Vermicompost Production: लेंडीपासून गांडूळ खतनिर्मिती

Goat Manure: शेतीतील जैविक क्रांतीसाठी लेंडीपासून गांडूळ खतनिर्मिती ही एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक पद्धत ठरत आहे. गांडूळे आणि लेंडीचा संयोग जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादनात क्रांती घडवू शकतो.
Vermicompost
VermicompostAgrowon
Published on
Updated on

डॉ विलास टाकळे, सतीश डोरले

Natural Fertilizer: सेंद्रिय खतामुळे जमिनीची सुपीकता वाढते. सध्या शेतकऱ्यांकडे गाई, म्हशींचे शेणखत तसेच शेळ्या, मेंढ्यांचे लेंडीखत उपलब्ध असते. जमिनीच्या वेगवेगळ्या थरात निरनिराळ्या लांबी, जाडीची गांडूळे आढळून येतात. आकाराने लहान असलेल्या जातीची गांडूळे साधारणत: जमिनीच्या १० ते २० सेंमी वरील थरात सापडतात. त्यांना सेंद्रिय पदार्थांचे खाद्य आवश्यक असते. गांडूळखत निर्मितीसाठी इसिनिया फेटीडा ही जात फायदेशीर आहे. तसेच पेरीओनिक्स एक्सकॅव्हेटस ही गांडुळाची स्थानिक जातसुद्धा खत तयार करण्यास उपयुक्त आहे.

लेंडी खताचे फायदे

शेणखतापेक्षा लेंडी खतामध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण अधिक असते.

जमिनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर सकारात्मक परिणाम दिसतो.

पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. पिकांसाठी चांगला पाणीपुरवठा होतो. सूक्ष्मजीवांची विविधता वाढते,जैवरासायनिक प्रक्रियांची क्रिया वाढते.

कोरडवाहू क्षेत्रात उत्पादन वाढीसाठी हे खत विशेष उपयुक्त ठरते.

भाजीपाला, फूलशेती आणि फळ पिकांसाठी लेंडीखत फायदेशीर आहे.

Chart
ChartAgrowon
Vermicompost
Vermicompost Sales : गांडूळ खत विक्रीतून विद्यापीठाला उत्पन्न

खत निर्मिती

पूर्णपणे सुकलेली लेंडी अतिशय टणक असते.ती सहज फुटत नाही.म्हणून ती उन्हाळाभर शेतात जशीच्या तशी राहू शकते. जेव्हा पाऊस सुरु होतो तेव्हा लेंडी पाणी शोषून घेते. अशा वेळेस मूळ आकारमानापेक्षा दोन ते तीन पट अधिक मोठी झालेली दिसून येते.त्यामुळे जमिनीची जलधारणा क्षमता वाढते. लेंडीखत वापर असलेली पिके कमी पाणी व अपुऱ्या पावसातही तग धरतात.

लेंडी खतापासून तयार केलेले व्हर्मिवॉश देखील पीक वाढीसाठी फायदेशीर आहे.

लेंडीखतात नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण शेणखताच्या तुलनेत जास्त असते. कारण शेळी प्रामुख्याने चराई करताना विविध प्रकारच्या झाडांचा पाला, औषधी वनस्पती खाते.

एक वयस्क शेळीपासून दिवसाकाठी ५०० ते ७०० ग्रॅम लेंडी प्राप्त होते. त्यामध्ये शेळीचे मूत्र, चारा कुट्टीचे केलेले उरलेले काड हे सर्व मिळून लेंडीखत बनवता येऊ शकते. गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना ती जागा पाण्याचा निचरा होणारी असावी. खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत कारण या झाडांची मुळे गांडूळ खतामधील पोषक घटक शोषून घेतात.

लेंडीखत बनविण्याच्या दोन पद्धती आहेत. मचाण पद्धतीमध्ये रुंद व लांब असे व्हर्मिबेड बनविले जातात. दुसऱ्या पद्धतीमध्ये एचडीपीई बेड चा वापर गांडूळ खत निर्मितीसाठी करता येतो.

बारा बाय चार बाय दोन फूट आकाराच्या एचडीपीई बेडची क्षमता १.५ टन आहे. एका बेडमध्ये १.५ टन लेंडीमिश्रित चार कुट्टी अवशेष आण लेंडी मिश्रण मावते.

दैनंदिन गोळा केलेली लेंडी प्रथमतः १५ दिवस पाणी शिंपडून ओली करून घ्यावी. कारण लेंडीमध्ये अमोनिया, मिथेन वायू जास्त प्रमाणात असल्याने त्यामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढत राहते.

पाणी मारत राहिल्यामुळे तापमान नियंत्रित थंड राहते आणि वायू निघून जातात.या ढिगाची उंची ६० सेंमी पेक्षा जास्त होऊ देऊ नये. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमध्ये ४० ते ५० टक्के पाण्याचे प्रमाण ठेवावे.

