Manganga river : कोंडलेल्या ‘माणगंगे’ने घेतला मोकळा श्‍वास

Manganga river cleaned : सोलापूरसह सातारा आणि सांगली जिल्ह्यासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असणाऱ्या माणगंगा नदीच्या पुनरुज्जीवन झाले आहे. यात वैजिनाथ घोंगडे या ७७ वर्षीय तरुणाने पुढाकार घेतला
Manganga river
Manganga riverAgrowon
Published on
Updated on

सुदर्शन सुतार : अॅग्रोवन वृत्तसेवा

Solapur News : भूभागावरील नद्या या जीवनवाहिन्या आहेत, मात्र मानवी हस्तक्षेपाने या नद्यांना प्रदूषण, अतिक्रमणांचे ग्रहण लागले आहे. विद्यमान आणि भावी पिढींना या अक्षम्य दुर्लक्षाचे भोग भोगावे लागत आहेत आणि लागणार आहेत. मात्र अशाही स्थितीत या सरितांना पुनर्वैभव मिळून देण्याचे काम काही पथदर्शी करत असतात. वैजिनाथ घोंगडे त्यापैकीचे एक. त्यांच्या पुढाकारातून राज्याच्या तीन जिल्ह्यांतून वाहणाऱ्या माणगंगेच्या ७५ किलोमीटरच्या पात्राने मोकळा श्‍वास घेतला आहे...!

सोलापूरसह सातारा आणि सांगली जिल्ह्यासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असणाऱ्या माणगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचा ध्यास घेत वाडेगाव (ता. सांगोला) येथील वैजिनाथ घोंगडे या ७७ वर्षीय तरुणाने पुढाकार घेतला. ९ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर गेली अनेक

वर्षे गाळात रुतलेली, चिलार-झुडपांत हरवलेली माणगंगा नदी आणि या नदीवरील १८ बंधारे लोकसहभागातून स्वच्छ करत नदीला पुनर्वैभव प्राप्त करून दिले. माणगंगेच्या या पुनरुज्जीवनामुळे नदीचे १०० मीटरपर्यंत आकुंचन पावलेले पात्र ४००

मीटरवर पूर्ववत झाले, शिवाय तब्बल २०० कोटी लिटर पाण्याची साठवणक्षमता तयार झाली. तसेच नदीकाठच्या ३० गावातील १८०० विहिरी आणि २५०० हून अधिक बोअरच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली.

माणगंगा नदीचे पात्र सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील १६५ किलोमीटरपर्यंत विस्तारलेले आहे. दहिवडी (माण), आटपाडी, सांगोला, मंगळवेढा आणि पंढरपूर अशा पाच तालुक्यांचा प्रवास करून ही नदी सरकोली (ता. पंढरपूर) येथे शेवटी भीमा नदीला मिळते. श्री. घोंगडे मूळचे सांगोल्यातील वाडेगावचे.

Manganga river
Onion Export Ban : सोलापूर बाजार समितीत सोमवारी १४०० कांदा गाड्यांची आवक

माण, कोरडा व अफ्रुका या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम वाडेगाव येथे होतो. साहजिकच, या नद्यांविषयी लहानपणापासूनच त्यांना विशेष आकर्षण वाटत आलेले, पण गाळाने भरलेल्या, चिलार-बाभळीच्या झाडाझुडपांनी वेढलेल्या आणि पूर्णतः दुरवस्था झालेल्या नदीचे चित्र त्यांना अस्वस्थ करत होते, कृषी विभागात ते नोकरीला होते, पण १९९४ ला नोकरीतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर माणगंगा नदीच्या स्वच्छतेचा ध्यास त्यांनी घेतला, काम मोठे होते, सुरुवातही कठीण होती.

पण एका ध्येय्याने झपाटलेल्या घोंगडे यांनी हार मानली नाही, आपले प्रयत्न सुरूच ठेवले, पुढे या कामासाठी २०१४ मध्ये ‘माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्था’ या नावाने त्यांनी संस्था स्थापन केली आणि लोकसहभागातून नदी स्वच्छतेला सुरुवात केली.

