उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर नेमके काय गमावले आणि काय नुकसान झाले याचे विश्लेषण गेले दोन दिवस सुरू आहे. पण या क्लेशदायक घटनेचे एका ओळीत विश्लेषण करायचे असेल, तर ते म्हणजे दादांच्या रूपाने ग्रामीण महाराष्ट्राचा दोर तुटला आहे. .असे म्हणतात, की वटवृक्षाखाली झाडे बहरत, फुलत नाहीत. शरद पवार यांच्यासारख्या गेली पाच- सहा दशके राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील बलाढ्य नेता असताना अजित पवार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. सध्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशी प्रमुख पदे होती. त्यातील दादांच्या रूपाने एक उपमुख्यमंत्री पद रिक्त झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही नेते शहरी राजकारणातून पुढे आले आहेत. अजित पवार यांची राजकीय कारकीर्द सहकार क्षेत्रातून पुढे आली आहे..Ajit Pawar Passes Away: विकासाचा ध्यास घेतलेला दमदार नेता.सेवा संस्था, बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या आणि अन्य सहकारी संस्था या ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थवाहिन्या आहेत. तेथे शहरी भागातील एफएसआय, मेट्रो प्रकल्प आणि खोदकाम नसते. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागाचे वेगाने शहरीकरण होत आहे. या वेगाचा अंदाज लावणे कठीण आहे. पण शेती अजूनही केंद्रस्थानी आहे. बहुअंगी शेतीचे नेमके अर्थकारण काय आहे आणि सामान्य माणसावर त्याचा काय परिणाम होईल याचा नेत्यांचा दूरवरचा संबंध नसलेल्या काळात शेती, उद्योग, ग्रामीण विकासाची पक्की जाण असलेला नेता अजित पवार यांचे जाणे खूप नुकसानीचे आहे..शेतीचा अभ्यास दांडगा२१ व्या कृषी गणनेनुसार १ कोटी ७२ लाखांवर खातेदार शेतकरी आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यातील ९३ लाख खातेदार अत्यल्प भूधारक आहेत. हीच गोष्ट वेगळ्या अंगाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी २० वर्षांपूर्वी सांगितली होती. आता सर्वांनी शेतीवर अवलंबून राहण्याचे दिवस नाहीत. शेतीचे विभाजन झाले आहे. त्यामुळे एक भाऊ शेती करत असेल तर दुसऱ्याने अन्य उद्योग करावा. परंतु त्याला वेगळे वळण देत शरद पवार शेती सोडा असे सांगत असल्याची आवई उठविण्यात आली. शरद पवार यांच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. कृषी राज्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली..Ajit Pawar Pass Away: मान्यवरांची श्रद्धांजली!.मूळचा शेतकरी पिंड असलेले अजित पवार यांनी विविध खाती सांभाळली, पण जेव्हा ते शेतीवर बोलायचे तेव्हा त्यांचा व्यासंग समजत असे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे दर पडल्याने दुधाचे दर कोसळले होते. एरवी काटकसर करणाऱ्या अजित पवार यांनी तातडीने दुधाला अनुदान दिले. मात्र दुग्ध व्यवसाय विकास विभागातील एका अधिकाऱ्याच्या आडमुठ्या भूमिकेमुळे ते मिळू शकत नव्हते. आमदार विनय कोरे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडला. लगेच अजित पवार यांनी त्या अधिकाऱ्याची झारीतील शुक्राचार्य अशी संभावना करत भर सभागृहात दम दिला होता. त्यानंतर हे अनुदान मार्गी लागले..