Solapur News : जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती आहे. तरी सर्व संबंधित जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणांनी पाणी व चाराटंचाईच्या उपाययोजना राबविताना गावनिहाय काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता. २६) येथे प्रशासनाला दिल्या.
पोलिस परेड ग्राउंड येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७४ व्या वर्धापन दिनानिमित्तच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी पालकमंत्री पाटील मार्गदर्शन करत होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल उगले-तेली, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, की प्रत्येक गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या शेल्फवरील कामाची संख्या मुबलक प्रमाणात ठेवावी. संबंधित गावातील लोकांची कामाची मागणी आल्यास तत्काळ त्यांना त्याच गावाच्या परिसरात रोजगार उपलब्ध होईल, यासाठी यंत्रणांनी दक्षता घ्या, जिल्हा परिषदेने ग्रामीण भागाकरिता पाणीटंचाई निवारणार्थ माहे- ऑक्टोबर २०२३ ते जून-२०२४ अखेर टंचाई आराखडा मंजूर असून, या अंतर्गत नऊ उपायोजनामध्ये ३ हजार २१ उपयोजना राबविण्यासाठी ५५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या टंचाई परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणीही कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून टंचाई वरील उपाययोजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.
आरोग्य योजनेचा आठ लाख लाभार्थींना लाभ
महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत जिल्ह्यात ७ लाख ९२ हजार गोल्डन कार्ड तयार करण्यात आली आहेत. या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी, प्रतिकुटुंब ५ लाखांचे आरोग्य विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे, ही सेवा जिल्ह्यातील ५१ व जिल्ह्याबाहेरील अंगीकृत रुग्णालयांमध्ये मिळत आहे. जिल्ह्यातील आठ लाख कुटुंबांना लाभ होणार आहे, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.
अग्रिमसाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा
जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ मध्ये सर्वसाधारण योजनेमध्ये १६७ कोटींच्या अतिरिक्त मागणीसह ९११ कोटी २८ लाखाचा प्रारूप आराखडा राज्य समिती समोर ठेवला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामाच्या पीकविमा भरला होता.
या अंतर्गत एक लाख ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन, मका व बाजरीचे २५ टक्के अग्रिम रक्कम एकूण १०२ कोटी ७७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत, ही अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करावा, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.