२०१६ मध्ये प्रत्यक्ष त्यांच्या कामाला सुरुवात झाली. मुंबईच्या श्री बृहद्‌ भारतीय समाज न्यासाचे श्रीपाद हळबे, श्रीहर्ष फेणे यांच्यासह राजेवाडीच्या श्री श्री सद्‌गुरू साखर कारखान्याचे चेअरमन एन. शेषगिरीराव, सांगोल्याचे बाबूराव गायकवाड, आटपाडीचे तानाजी पाटील आदींनी या कामात त्यांना मोलाची साथ दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे, तहसीलदार श्रीकांत पाटील यांनीही मोठे साह्य केले.

नदीची परिक्रमा केली, पुस्तक लिहिले, पुस्तक विक्रीतून कामाची सुरुवात

नदीच्या पुनरुज्जीवनाच्या उद्देशाने घोंगडे यांनी माणगंगा नदीतून २०१० आणि २०१५ मध्ये दोन वेळा डॉ. विजय जाधव, डॉ. अप्पासाहेब पुजारी, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. अशोक शिंदे, संभाजी माळी, विठ्ठल चव्हाण, नारायण काटकर या सहकाऱ्यांसमवेत नदीपात्रातून संपूर्ण पायी प्रवास (परिक्रमा) केला आणि नदीपात्राची निरीक्षणे नोंदवली. नदीपात्राची दुरवस्था होण्याची कारणे शोधली. त्यावर सविस्तर वर्णनाचे पुस्तक त्यांनी लिहिले आणि याच पुस्तक विक्रीतून आलेल्या रकमेतून त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा हा प्रवास आणि उद्देश वाचून त्यांच्या प्रयत्नांना अनेकांनी मदतीचा हात पुढे केला.

Manganga river
Onion Market : सोलापूर बाजार समितीत एक दिवसाआड कांदा लिलाव

नऊ कोटींचे काम अडीच कोटींत, ३२२ एकर जमीन झाली बागायती

गेल्या नऊ वर्षांत कामाचे सातत्य ठेवून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ५३ किलोमीटर आणि सांगली जिल्ह्यातील २२ किलोमीटर असे एकूण ७५ किलोमीटर नदीपात्र चिलार-बाभळी मुक्त करून स्वच्छ केले आहे. तसेच आतापर्यंत या कामातून एकूण २० लाख घनमीटर गाळ काढण्यात आला, या कामासाठी शासकीय अंदाजपत्रकानुसार सुमारे ९ कोटी रुपये खर्च आला असता, पण केवळ लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागामुळे हे काम २ कोटी ६८ लाख ८० हजार रुपयांत झाले. त्याशिवाय हाच गाळ परिसरातील १९२ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने नेऊन त्यांच्या शेतात टाकून पडीक जमिनी पिकाऊ केल्या. या गाळामुळे परिसरातील सुमारे ३२२ एकर क्षेत्र बागायती झाले.

ठळक वैशिष्ट्ये

 दोनशे कोटी लिटर पाणीसाठवण क्षमता वाढली

 १८०० विहिरी, २५०० बोअरच्या पाणीपातळीत वाढ

 ७५ किलोमीटर नदीपात्र चिलार-बाभळीमुक्त

 २० लाख घनमीटर गाळ काढण्यात आला

 १९२ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ शेतात टाकला

लोकसहभाग आणि टीमवर्कमुळेच हे शक्य झाले, मी निमित्तमात्र; पण आता एका टप्प्यावर आम्ही आलो आहोत, त्याचे समाधान आहे. उर्वरित नदीपात्राच्या स्वच्छतेवर आमचे लक्ष आहेच. पण आता नदीपात्रासह नदीला मिळणाऱ्या ओढ्यांच्या स्वच्छतेवर आमचा भर राहील.
वैजिनाथ घोंगडे, अध्यक्ष, माणगंगा भ्रमणसेवा बहुद्देशीय संस्था, वाडेगाव-सांगोला ( ९४२००९३५९९)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com