
Ahilyanagar News : कर्जत तालुक्यातील जिरायती भागाला सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या तुकाई सिंचन योजनेसाठी शासनाने ७ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील ५९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले असून १९ गावांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मृद् व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील तुकाई उपसा सिंचन योजनेसाठी ५९९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने ७ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा शासन निर्णय झाला आहे.
या शासन निर्णयाच्या अनुषंगाने तुकाई योजनेला चालना मिळणार असून, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रलंबित मागणी पूर्ण होणार असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या नवीन व प्रगतिपथावरील लघुसिंचन प्रकल्पांसाठी शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित केला होता. वित्त विभागाच्या सुधारित अंदाजाच्या मर्यादेत हा निधी वितरित करण्यात येत असून, तुकाई प्रकल्पाला यातील ७ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या योजनेअंतर्गत कर्जत परिसरातील २४ पाझर तलाव आणि ३ लघू पाटबंधारे तलाव भरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. एकूण १९ गावातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
कर्जत तालुक्यातील तुकाई सिंचन योजनेअंतर्गत २३ पाझर तलाव पुनर्भरण व सिंचनासाठी प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र मागील शासन काळात गोयकरवाडी, खंडाळा, वाघनळी आणि चांदे बुद्रुक येथील चार पाझर तलावांचा त्यामध्ये समावेश नव्हता. तुकाई सिंचन योजनेत चारही गावांचा समावेश करण्यात आला आहे.
जलसंधारणाची मोठी योजना
कर्जत तालुक्यातील बिटकेवाडी, खुरंगेवाडी, वालवड, सुपा, बहिरोबाचीवाडी, चांदेखर्द, चांदेबुद्रुक, मुळेवाडी, दगडवाडी, चिंचोली, गुरवपिंप्री, टाकळी खांडेश्वरी, थिटेवाडी, डिकसळ, गोंदर्डी, रेहकुरी, गोयेकरवाडा, खंडाळा, वाघनळी, या गावांसाठी वरदान असलेल्या तुकाई चारीचा प्रश्न आता मार्गी लागत आहे.
जलसंधारण विभागातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी योजना आहे. कुकडी कालव्यातून शिंदे गावातून उपसा सिंचन होऊन वालवडपासून वितरण होईल. बिटकेवाडीत या योजनासाठी सौरऊर्जा केली जाणार आहे. कुकडी कालव्याला जेव्हा अवर्तन सुटेल त्या प्रत्येक वेळी पाणी मिळणार आहे. प्रत्यक्ष सिंचन नसल्याने शेतकऱ्यांना यात भुर्दंड नाही. या ऐतिहासिक योजनेतून दुष्काळी गावांना मोठा फायदा होणार असल्याचे कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ नेते शेखर खरमरे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.