
Pune News : खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात मविआचा जुन्नरमधून बुधवार (२७ रोजी) शेतकरी आक्रोश मोर्चास सुरूवात झाली आहे. कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवावी ही मागणी मविआची आहे. याचबरोबर दूधास अनुदान मिळाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध व्हावे अशा देखील मागण्या या मोर्चातून करण्यात येणार आहे.
दरम्यान संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि डॉ. अमोल कोल्हे यांचे निलंबन करण्यात आले आहे. यानंतरच खासदार कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी 'शेतकरी आक्रोश मोर्चा' काढण्याचा निर्णय घेतला.
शेतकरी आक्रोश मोर्चातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबरच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला जाणार आहे. राज्य सरकारने खासगी आणि सहकारी असा भेद करत फक्त सहकारी संस्थाना दूध देणाऱ्या शेतकऱ्यांना ५ रुपये अनुदान जाहीर केले. मात्र खासगी आणि सहकारी असा भेद न करता सरकारने सरसकट दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या ही मागण्या
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे. तर पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवून सरसकट कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज धोरण लागू करण्याची मागणीही केली जात आहे.
प्रमुख सहा मागण्या
शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रमुख सहा मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मोर्चा काढला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेससह मित्रपक्षांचा सहभाग आहे. हा मोर्चा 27 ते 30 डिसेंबर दरम्यान असणार आहे. तर याचा समारोप पुण्यात होणार आहे.
कांदा निर्यातीवर बंदी
सध्या राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न चांगलाच तापला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली असून कांद्याचे भाव पडत आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध होत आहे. तर या धोरणाविरोधात आता शेतकरी देखील टीका करताना दिसत आहेत.
सरकारचे शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष
किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन शेतकरी आक्रोश मोर्चास सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती की 'रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका'. 'पण, शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेलं हे सरकार शेतकऱ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांचा हा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठीच शेतकरी आक्रोश मोर्चा आपण आयोजित केल्याचे', खासदार कोल्हे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.