Vikas Godage Mithun : मिथुनचे उपकार आहेत अनेक पिढ्यांवर...

रांब्याच्या खिशात गुटख्याची माळ असायची तो सगळ्यांना एकेक पुडी द्यायचा आणि पुडी तोंडात टाकुन ती अंगठ्याने अशी थियटरमध्ये उडवून द्यायची. आणि पुढे पाचकन थुंकून पिक्चर कधी चालु होतोय याची वाट बघत बसायचं.
Mithun Chakraborty
Mithun Chakraborty Agrowon

त्या काळी मी मिथुनचा (Mithun) `लढाई` हा एकच पिक्चर कुणीतरी चाळीतल्या मिथुनच्या पंख्याने व्हीसीआर वर आणला होता म्हणून बघितला असावा.

तरी बाकी माझे नवीन झालेले डॅशिंग मित्र सगळेच्या सगळे मिथुनचे फॅन आहेत, म्हणून मला पण मिथुनचं फॅन असायला पाहिजे असं वाटु लागलं. आणि मी धडाक्यात मिथुनचा फॅन पण झालो.

त्यासाठी काय विशेष एम्पीएस्सीची परीक्षा वगैरे पास व्हायची अट नसल्याने ते शक्य झालं.

Mithun Chakraborty
Vikas Godge article: मला आता कुठल्याच चहाची चव आठवत नाही...

त्या सगळ्याच्या सगळ्या मित्रांनी मला नवीनच जग दाखवलं होतं. मला बारावीतच घरच्यांनी संध्याकाळी कुठे गेलता किंवा रात्री कुठं गेलता किंवा ही काय घरी यायची वेळ आहे का असले प्रश्न विचारुन संकटात टाकलं नाही.

आणि मी पण बापाला विशेष संकटात टाकणारे प्रश्न विचारत नसल्याने सगळं व्यवस्थित चाललं होतं. संध्याकाळी झोपडपट्टीत मित्रांकडे गेलो की त्यांचं वेगळंच जग दिसायचं.

ते खूप जीव लावायचे. झोपडपट्टी अशीच माळावर बसलेली असल्याने त्यांच्या दारात चुली असायच्या. त्यांच्या आया-बायका चुलीवर कायतरी शिजवत किंवा भाकरी थापत असायच्या.

तिथंच त्यांच्या घरी जेवण करुन आम्ही गावात छाती फुगवून चालायचो आणि हवा वगैरे करायचो. हे जग कोणतं आहे? आपलं आहे की नाही? हा विचार मनात कुठेतरी आत खोल घोळत असावा. पण आता कुणाला घाबरायचं नाही हा विचार त्यापेक्षा मोठा होता.

त्यांच्या बरोबर गणपतीत , शिवजयंतीत, आंबेडकर जयंतीत किंवा कुणाच्या तरी लग्नात नाचताना लक्षात यायचं की , अरे हे जरा कलाबाजीनं नाचत आहेत.

डोक्याला रुमालाची पट्टी बांधून, ईनशर्ट करुन, पायात बुट वगैरे वगैरे घालून `खल्ली वल्ली खल्ली वल्ली`वर किंवा `मुंगळा मुंगळा`वर नाचताना त्यांची समाधी लागत आहे आणि आपल्याला तसं नाचता येत नाही, याची लख्ख जाणीव झाली.

मग त्यांनीच मला मिथुनचा रावणराज पिक्चर बघायला नेलं. थियटरमध्ये वाळुवर आम्ही पाच सहा जणांनी ओळीने बसून प्रत्येकानं पुढे थुकायला गोल आळं करून ठेवलं म्हणजे पुढं येऊन कुणी बसनार नाही.

रांब्याच्या खिशात गुटख्याची माळ असायची तो सगळ्यांना एकेक पुडी द्यायचा आणि पुडी तोंडात टाकुन ती अंगठ्याने अशी थियटरमध्ये उडवून द्यायची. आणि पुढे पाचकन थुंकून पिक्चर कधी चालु होतोय याची वाट बघत बसायचं.

पिक्चरला उशीर लागला की रांब्या ओरडायचा आणि शिव्या द्यायचा. पण पिक्चर चालू करणारा पण त्यांच्या घसटीतलाच असायचा.

