

Beed News : गतवर्षी सप्टेंबर महिन्यात १०० टक्के भरल्यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात आलेल्या माजलगाव धरणात यंदा मात्र केवळ ३९.५० दलघमी एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे. संपूर्ण पावसाळ्यात धरणात फक्त १२ दलघमी पाणी आले असल्याने अद्यापही धरण तहानलेलेच आहे.
परतीच्या पावसावरच धरण भरण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. पावसाळ्याच्या शेवटी धरणात १२.६६ टक्केच पाणी असल्याने माजलगाव, बीड या मोठ्या शहरांसह ११ खेड्यांवर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे.
बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यात हरितक्रांती निर्माण करून माजलगाव, बीड शहरासह परिसरातील ११ गावांची तहान भागविणारे माजलगाव धरण यंदा रिकामे होत आहे. हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणणाऱ्या या जलकुंभात यंदा केवळ साडेबारा टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.
पावसाळ्याच्या सुरवातीलाच हवामान खात्याने यंदाच्या मॉन्सूनवर अल निनोचा प्रभाव असल्याचा अंदाज वर्तविला होता. यावर्षी पावसाला सुरु झाल्यापासून माजलगाव तालुक्यासह माजलगाव धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस न पडल्याने धरणात पाण्याची आवक झालीच नाही. यंदाचा पावसाला संपत आला असून धरणात मात्र आतापर्यंत केवळ १२ दलघमी एवढेच पाण्याची आवक झाली असल्याने धरण मृत साठ्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होऊन पाच दिवस उलटले असले तरी, अद्यापही धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मोठा पाऊस झाला नाही. या धरणाच्या वरील कुंडलिका, बिंदुसरा यासारखी छोटीमोठी धरणेही अद्याप कोरडीच असल्याने माजलगाव धरण भरण्यासाठी मोठ्या मुसळधार पावसाची गरज आहे. यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही तर, पुढील वर्ष शेतकऱ्यांसाठी मोठ्या अडचणीचे जाणार असून धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीला पाणी मिळणार नाही.
धरणाची सद्यःस्थिती
माजलगाव धरणाची एकूण पाणी पातळी ४३१.८० मीटर असून एकूण जलसाठा ४५४ द.ल.घ.मी. एवढा आहे. सद्यःस्थितीत धरणात केवळ ३९.५० दलघमी एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे. पूर्ण क्षमतेने धरण भरण्यासाठी २७२ दलघमी पाण्याची आवक आवश्यक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.