Soybean Disease : सोयाबीनवरील हिरवा मोझॅक, कळी करपा रोगाचे व्यवस्थापन

Soybean Farming : सोयाबीनमध्ये सुमारे १५ पेक्षा जास्त विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. हिरवा मोझॅक, कळी करपा या विषाणूजन्य रोगांचा प्रसार होऊ नये, यासाठी वाहक किडींच्या नियंत्रणासोबतच अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा.
Soybean Disease
Soybean DiseaseAgrowon
Published on
Updated on

राजीव घावडे, डॉ. सतीश निचळ, मंगेश दांडग

Soybean Disease Management : राज्यामध्ये सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात जसजशी वाढ होत आहे, तसे त्यावरील रोगांचे प्रमाण वाढत आहे. त्यातही सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या १५ पेक्षा जास्त प्रकारच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होतो.

यातील बहुतांश विषाणूजन्य रोग हे पिकांसाठी थेट प्राणघातक ठरत नसले तरी त्यामुळे पिकाची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होतो. सामान्यतः एक विशिष्ट विषाणू एका विशिष्ट वनस्पतीवर प्रादुर्भाव करतो.

त्यांचा प्रसार हा काही वनस्पतीमध्ये आनुवंशिक रचनेच्या माध्यमातून, काही वनस्पतीमध्ये कीटकाद्वारे, तसेच वनस्पतीसारख्या होणाऱ्या बाह्यवृद्धीद्वारे, वंशवृद्धी, बियाण्याद्वारे आणि यंत्रे, अवजारे यांच्या माध्यमातून होतो.

विषाणूजन्य रोग हा कोणत्याही रासायनिक घटकांद्वारे संपूर्णपणे बरा होत नाही. म्हणूनच विषाणूचा प्रादुर्भावच होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता असते.

नेक्रॉसिस/ इंडियन बड

ब्लाईट किंवा कळी करपा

पूर्वी या रोगाची नोंद मध्य प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात दिसून आली आहे. एखाद्या साथीच्या स्वरूपात त्याचा प्रसार होऊन हा रोग अतिशय नुकसानकारक ठरतो. काही स्थितीमध्ये उत्पादनामध्ये १०० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते.

लक्षणे : या रोगाचे स्वाभाविक लक्षण म्हणजे झाडाचा शेंडा तपकिरी रंगाचा होऊन खालच्या बाजूने झुकून गुंडाळल्यासारखा हूक निर्माण होतो. यास ‘कळी करपा’ असे संबोधतात. झाडांची वाढ खुंटते.

पाने वेडीवाकडी (स्थानिक भाषेत -कोकडलेली) व करपलेली दिसतात. पानांची देठे काळी पडतात. शेंगा धारणा होत नाही. शेंगा धारणा झाल्यास कमी होते. यातील दाणे विकसित होत नाहीत.

रोगकारक घटक : नेक्रॉसिस हा रोग भारतामध्ये पीनट बड नेक्रॉसिस विषाणूमुळे होतो. तर अन्य देशांत या रोगाचा विषाणू टोबॅको रिंगस्पॉट व्हायरस असल्याची नोंद आहे.

प्रसार : रोगग्रस्त झाडाचा अन्नरस दुसऱ्या झाडाच्या सान्निध्यात आल्यामुळे आणि फुलकिडे या रसशोषक किडीद्वारे या रोगाचा प्रसार होतो.

प्रसारासाठी अनुकूल हवामान : तापमान २५ अंश सेल्सिअस पेक्षा कमी, दाट पेरणी, पिकास पाण्याचा खंड पडल्यास. वाहक फुलकिड्यांचा अधिक प्रादुर्भावामध्ये रोगप्रसार वेगाने होतो.

Soybean Disease
Soybean Disease : सोयाबीनवरील अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ‘कृषी विभागाकडून’कडून मार्गदर्शन

सोयाबीन मोझॅक (हिरवा)

सोयाबीन लागवड असणाऱ्या सर्वच भागात

कमी अधिक प्रमाणात हिरवा मोझॅक हा रोग आढळतो. या रोगामुळे उत्पादनात ५० ते ९३ टक्के घट होऊ शकते.

लक्षणे : रोगग्रस्त झाडांची वाढ खुंटली दिसते. पाने आखूड, लहान, जाडसर व सुरकुतलेली होतात. पानांमध्ये अत्याधिक हिरवेपणा दिसतो. अशा झाडांना शेंगा कमी व त्याही सुरकतलेल्या लागतात. शेंगा भरण्याच्या अवस्थेत रोग आल्यास झाडांद्वारे बियाण्यामध्येही त्याचा प्रादुर्भाव होतो. रोगग्रस्त बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलून करडा, तपकिरी काळपट होतो.

