Agricultural Innovation : धाड परिसरात करडी, मासरूळ आणि अन्य काही छोट्या-मोठ्या तलावांच्या उभारणीने छोट्या छोट्या सकारात्मक बदलांनी ताल धरला. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता झाल्याने वर्षातून दोन किंवा तीन पिके देणाऱ्या भाजीपाल्याकडे लोक वळू लागले. हिरवा चारा उपलब्ध होऊ लागल्याने दुग्ध व्यवसायानेही बाळसे धरले. पहिल्यांदा प्रमुख पूरक असलेल्या या व्यवसायाने प्रत्येक खिशाला आधारच दिला असे नाही, तर तोच परिसरातील आर्थिक उलाढालीचा प्रमुख स्रोत कधी बनून गेला ते कळलेच नाही. गेल्या दीड, दोन दशकात धाड परिसरातील दुग्धक्रांती आता यशोशिखराकडे निघाली आहे.
पूर्वीही अनेक वेळा दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न झाले. दूध संकलन, डेअरी आल्या. पण त्या फारशा तग धरत नव्हत्या, कारण चाऱ्याची टंचाई. मात्र तलावांच्या माध्यमातून वाढलेल्या सिंचन सुविधांनी या परिसरात हिरवाई नटली. एक, दोन घरगुती गाई पाळणाऱ्या शेतकऱ्यांनी हळूहळू संख्या वाढवत नेली. गेल्या पाच-सात वर्षांत तर धाड हे दूध संकलनासाठीचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे.
चक्क विदर्भ-मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतून दूध येथे येऊ लागले आहे. शीतकरणानंतर पुढील प्रक्रियेसाठी ते पाठवले जाते. परिणामी येथील अर्थकारणाला गती मिळू लागली. आज गावात एक-दोन गाय-म्हशीच्या गोठ्यापासून शंभरावर गायी पाळणारेही आहेत. केवळ दुग्धविक्रीपुरता व्यवसाय मर्यादित न ठेवता काही जण स्वतःच उत्तम संकरित दुधाळ जनावरांची वंशावळ तयार करू लागले आहेत. अनेकांकडे उत्तम वंशाच्या गायी-म्हशींच्या विक्रीतूनही उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे.
पूर्वी शासकीय दूध संकलन सुविधा मोडीत निघाल्यामुळे पशुपालकांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. मात्र अलीकडे उभ्या राहिलेल्या सहकारी आणि खासगी डेअरीमुळे मोठा आधार मिळाला आहे. कितीही संकटे आली तरी आता आर्थिक स्थैर्य देणाऱ्या दूध व्यवसायापासून दूर हटायचे नाही, या ठाम निर्धाराने शेतकरी उभे आहेत. कोणत्याही व्यवसायाप्रमाणे दुग्ध व्यवसायातही एकापेक्षा एक संकटे आपली परीक्षा घेत असतात. कधी पशुखाद्य महाग होते, तर कधी दुधाला अपेक्षित दर मिळत नाही.
दूध उत्पादकांचा संघर्ष कायम सुरू असला तरी त्यांनी व्यवसाय टिकवून ठेवला आहे. जोडीला शेतीतील उत्पन्न साठू लागले. केवळ आर्थिक सुबत्ताच वाढली असे नाही, तर या धवलक्रांतीने अनेकांचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावला, हे वास्तव नाकारून कसे चालेल? उदरनिर्वाहानंतर शिल्लक बचतीच्या गुंतवणुकीतून नवे व्यवसाय आकाराला येत आहेत. या आर्थिक उत्पन्नांच्या नव्या स्रोतांमधून समृद्धीत भर पडते आहे. कुटुंबातील सर्वांच्या कष्टाचे चीज होत आहे. याची निवडक उदाहरणेही आहेत...
(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)
अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.