Livestock Feed: पौष्टिक चाऱ्यासाठी मका, ज्वारी लागवड

Fodder Cultivation: दुग्ध व्यवसायात यशस्वी होण्यासाठी जनावरांना संतुलित व पौष्टिक आहार देणे आवश्यक आहे. खरीप हंगामात मका आणि ज्वारी यांसारख्या हिरव्या चारा पिकांची लागवड करून उत्तम दर्जाचा चारा उपलब्ध होतो.
Green Fodder
Green FodderAgrowon
Published on
Updated on

Nutrious Fodder: दुग्ध व्यवसायात मिळणारे उत्पादन हे पशूंच्या आनुवांशिकतेवर आणि त्याला मिळणाऱ्या संतुलित आहारावर अवलंबून असते. जनावरांची निरोगी वाढ व प्रजनन क्षमता टिकविण्यासाठी हिरवा चारा आवश्यक आहे. खरीप हंगामाचा विचार करता मका, ज्वारी यांसारख्या सकस चारा पिकांची लागवड करावी.

सुधारित चारा पिकांच्या जातींचे बियाणे केवळ कृषी विद्यापीठामध्ये मर्यादित स्वरूपात उपलब्ध असते. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातून बियाणे खरेदी केल्यावर आपल्याकडील उपलब्ध क्षेत्रापैकी एक चतुर्थांश क्षेत्र हे भविष्यात लागणाऱ्या बियाण्यासाठी राखून ठेवावे.

Green Fodder
Fodder Shortage : चाराटंचाईच्या काळात उपलब्ध पर्यायांवर भर द्या

मका

हे जलद वाढणारे, पालेदार, सकस, रुचकर, अधिक उत्पादनक्षम, पौष्टिक तसेच भरपूर शर्करायुक्त पदार्थ असणारे चारा पीक आहे. चाऱ्यापासून उत्तम दर्जाचा मुरघास तयार करता येतो. हिरव्या चाऱ्यात ९ ते ११ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.

लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त जमीन निवडावी. एक नांगरट व कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी ५ टन शेणखत मिसळावे.

आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-२, विजय या जातींची निवड करावी. हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीज प्रकिया करावी.

जून-जुलै महिन्यांत पाभरीने ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी. प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित ५० किलो नत्राचा दुसरा हप्ता पेरणीनंतर एक महिन्याने द्यावा.

कापणी साधारणपणे पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी) असताना करावी. हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ६०० क्विंटल उत्पादन मिळते.

Green Fodder
Mulberry Fodder Crop: तुती : जनावरांसाठी पोषक खाद्य

ज्वारी

अवर्षणप्रवण भागात व हलक्या जमिनीत तग राहणारे हे पीक आहे. चाऱ्याकरिता विकसित केलेल्या जाती सुमारे ३ ते ४ मीटर उंच वाढतात. ताटे हिरवीगार, पालेदार, रसाळ, रुचकर व पौष्टिक असल्यामुळे जनावरे आवडीने खातात. चाऱ्यात ८ ते १० टक्के प्रथिने असतात.

लागवडीसाठी मध्यम ते भारी व चांगली निचरा होणारी जमीन लागते. पूर्वमशागतीच्या वेळी हेक्टरी ५ टन भरखत म्हणून शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.

जून-जुलै महिन्यांत फुले गोधन, रुचिरा, फुले अमृता या जातींची ३० सेंमी अंतरावर पाभरीने पेरणी करावी. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. पेरणीसाठी हेक्टरी ४० किलो बियाणे लागते.

हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे. त्यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित ५० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.

पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी) असताना पिकाची कापणी करावी. हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ५५० क्विंटल उत्पन्न मिळते.

- डॉ. शिवाजी दमामे, ८२०८८०१०५९

(अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्प,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com