लेंडी खताच्या ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने किंवा बेडवर फॉगर लावून एक तास दररोज पाणी द्यावे. या सेंद्रिय पदार्थांचे तापमान २५ अंश सेल्सिअच्या दरम्यान ठेवावे.

Vermicompost
Vermicompost : गांडूळ खत तयार करण्याची शास्त्रिय पद्धत

बेड भरताना साधारणपणे एक फुटाचा पहिला थर हा लेंडी, मूत्र मिश्रित वाया गेलेली चारा कुट्टी, पाचट यांच्या मिश्रणाचा तयार करावा. त्यानंतर काळ्या मातीचा अर्ध्या इंचाचा थर द्यावा. पुन्हा बेडमध्ये एक फूट उंचीचा लेंडी खताचा थर पसरवून घ्यावा.

त्यावर अर्ध्या इंचाचा काळ्या मातीचा थर पसरवून घ्यावा.पूर्ण प्रक्रियेनंतर शेवटी वरील थरावरती पाणी मारून गोणपाटाने झाकून घ्यावा किंवा उसाचे पाचट, गहू, भाताचे काड पसरावे. पाच दिवस बेड भरून झाल्यानंतर बेड वरती पाणी शिंपडावे.

बेडवर दररोज पाणी शिंपडावे म्हणजे ओलसरपणा टिकून राहील. गांडुळाची चांगली वाढ होते. दर चार दिवसाला गोणपाटावर पाणी शिंपडावे. यामुळे लेंडी खतातील उष्णता कमी होते. कारण लेंडी खतातील उष्णता आणि शुष्कता वाढल्यास त्यापासून गांडुळास इजा होण्याची शक्यता असते. गांडुळांची संख्या वाढण्यास अडथळा तयार होतो.

चार दिवस लेंडी खताच्या बेडवर पाणी दिल्यानंतर पाचव्या दिवशी एकंदरीत ५ किलो आयसिनिया फेटीडा प्रजातीचे गांडूळ बेडमध्ये सोडावे. या प्रजातीचे वैशिष्ट्य असे की, ही गांडूळे उभ्या सरळ दिशेने २ फूट खोलवर जाऊन खत बनविण्याची प्रक्रिया गतीने करतात. त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

गांडूळ कल्चर सोडल्यानंतर दर ४ दिवसाने लेंडीखताच्या बेडवर पुरेसे पाणी शिंपडावे. बेडमधील तापमान तपासून पाणी फवारावे. उन्हाळ्यात किमान ३ दिवसांनी, हिवाळ्यात पाच दिवसांनी आणि पावसाळ्यात आवश्यकतेनुसार बेडमधील ओलावा आणि तापमान बघून पाणी द्यावे.

१५ दिवसांनी (किमान दोन आठवडे) उलटल्यानंतर १ किलो बेसन पीठ आणि २५० ग्रॅम सेंद्रिय गूळ मिश्रित स्लरी करून ती लेंडीखत बेडवर शिंपडून घ्यावी. यामुळे गांडुळांची संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे खत निर्मितीला चालना मिळते.

तीन दिवसांनंतर किमान १० किलो लिंबाचा पाला बेडवर पसरवून द्यावा, त्यामुळे कोणत्याही प्रादुर्भाव गांडुळांना होणार नाही. त्यांची प्रतिकारक्षमता वाढते.

साधारपणे एक बेड भरून झाल्यानंतर सरासरी ९० दिवसात लेंडीखत तयार होते. पाहिल्या थरातील खताची रचना चहाच्या पत्तीसारखी आढळून आल्यास हे खत तयार झाले आहे असे समजावे.

गांडूळ खताच्या पहिल्या थराची काढणी संपली की दुसरी काढणी किमान एक आठवड्यानंतर करावी. अशाप्रकारे खताची पूर्ण काढणी झाल्यावर बेडमध्ये एक फुटाचा थर शिल्लक राहिल्यावर त्याचा ढिगारा बनवून दोन तीन दिवस तसाच ठेवावा. यामुळे गांडुळे खताच्या ढिगाच्या तळात जातात. त्यानंतर तयार खत गोळा करावे.

गांडूळ खत आणि गांडूळे वेगळे करण्यासाठी उन्हामध्ये ताडपत्री अंथरूण त्यावर या गांडूळ खताचे ढीग करावेत. उन्हामुळे गांडूळे ढिगाच्या तळाशी जातात,त्यानंतर गांडूळखत गोळा करावे. लेंडी खताच्या एक बेडपासून अंदाजे ८०० किलो लेंडीखत तयार होते.

- सतीश डोरले, ७८७५८२९४५७

(वरिष्ठ संशोधन अधिकारी, बाएफ, वाघोली फार्म, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com