Washim News : जिल्ह्यात विधानसभा निवडणूक रंगतदार स्थितीत आली आहे. या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने दोन्हीकडे बंडखोरांनी मोठे आव्हान दिले आहे. त्यांच्यामुळे मतविभाजनाची चिंता उभी राहिली आहे.
वाशीम विधानसभा निवडणुकीत २१ उमेदवार नशीब अजमावत आहेत. मात्र, या मतदारसंघात खरी लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होत आहे. महायुतीकडून भाजपचे श्याम खोडे तर महाविकास आघाडीकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. सिद्धार्थ देवळे रिंगणात आहेत. या दोन्ही पक्षात प्रचंड बंडखोरी झाली आहे. भाजपमध्ये माजी जिल्हा महामंत्री नागेश धोपे अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत.
उबाठात तर बंडखोरांचे पीकच आले आहे. याच पक्षाचे राजाभैया पवार व निलेश पेंढारकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने सिद्धार्थ देवळे यांच्या अडचणीत वाढ झालेली दिसत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी भाजपचे लखन मलिक यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती.
आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश घेतला. शिवसेना फुटल्यानंतर पक्षासोबत राहणारे निष्ठावंत डावलून बाहेरून आलेल्यांना पक्षाने उमेदवारी दिली असा आरोप करीत पवार व पेंढरकर यांनी बंडाचे निशाण हाती घेतलेले आहे.
कारंजात स्थानिकचा मुद्दा गाजतोय
कारंजा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सईताई डहाके, वंचित बहुजन आघाडीचे सुनील धाबेकर, एमआयएमचे युसूफ पुंजानी व शरद पवार गटाचे ज्ञायक पाटणी अशी चौरंगी लढत होत आहे. या मतदार संघातील उमेदवार व बाहेरील उमेदवार हा मुद्दा समोर येत आहे.
सुनील धाबेकर हे अकोला निवासी आहेत तर ग्यानक पाटणी वाशीम येथील रहिवासी आहेत. हे दोनही उमेदवार बाहेरचे असल्याने स्थानिक उमेदवार स्थानिकचा मुद्दा प्रचारात अधोरेखित करीत आहेत. सुनील धाबेकर व ज्ञायक पाटणी हे दोघेही माजी आमदारांचे पुत्र आहेत. या दोघांनीही ऐनवेळी पक्ष बदलून निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे.
मालेगाव-रिसोडमध्ये रंगतदार लढत
जिल्हयातील मालेगाव-रिसोड मतदार संघातील कमालीची चुरस बनली आहे. याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आ. अमित झनक (काँग्रेस), महायुतीकडून आ. भावना गवळी (शिंदे शिवसेना) आणि माजी खा. अनंतराव देशमुख हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. देशमुख हे भाजपचे नेते आहेत. उमेदवारी शिंदे गटाकडे गेल्याने त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.