Pune News : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण मिळून जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक निकालात महायुतीची सरशी झाली आहे. २१ पैकी १९ जागांवर महायुतीचा विजय झाला. केवळ खेड आणि वडगाव शेरी या दोन जागांवर महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले.
देशाचे लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि योगेंद्र पवार या काका-पुतण्याच्या लढाईत काकाने पुतण्यावर जोरदार मात केली. अजित पवार यांना एकूण १,८१,१३२ एवढी मते मिळाली. ते एक लाख ८९९ मतांनी जिंकून आले.
आंबेगावच्या लढतीत मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिस्पर्धी देवदत्त निकम यांचा १५२३ मतांनी पराभव केला. मतमोजणी सुरू झाल्यापासून वळसे पाटील यांना विक्रमी आघाडी घेता आली नाही. तर अनेक फेऱ्यांमध्ये वळसे पाटील पिछाडीवर होते.
जुन्नरमध्ये आमदार अतुल बेनके (घड्याळ) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या लढतील अपक्ष (शिवसेना शिंदे गट बंडखोर) उमेदवार शरद सोनवणे यांनी आघाडी घेत विजय संपादन केला. सोनवणे यांनी ७३,३५५ मते घेत ६,६६४ मतांनी सत्यशील शेरकर (तुतारी) यांचा पराभव केला.
खेडमध्ये विद्यमान आमदार दिलीप मोहिते (घड्याळ) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. बाबाजी काळे (मशाल) यांनी १,५०,१५२ मते घेत मोहिते यांच्यावर ५१,७४३ मतांनी विजय मिळवला.
शिरूरमध्ये विद्यमान आमदार अशोक पवार (तुतारी) यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पवार यांनी माऊली कटके (घड्याळ) यांनी १,९२,२८१ मते घेत ७४,५५० मतांनी पवार यांना पराभूत केले. विद्यमान आमदार दत्ता भरणे (घड्याळ) यांनी ९७,२७१ मते घेत हर्षवर्धन पाटील यांच्यावर २०,७२५ मतांची निर्णायक आघाडी घेतली.
दौंडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी १,२०,७२१ मते मिळवत रमेश थोरात यांच्यावर १३,८८९ मतांची आघाडी घेतली. पुरंदरमध्ये तिरंगी लढतीत शिवसेनेचे (शिंदे गट) विजय शिवतरे यांनी १,२५,०८१९ मते मिळवत प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांचा २४,१८८ मतांची आघाडी घेत पराभव केला.
मावळमध्ये सुनील शेळके (घड्याळ) यांनी १,९१,२५५ मते घेत प्रतिस्पर्धी उमेदवार बापू भेगडे यांच्यावर १,०८, ५६५ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. भोर-वेल्हामध्ये शंकर मांडेकर (घड्याळ) यांनी १,२६, ४५५ मते घेत संग्राम जगताप यांच्यावर १९,६३८ मतांची आघाडी घेतली.
पुणे शहरातील भाजपचा बालेकिल्ला असलेला कोथरूड व कसबा या मतदार संघांत अनुक्रमे चंद्रकांत पाटील व हेमंत रासने यांनी विजयश्री खेचून आणली. चंद्रकांत पाटलांनी १,५९२३४ मते घेत, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे यांचा १ लाख १२ हजार४१ मतांनी पराभव केला. तर, रासने यांनी ९० हजार ४६ मते घेत, विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांचा १९ हजार ४२३ मतांनी पराभव केला.
पर्वतीमध्ये भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी १ लाख १८ हजार १९३ मते घेत, सलग चौथ्यांदा विजयी मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी अश्विनी कदम (तुतारी) यांचा ५४,६६० मतांनी पराभव केला. पुणे कँटोन्मेंटमध्ये भाजपचे सुनील कांबळे यांनी ७६०३२ मते घेत, प्रतिस्पर्धी काँग्रेसचे अविनाश बागवे यांचा १०, ३२० मतांनी पराभव केला. खडकवासला मध्ये भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी १,६३, १३१ मते घेत, प्रतिस्पर्धी सचिन दोडके (तुतारी) यांचा ५२, ३२२ मतांनी पराभव केला.
भोसरीमध्ये भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी २,१२,६२१ मते घेत प्रतिस्पर्धी उमेदवार अजित गव्हाणे (तुतारी) यांचा ६३ हजार ३३१ मतांनी पराभव केला. तर पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे (घड्याळ) यांनी १ लाख ९ हजार २३९ मते घेत, प्रतिस्पर्धी उमेदवार सुलक्षणा शीलवंत (तुतारी) यांचा ३६ हजार ६६४ मतांनी पराभव केला. तसेच, चिंचवडमध्ये भाजपचे शंकर जगताप यांनी २ लाख ३५ हजार ३२३ मते घेत विजयी झाले. त्यांनी राहुल कलाटे (तुतारी) यांचा १ लाख ३ हजार ८६५ मतांनी पराभव केला.
हडपसरमध्ये विद्यमान आमदार चेतन तुपे (घड्याळ) यांनी १ लाख २७ हजार ३५५ मते मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार प्रशांत जगताप यांचा ४ हजार ५३० मतांनी पराभव केला. शिवाजीनगरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ८४ हजार ६९५ मते घेत आपली जागा राखली आहे. त्यांनी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांचा ३६, ७०२ मतांनी पराभव केला. वडगाव शेरीमध्ये विद्यमान आमदार सुनील टिंगरे (घड्याळ) यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी बापू पठारे (तुतारी) हे सुमारे ४ हजार ७१० मतांनी विजयी झाले.
लक्षवेधी लढत
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीयातच बारामतीची निवडणूक झाली. यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे युगेंद्र पवार या काका-पुतण्याच्या लढाईत काकाने पुतण्याला अस्मान दाखविले आहे. अजित पवारांनी एक लाख ८९९ मतांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. तसेच आंबेगावच्या लढतीत मंत्री दिलीप वळसे पाटील यांना सुरुवातीपासूनच आपला गड राखण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागली. त्यांना केवळ १ हजार ५२३ मतांनी विजयश्री खेचून आणावी लागली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.