो ‘एल-निनो’चा परिणाम समजावा. याच दरम्यान ‘आयओडी’ जरी मजबूत असता, तरी मॉन्सून कोसळण्याच्या अति उच्च काळात कदाचित एल-निनोला न जुमानता नक्कीच धुवाधार पाऊस आपण अनुभवला असता. पण तेही झाले नाही.

जून ते सप्टेंबर चार महिन्यांचा मॉन्सून काळात चांगला पाऊस होण्यासाठी ज्या मुख्य चार प्रणाल्या आवश्यक आहेत, त्या म्हणजे...पहिली प्रणाली म्हणजे आग्नेय दिशेकडून वायव्य दिशेकडे समुद्रसपाटीपासून अधिक उंचीपर्यंतचा व रुंदीचा हवेच्या निर्वात पोकळीचा कमी दाब क्षेत्राचा पट्टा म्हणजेच मॉन्सूनचा आस देशाच्या मध्यावरून जाणे गरजेचे असते.

जितका आस देशाच्या मध्यावर किंवा दक्षिणेकडे तितका अधिक पाऊस महाराष्ट्र व मध्य भारतात असतो. अर्थात, जेव्हा मॉन्सून संपूर्ण देश काबीज करेन तेव्हाच त्याला मॉन्सून आस म्हणतात. सध्या मॉन्सूनने देश काबीज केलेला नाही. म्हणून मॉन्सूनच्या सध्याच्या वाटचालीच्या काळात ‘पूर्व- पश्‍चिम आस’ म्हणूनच संबोधले जात आहे.

यामुळे सध्याच्या याच प्रणालीमुळे विदर्भ, खानदेश व मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली व लगतच्या पूर्वेकडील भागात चार दिवसांपूर्वी मध्यम का होईना पाऊस झाला आहे.

दुसरी प्रणाली म्हणजे अरबी समुद्रात गुजरात ते केरळ पश्‍चिम किनारपट्टीत समुद्रसपाटीपासून साधारण दीड किंवा त्यापेक्षा अधिक उंचीपर्यंतचा हवेच्या कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजेच इंग्रजी ‘V’ अक्षरासारखा द्रोणीय तटीय आस म्हणजेच त्याला ‘ऑफ-शोर-ट्रफ’ म्हणतात. त्याचे अस्तित्व गरजेचे असते. सध्या तेथे त्याचे अस्तित्व आहे. त्यामुळे सध्या कोकण, घाटमाथा येथे जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत मध्यम पाऊस होत आहे.

तिसरी प्रणाली म्हणजे विषुववृत्त ओलांडून दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवर ‘मलावी’ सोमालिया देशाच्या भूभागाला धडकून अरबी समुद्राहून नैॡत्य दिशेकडून येणारे दीड ते दोन किमी उंचीपर्यंत देशाच्या पश्‍चिम किनारपट्टीकडे वाहणारे वेगवान समुद्री मॉन्सूनी वारे वाहणे गरजेचे असते. त्यामुळे कोकण, घाटमाथा व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत चांगला पाऊस होतो.

परंतु त्यासाठी मॉरिशस, मादागास्कार, अशा दक्षिण गोलार्धातील समुद्री समूहातील मस्करीन बेटाजवळ समुद्रसपाटीपासून एक ते दीड किमी उंचीपर्यंत हवेचा उच्च दाबाचे क्षेत्र व त्यातून प्रत्यावर्ती चक्रीवादळासारखी घड्याळ काट्याच्या विरुद्ध दिशेने (दक्षिण गोलार्धात असल्यामुळे) वारे भोवऱ्यासारखे आत मध्य-बिंदूकडे फेकणाऱ्या वाऱ्यांची स्थिती होणे गरजेचे असते.

सध्याच्या काळात या एल-निनो वर्षात दक्षिण गोलार्धातील हवेच्या उच्च दाबाचा ‘मस्करीन हाय’ हा त्याच्या सरासरी दाबापेक्षा गेल्या काही दिवसांपासून कमी-अधिकच आहे. विशेषतः कमीच आहे आणि हीच स्थिती मजबूत नसल्यामुळे ताकदीने सह्याद्री ओलांडणाऱ्या मोसमी वाऱ्याचा अभाव या एल-निनो वर्षात जाणवत आहे.

चौथी प्रणाली म्हणजे ‘ईस्टरली जेट’ ही होय. मॉन्सून काळात हिमालयातील तिबेटच्या पठाराजवळ नेहमीचं तयार होणाऱ्या हवेच्या उबदार उच्च दाब क्षेत्रामुळे त्यातून प्रत्यावर्ती चक्रीवादळासारखी घड्याळ काट्याच्या दिशेने (उत्तर गोलार्धात असल्यामुळे) वारे भोवऱ्यासारखे बाहेर फेकणाऱ्या वाऱ्यांची स्थिती होणे गरजेचे असते.

बाहेर फेकण्याच्या स्थितीमुळेही वारे चेन्नई शहराच्या अक्षवृत्तावर जमिनीपासून दहा ते बारा किमी उंचीवर एकवटून पूर्वेकडे वळतात. म्हणजेच मॉन्सूनचे व्हिएतनाम किनारपट्टीपासून ते पाकिस्तान इराणपर्यंतच्या क्षेत्रात पूर्व-पश्‍चिम स्थलांतराचे ‘स्टिअरिंग’ या पूर्वेकडून येणाऱ्या अति वेगवान वाऱ्याचा झोतात म्हणजे ‘ईस्टरली जेट’ असते.

Monsoon Update
Monsoon Update : दक्षिण भारतात अतिवृष्टीचा अलर्ट, महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार

अर्थात, ईस्टरली जेटचा प्रभाव मॉन्सून पूर्ण देश काबीज केल्यावर विशेष जाणवतो. या प्रणाल्यांबरोबरच विषुववृत्त समांतकालावर पश्‍चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या ४५ ते ६० दिवस फेरा पूर्ण करणारे हवेचा कमी दाब क्षेत्र घेऊन चालणारे एमजेओ (मॅडन ज्युलिअन ऑशिलेशन) सायकलही मदत करत असतात.

सध्या मॉन्सूनवर एल-निनोचा प्रवास अधिक तीव्रतेने नसला तरी काहीसा मॉन्सून बरसत आहे. अजूनही सहा दिवस हातात असून, पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात जोरदार तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.

त्यामुळे महाराष्ट्रात सहा जुलैपर्यंत किती पाऊस होतो ते बघायला हवे. त्यामुळे जमिनीत किती ओल येते ह्याचा अंदाज घेऊन सहा जुलैनंतर पुरेशी ओल असेल तेथे योग्य वाफशावर तीन ते साडेतीन महिने कालावधीची खरीप पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही. अर्थात, तो निर्णय कृषी विभागाच्या सल्ल्याने घ्यायला हवा.

(लेखक भारतीय हवामान खात्यातील निवृत्त ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com