
Latur News : लातूर : हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीनसाठी ओलाव्याचा निकष बारावरून पंधरा टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र हा निर्णय घेऊन महिना उलटला तरी केंद्र सरकारचा निर्णय खरेदी केंद्रापर्यंत पोहोचलाच नाही. निकष बदलण्याच्या प्रतीक्षेत सोयाबीनचा ओलावा आपोआप कमी होऊन सोयाबीन चांगलेच वाळल्याचे शेतकरी सांगत आहेत.
या स्थितीत हमीभाव केंद्रावर खरेदीसाठी अडचणी कायम असून, शेतकरी बाजारातच सोयाबीन विक्रीला पसंती देत आहेत. यामुळे बाजारातील सोयाबीनचे भाव गेल्या महिन्यापासून चार हजार दोनशे रुपयांवर स्थिरावले असून, काही शेतकऱ्यांना सोयाबीनचे भाव वाढण्याची तर काहींना खरेदी केंद्रावरील अडचणी कमी होण्याची प्रतीक्षा आहे.
केंद्र सरकारने यंदा सोयाबीनची चार हजार ८९२ रुपये हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीपासून खरेदीला काही ना काही अडचणी येत गेल्या. पहिल्यांदा बारदाना नसल्याची तर नंतर सोयाबीनमधील ओलाव्याची अडचण आली. केंद्रावर बारा टक्के ओलावा असलेले सोयाबीन खरेदी करण्याचे बंधन आहे. यासोबत थोडाही कचरा किंवा डागळलेले सोयाबीन खरेदी केले जात नाही.
यामुळे हमीभावाने सोयाबीनच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. नोंदणीनंतर खरेदीचा मेसेज आल्यापासून शेतकरी विक्रीसाठी धावपळ करत आहे. सोयाबीन थेट केंद्रावर घेऊन न जाता त्याचे नमुने नेऊन दाखवत आहेत. केंद्रसंचालकांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर सोयाबीन विक्रीसाठी घेऊन जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांना तडजोडी कराव्या लागत असून, प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रुपये मोजावे लागत आहेत.
एक ते दोन किलो वजनही जास्त घेतले जात असून, त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहेत. हमीभाव केंद्रावर येणाऱ्या अडचणी पाहून अडत बाजारात सोयाबीन विक्रीला काही शेतकरी पसंती देत आहे. तर काही शेतकऱ्यांना अजूनही सोयाबीनचे भाव वाढण्याची आशा आहे. यासोबत काही शेतकऱ्यांना हमीभाव केंद्रावरील अडचणी दूर होण्याची प्रतीक्षा आहे. आता ओलाव्याचा निकषाची तेवढी धास्ती उरलेली नाही. १५ नोव्हेंबरला निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. या स्थितीत सोयाबीनमधील ओलावा कमी झाला असून कचरा व अन्य अडचणी कायम आहेत. यामुळे नोंदणी करून आणि मेसेज येऊनही शेतकरी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी ब्रेक घेत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.