Mithun Chakraborty
Vikas Godge: हॅपी न्यू इयर म्हणता म्हणता हातात नुसतं बंबुरं राहील...

तर रांब्या म्हणजे त्याचं नाव राम होतं हे सांगायलाच हवं. आणि रावणराज किंवा मिथुनचा कोणताही चित्रपट चालु झाला की मला खात्रीय ते बाहेरची सगळी दुनिया विसरून, मिथुनच्या जागी स्वःताला आणि त्याच्या हिरोईनच्या जागी शहरातल्या कॉलेजमधल्या एखाद्या पोरीला बघत असतील.

तीच पोरगी जी यांना कधीतरीच फक्त कॉलेजला जातानाच दिसते आणि यांच्याकडे हुंगुन सुद्धा बघत नाही. तल्लीन होऊन मिथुनला आणि हिरोईनला नाचताना बघणारी ही पोरं त्यांच्या आयुष्यातलं सगळं कष्ट, त्यांच्या झोपडीची एकच पडकी खोली, त्यात दारू पिऊन पडलेला बाप, ती पिंजारलेल्या केसांची आई जिनं सगळं आयुष्य त्या बापाला यांना कायतरी करुन भाकरी करुन घालन्यात घालवलं..हे सगळं विसरून जात असतील.

हे काही क्षण ते ह्या आयुष्यातील स्वप्नीय आनंद लुटत असतील याची मला खात्री आहे. किंबहुना त्यांनी माझ्याशी दोस्ती पण याचसाठी केली होती की मी कॉलेजला जाणारा आणि शिकणारा मुलगा आहे.

माझ्यामुळे त्यांना कधीतरी कॉलेजकडे फिरकता येतं आणि गावात आमचा पण एक शिकणारा दोस्त आहे असं दाखवता येतं.

यांच्या आयुष्यात दुःख फक्त घरीच नसतं तर दिवसभर बाहेर कायतरी काम करुन रात्री घरी पैसे घेऊनच जावे लागतात, हा पण मोठा प्रश्न होता. त्या पैशातून कधी बारमध्ये पार्टी, गुटखा कायम तोंडात आणि पांढरा बुट वगैरे घेऊन एक दुसरं जग जगल्याचं समाधान भेटत असावं.

तेव्हा मी कधीच न बघितलेली मिथुनची गाणी आज युट्यूबवर बघतो तेव्हा जाणवतं, रांब्या सेम टु सेम मिथुनसारखा नाचायचा. ते पाय मागे ठेऊन पुढे हेल देऊन केस हालवनं, ते हिरोणीला मिठीत घेणं. सेम टु सेम.

त्या काळी मिथुन नसता तर यांच्या आयुष्यात एक खुप मोठी पोकळी निर्माण झाली असती. यांना समाजात इज्जत पाहिजे असते, थोडंफार नाव पाहिजे असतं. ते मिळत नसतं म्हणून मिथुनचा फक्त डान्सच नाही तर त्याचा विद्रोह पण यांनी अंगिकारलेला असतो.

परवा पुण्यात सिंहगड रोडला तलवार घेऊन एकजन दुकानावर, कारवर मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो बघाताना मला रांब्याची आठवण झाली. एकदा भांडणं झालती तेव्हा रांब्या अशीच तलवार घेऊन गावात एकदोघांना मारीत सुटला होता. नंतर मला म्हणाला होता, " रडणारं कुणी नाय आपल्या मागं. एकदोघांना घिऊनच जात असतो." ते आठवलं आणि मला त्या पुण्यात तलवार घेऊन हवा करणाऱ्या पोराची दया आली होती.

नंतर मी गाव सोडलं वगैरे. काही वर्षांनी बार्शीत रस्त्यावर चालत येताना रांब्या दिसला. मी थांबून बोललो, बायकोची ओळख करुन दिली. त्याला खूप अप्रुप वाटत होतं. चिकटलोय म्हणला आता नगरपालिकेत. सकाळी दोन तास झाडलं की काम संपलं. पोरगं तिसरीलाय. चल की घरी...

नाही, घरी नको .उशीर होईन. जायचंय मला... म्हणून निघालो.

मिथुनचे उपकार आहेत अनेक पिढ्यांवर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com