दुधातून होईल कुपोषणावर मात...

१ जून हा जागतिक दुग्ध दिन म्हणून साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये दूध आणि त्यापासून मिळणाऱ्या पोषक घटकांच्या फायद्यांबाबत अवगत करणे, जनजागृती करणे हा आहे. जागतिक दूध दिवसाच्या माध्यमातून दूध उत्पादन, त्याच्या पौष्टिकतेचे महत्त्व आणि दुधाच्या विविध उत्पादनांसह आर्थिक महत्त्व समजाऊन घेणे आवश्यक आहे.
World Milk Day
World Milk DayAgrowon

आज भारतातील कुपोषणाचा (Malnutrition) विचार केला तर, जागतिक भूक निर्देशांकानुसार (Global Hunger Index) भारतात ३३ लक्ष लहान मुले कुपोषित आहेत. या ३३ लक्ष कुपोषितांमध्ये १७.५ लक्ष हे अति कुपोषित श्रेणीत मोडतात. या आकडेवारीत सर्वात वरती महाराष्ट्र (६.१६ लक्ष), बिहार (४.७५ लक्ष) आणि गुजरात (३.२० लक्ष) या राज्यांचा क्रमांक लागतो. कोरोना प्रादुर्भावामुळे जागतिक पोषण संकटावर मात करण्यासाठी नवीन आव्हाने उभी केली आणि कुपोषण, छुपी भूक आणि आहाराशी संबंधित असंसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी शाश्वत आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. २०१० पासून निकृष्ट आहारामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत १५ टक्के वाढ झाली आहे. सरकारने २००८ मध्ये माध्यान्ह भोजन योजना (Midday Meal Scheme) आणि २०१८ मध्ये पोषण अभियान सुरु केले असले तरी याचा फारसा प्रभाव कुपोषण कमी करण्यात झाला असे दिसत नाही.

जागतिक पोषण अहवाल २०२१ नुसार भारतीय आहारात फळे, शेंगा, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचे प्रमाण कमी आहे. जे वाढ, विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत. भारतात ज्या राज्यात दूध (Milk) आणि दुधापासून बनवणाऱ्या पदार्थाचे (Milk Product) सेवन जास्त आहे तेथील लोक अधिक सुदृढ आणि कष्टाळू दिसतात. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळांतर्गत येणाऱ्या पोषण संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये ११ राज्यांमधील ५ ते १५ वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासाअंती असे आढळून आले की, मुलांमधील खुंटलेली वाढ सात टक्यांनी कमी झाली. मुलांचे बॉडी मास इंडेक्स सुधारले. डोळ्यातील कमकुवतपणा कमी झाला. बौद्धिक पातळीत वाढ झाली. दूध आणि दुधजन्य पदार्थ कुपोषणाला आळा घालू शकतात.

भारत हा दुग्ध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत माध्यान्ह भोजन योजनेत दुधाचा समावेश करण्यामध्ये गुजरात आणि कर्नाटक राज्याने आघाडी घेतली आहे. मध्यान्ह भोजन आणि अंगणवाडी मार्फत लहान मुलांच्या आहारात दूध व दुधजन्य पदार्थांचा समावेश केल्याने मुलांना पोषक घटक प्राप्त होऊन कुपोषणाला आळा बसेल. सोबतच दुग्ध उत्पादनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जे लोक जोडलेले आहेत,त्यांच्या उत्पन्नात चांगला फरक पडणार आहे.

दूध हा संपूर्ण आहार ः

१) भारतीय संस्कृतीमध्ये अनादी काळापासून दुधाला एक विशेष स्थान आहे. लहान मुलांमध्ये दर दिवशी जेवढे पोषक घटक मिळायला पाहिजेत तेवढे ते पुरविले जात नाहीत किंवा ते त्यांना मिळत नाहीत.

२) दूध हा एक संपूर्ण आहार म्हणून संबोधला जातो. लहान मुलांची वाढ आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी लागणारे सर्व पोषक घटक दुधात आढळतात. म्हणूनच त्याला पूर्ण आहार संबोधतात.

३) १०० मिलि दुधामध्ये दैनंदिन कामासाठी लागणारी ऊर्जा (६० ते ६५ किलो कॅलरी), शरीर वाढीसाठी लागणारे प्रथिने (३.५ ग्रॅम), हाडांच्या मजबुतीसाठी लागणारी खनिजे जसे की कॅल्शिअम (११३ मिलि ग्रॅम ), फॉस्फरस (१०३ मिलि ग्रॅम ) मॅग्नेशिअम (१२ मिलि ग्रॅम), जीवनसत्त्व बी १२ (०.४५ युजी ), जीवनसत्त्व अ (४६), जीवनसत्त्व ड, रायबोफ्लेवीन (०.१७ मिलि ग्रॅम), फोलेट (५ युजी),

लोह(०.०३ मिलि ग्रॅम), झिंक (०.३७ मिलि ग्रॅम), आयोडीन (२० युजी).

४) यकृताचे आरोग्य आणि इतर चयापचयात महत्त्वपूर्ण कामगिरी निभावणारे फॉस्फोलिपीड आणि त्याचे उप घटक दुधामध्ये भरपूर प्रमाणात मिळतात.

५) दुधामधून मिळणाऱ्या कोलीनमुळे यकृत स्वस्थ राहते. मासपेशींच्या हालचालीस मदत करते. स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.

६) दुधातील बायोक्टीव पेपटाईडमुळे शरीरातील पेशींना बळ मिळते. दुधामधून मिळणाऱ्या पोषक घटकापासून मानवी प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत मिळते. दुधामधील स्निग्ध पदार्थाचे बारकाईने निरीक्षण केल्यास त्यामध्ये आपल्याला लहान, मध्यम आणि लांब साखळी असलेले फॅटी ॲसिड आढळतात, त्यापैकी मध्यम साखळी असलेले फॅटी ॲसिड हृदयासाठी पोषक ठरते.

------------------------------

संपर्क ः

डॉ. अमित शर्मा, ८८८८३३३४५०

( लेखक बर्ग + श्मिट (इंडिया) प्रा. लि., पुणे येथे पशुआहार तज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com