
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी (ता.२०) नारायणगावचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी शनिवारी (ता.२०) सकाळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांशी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या.
या वेळी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार अतुल बेनके यांनी तर कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी ग्रामस्थांच्या वतीने ज्येष्ठ नेते पवार यांचा सत्कार केला.
या वेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, ज्येष्ठ नेते शरद लेंडे, अनंतराव चौगुले, अंकुश आमले, तुषार थोरात, मोहित ढमाले, वैभव तांबे, आदी मान्यवर व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, की राज्याला स्थिर व जनतेच्या हिताचे सरकार देण्यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढविणार आहोत. जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. कोणता मतदार संघ कोणी लढवायचा, कोण किती जागा लढवणार याबाबत एकत्र बसून निर्णय घेतला जाईल.
जागा वाटपात तिढा होणार नाही, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. सद्यःस्थितीत मी राज्याचा दौरा सुरू केला आहे. या माध्यमातून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून, एक वाक्यता करण्याच्या उद्देशाने त्यांचे मत जाणून घेण्यासाठी संपर्क मोहीम सुरू केली आहे.
जुन्नर, आंबेगाव, खेड विधानसभा उमेदवारीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, की पुणे जिल्ह्यात किती जागा लढवायच्या, कोण उमेदवार असणार याबाबत निर्णय झाला नाही. आमच्या पक्षातील अनेक जण इच्छुक आहेत. खासदार डॉ. कोल्हे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे आम्ही तिघे एकत्र बसून उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेऊ.
जुन्नर विधानसभेसाठी इच्छुक असलेले शरद लेंडे, सत्यशील शेरकर, अंकुश आमले, मोहित ढमाले, तुषार थोरात, अनंतराव चौगुले यांच्याशी शरद पवार यांनी संवाद साधला. तुम्ही सहा जण एकत्र बसून एका उमेदवाराचे नाव जिल्हाध्यक्षांकडे द्या, असा सल्ला या वेळी शरद पवारांनी दिला.
‘लोकसभा निवडणुकीत आम्ही एक नंबर’
‘‘लोकसभा निवडणुकीत माझ्या पक्षाचे दहापैकी आठ उमेदवार विजयी झाले. टक्केवारी पाहता आम्ही एक नंबरला आहोत. मात्र विधानसभेसाठी एक, दोन, तीन असा विचार न करता महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे पक्ष) आम्ही एकत्र बसून निर्णय घेणार आहोत.
जागा वाटपात तिढा निर्माण होणार नाही, तसेच कोणतीही अडचण येणार नाही, असेही शरद पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या यशामुळे विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, की कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. यामुळे हे यश मिळाले आहे. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढणे साहजिक आहे. इच्छुकांना एकत्र बसवून एक वाक्यता करून निर्णय घेतला जाईल.
‘कोणतीही राजकीय चर्चा नाही ’
आमदार अतुल बेनके यांच्या भेटीबाबत बोलताना शरद पवारांना विचारले असता, ते म्हणाले, की त्यांचे वडील स्व. वल्लभशेठ हे माझे मित्र होते. आमदार अतुल हा त्यांचा मुलगा आहे. त्यांनी माझी भेट घेतली यात नवीन काय आहे. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी पक्षाचे काम केले. त्यांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी मात्र आमची आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.