Maharashtra Rain 2024 : राज्यात संततधार; अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ, जनजीवन विस्कळीत

Maharashtra Rain News Today : संपूर्ण राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र चिंचाग्रस्त असणाऱ्या बळीराजाला मोठा दिलासा मिळाला असून शेतीच्या कामांना वेग आला आहे.
Maharashtra Rain
Maharashtra RainAgrowon

Pune News : मॉन्सूनने राज्याचा निम्मा भाग व्यापला असून तो विदर्भापर्यंत गेला आहे. सध्या राज्यात मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. याचदरम्यान राज्यातील कोही जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला.

सोमवारी (ता.१०) विविध जिल्ह्यांना मॉन्सूनसह मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. लातूर, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तसेच समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे.

लातूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

लातूर जिल्ह्यात सर्वदूर मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून रात्रभर पाऊस झाला. लातूरच्या कासारशिरसी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ओढ्याला पुर आल्याने कासारशिरसी ते कर्नाटकात जाणारा मार्ग बंद झाला. तर अनेक दिवसानंतर पावसाची संततधार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Maharashtra Rain
Pre-Monsoon Rain : धाराशीव, धुळे, नाशिकसह जालन्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा; नाशिकची ७० ते ८० गावं अंधारात

लातूर शहरासह चाकूर, निलंगा, कासार सिरसी, निटूर, लातूर रोड, शिरोळ-वांजरवाडा, नळेगाव, रोहिणा भागात रात्रभर पाऊस झाला. दीड ते दोन तास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले.

तर लातूर - उदगीर महामार्गावरील नळेगाव येथील पुलाशेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला. परिणामी उदगीर लातूर महामार्गावरील देखील वाहतुक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांची फार मोठी अडचण झाली आहे.

जनावरांचा आठवडी बाजार भरला महामार्गावर

दरम्यान लातूर जिल्ह्यातल्या मुरुड गावात भरणारा आठवडी बाजार (ता.११) पावसामुळे लातूर बार्शी महामार्गावरच भरला. त्यामुळे महामार्गावर प्रचंड मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये विद्यार्थ्यांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

धाराशिवला जोरदार पाऊस

मराठवाड्याच्या बहुतांश भागात रविवारी मॉन्सूनचे आगमन झाले. त्यानंतर तेथे सलग दोन दिवस दमदार पावसाची बॅटींग पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालन्यात देखील सोमवारी जोरदार पावसाच्या सुमारास सरी बरसल्या. धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह धारा बरसल्या.

जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील औराद, गुंजोटीवाडी, पळसगाव, कदेर, मुरळी या गावांना मुसळधार पावसाचा फटका बसला. मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पाणी आले होते. येथील कोरेगाव-माडज रस्ता पाण्याखाली गेला.

तासगावची अग्रणी नदी तुडुंब

सांगली जिल्ह्यामध्ये देखील गेल्या चार दिवसांपासून मॉन्सूनची जोरदार फटकेबाजी हापायला मिळत आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तासगाव तालुक्यातून वाहणारी अग्रणी नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे.

तर गेल्या काहीच दिवसांपूर्वी या भागात भीषण दुष्काळाची स्थिती होती. अग्रणी नदी देखील कोरडीठाक पडली होती. पण गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे अग्रणी नदी ओव्हर फ्लो झाली असून नदी वरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर जून महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला आहे.

मिरजेत पुल वाहून गेला

सांगली जिल्ह्यातील विविध भागांना पावसाचा फटका बसत आहे. मिरज तालुक्यातील मालगाव जवळील पुल पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे मिरज मलगाव वाहतूक ठप्प झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला. सध्या टाकळीमार्गे फिरवण्यात आली आहे.

Maharashtra Rain
Nashik Rain : नाशिकमध्ये वादळी पावसाने उडवली कांदा शेडची दाणादाण; जिल्ह्यात दोघांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : चिंता मिटली

छत्रपती संभाजी नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या तिन दिवसापासून दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरसह मराठवाडाकरांची किंचींत चिंता दूर झाली आहे.

जायकवाडी धरणात अर्धा टक्का पाण्याची वाढ झाली असून ४ हजार ८३७ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. धरणात आलेल्या पाण्याने महिनाभर तहान भागू शकते. त्यामुळे ऐण दुष्काळात धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

जालन्यात पावसाची जोरदार बॅटिंग

जालन्यात रविवार पासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली असून मुसळधार पाऊसामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. जालना जिल्ह्यातील अनेक गावांत मृग नक्षत्राने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. तर जिल्ह्यातील आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक पावसाची नोंद केदारखेडा (१०५.७५) येथे झाली आहे. तर सर्वात कमी गोंधी (६६) येथे झाली आहे.

सोलापूर : सोलार पॅनेल उडाले, फळबागांचे नुसकान

सोलापूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला असून पावसामुळे मोहोळ तालुक्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. टरबूज, डाळिंब, केळी पिकांना फटका बसला असून लाखों रूपयांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान तत्काळ सरकराने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

बीडच्या माजलगावत मुसळधार पाऊस

बीडच्या माजलगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील नाकलगाव- पिंपळगाव रस्त्यावरील नदीला पूर आला. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांत पाणी वाढले आहे. त्यामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com