रोगकारक घटक व त्याचा वाहक : हा रोग पोटी विषाणू कुळातील सोयाबीन मोझॅक विषाणूमुळे होतो. या विषाणूसाठी वाहक मावा कीड काम करते.

प्रसाराकरिता अनुकूल हवामान : कमी तापमान १८ अंश सेल्सिअस व वाहक मावा किडींची संख्या अधिक असल्यास रोगाचा प्रसार अधिक होतो. अधिक तापमानात (३० अंश सेल्सिअस व त्यापेक्षा जास्त) लक्षणे झाडावर दिसत नाहीत.

प्रसार : दूषित बियाणे, रोगग्रस्त झाडाचा अन्नरस दुसऱ्या निरोगी झाडाच्या सान्निध्यात येणे आणि मावा कीड.

दूषित बियाण्याची लागवड केल्यास त्यात रोगाची वाढ होते. पुढे मावा किडीचा

प्रादुर्भाव झाल्यास उर्वरित रोपांमध्ये रोग पसरतो.

Soybean Disease
Soybean Crop Disease : विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोग, पांढऱ्या माशीचे एकात्मिक नियंत्रण

विषाणूजन्य रोगाचे व्यवस्थापन

उशिरा पेरणी असलेल्या सोयाबीन पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निरीक्षण आहे. दरवर्षी सोयाबीनची पेरणी जूनचा तिसरा आठवडा ते जुलैच्या दुसरा आठवड्यादरम्यान करण्याचा प्रयत्न करावा.

विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोगप्रतिकारक, सहनशील जातीची पेरणी करावी. उदा. जेएस-९३०५, जेएस-९५६०, एएमस-१००-३९ (अंबा), एएमस-एमबी-५-१८ (सुवर्णसोया), एएमस-२०१४-१ (पीडीकेव्ही-पूर्वा), एएमस १००१ (येलोगोल्ड), एमएयूएस (६१२), इ.

पेरणीनंतर २० व ३५ दिवसांनी निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) २ ते ३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

सोयाबीन पिकास शिफारशीप्रमाणे संतुलित खतमात्रा द्यावी. नत्राचा वापर अधिक केल्यास रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो.

शेतामधील व बांधावरील तणांचा व पूरक वनस्पतींचा नाश करावा. त्यामुळे तणांवरील विषाणू व त्यांचे वाहक यांच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण होतो. त्यांची संख्या कमी राहण्यास मदत होते.

रोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प व प्रथमावस्थेत असतानाच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. कारण रोगग्रस्त पिकांच्या आश्रयाने विषाणू जिवंत राहून पुढील प्रसारासाठी कारणीभूत ठरतो.

मोठ्या क्षेत्रावर एकाच वाणाची लागवड असल्यास प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे एकापेक्षा जास्त वाणांचा लागवडीसाठी उपयोग करावा.

आंतरपीक व मिश्रपीक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी आढळते.

मित्र कीटकांचे संवर्धन उदा. क्रायसोपा, लेडीबर्ड भुंगा या मित्र कीटकांची अळी ही मावा, फुलकिडे, पांढरी माशी व अन्य किडी किडींवर उपजीविका करतात.

उन्हाळी सोयाबीन पीक घेणे टाळावे. रोगग्रस्त क्षेत्रामध्ये उन्हाळी सोयाबीन लागवड अजिबात करू नये.

रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे हेक्टरी १६० या प्रमाणात लावावेत.

पांढरी माशी, फुलकिडे यांसारख्या रस शोषक किडींच्या व्यवस्थापनाकरिता आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. (प्रमाण प्रति लिटर पाणी.)

बीटा सायफ्लूथ्रीन (८.४९ टक्के) अधिक इमिडाक्लोप्रिड (१९.८१ टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.७ मिलि किंवा थायामेथोक्झाम अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (संयुक्त कीटकनाशक) ०.२५ मिलि किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (९.३० टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.६० टक्के) (संयुक्त कीटकनाशक) ०.४ मिलि.

मावा किडीच्या नियंत्रणाकरिता, इमिडाक्लोप्रिड (४८ टक्के एफएस) ०.२५ मिलि.

(लेबल क्लेम शिफारस.)

राजीव घावडे, ९४२०८४१४२१

(सहायक प्राध्यापक, सोयाबीन रोग शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन प्रकल्प, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com