आधुनिक शेतीची त्यांना माहिती होती. त्यामुळे कृषी खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे त्यातही पवार यांच्या विश्वासू नेत्याकडे राहिले. अजित पवार यांनी आधुनिक शेतीसाठी काळाची गरज ओळखून कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी मागील अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘कात्रजचा घाट’ दाखवला ही गोष्ट वेगळी! कृषी ग्रामीण बहुद्देशीय बँकेच्या ३४ हजार ७८८ शेतकऱ्यांचे ९६४ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज माफ करून त्यांच्या ६९ हजार हेक्टरवरील कर्जाचा बोजा कमी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पाणीवाटपाच्या धोरणाचे ते शिल्पकार होते. पिण्याचे, शेती आणि उद्योगाच्या पाणीवाटपाचे धोरण त्यांनी आखले. अशा अनेक धोरणात्मक बाबी आगामी काळात ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनावर प्रभाव टाकत राहतील हे मात्र निश्चित!.Ajit Pawar Passed Away: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू.साखर कारखानदार हा कायम टीकेचा विषय आहे. मात्र कारखानदारांसोबत राष्ट्रवादीतील अनेक जण आहेत. सवते सुभे असलेले हे सुभेदार आहेत. काटामारीपासून अनेक आरोप त्यांच्यावर होत असतात. अनेक सहकारी साखर कारखाने खासगी केल्याचा अजित पवार यांच्यावर आरोप होता. परंतु या सगळ्यात मोठे नुकसान होत होते ते राज्य सरकारने दिलेल्या थकहमीवरील कर्जबुडव्यांमुळे!.सरकारची हमी घ्यायची आणि कर्ज बुडवायचे असे सर्रासपणे सुरू असताना जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले तेव्हा अजित पवार यांनी आता थकहमी मिळणार नाही, असे सभागृहात सांगितले. त्यानंतर ते भाजप सोबत गेल्याने त्यांचा नाइलाज झाला. त्यामुळे थकहमी पुन्हा दिली जाऊ लागली. अनेकदा ही थकहमी संचालक मंडळाच्या कारभारामुळे बुडत असे. त्यामुळे या कर्जाचा बोजा संचालकांच्या मालमत्तेवर चढविण्याचा निर्णय घेतला. या वेळीही अनेकांनी थयथयाट केला. एकंदरीत पाहायला गेले तर टीका करायला काहीच लागत नसते, पण राजकारणातील अपरिहार्यता म्हणून अनेकदा राज्याचे हित महत्त्वाचे ठरवून जेव्हा एखादा नेता काम करतो, तेव्हा त्याची योग्य दखल घेतली नाही तर तो अन्याय असतो..घड्याळ मिळाले, वेळ कमावलीपवार कर्तव्यकठोर होते. स्पष्ट होते, पण मन स्फटिकासारखे होते. विरोधी पक्षातील एक आमदार, ज्यांचे मत अगदी विरुद्ध होते ते बळे बळे त्यांना भेटायला गेलेले. पहिल्या टर्मचा आमदार म्हणून त्यांना विशेष वागणूक तर दिलीच, पण पुढील एक तास त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. इतकेच नाही तर ग्रामीण भागात असलेल्या समस्या आणि त्यासाठी निधी लागला तर या, असे त्यांना सांगितले. तो आमदार आत जाताना अजित पवार यांची परखड अशी प्रतिमा समजून गेला आणि येताना मात्र ग्रामीण भागाचा खडा न खडा माहीत असलेला नेता अशी प्रतिमा घेऊन आला..अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांची खरी कसोटी लागली होती. मात्र विधानसभा निवडणुकीने त्यांचे नेतृत्व सिद्ध झाले. जे करू ते परफेक्ट करू, या ध्यासाने ते भारले होते. घड्याळ चिन्ह त्यांनी मिळविले असले तरी वेळ मात्र त्यांनी कमावली होती. शेती, सिंचन, सहकार, ग्रामविकासाची नेमकी नस माहीत असलेला हा नेता संधी मिळेल तेथे न्याय देत गेला. प्रचंड क्षमता असलेल्या या नेत्याने जातीपातीचा विखार कधी शिवू दिला नाही. गावगाड्यात सर्व जातिधर्मांच्या लोकांचे नित्य संबंध असतात. शेतीमातीला जात, धर्म नसतो याची जाण पवार यांना होती. ते भाजपसोबत जातील असे अनेकांना वाटत नव्हते. मात्र विखारी राजकारण असह्य झाल्यानंतर त्यांनी तोही मार्ग निवडला. तरीही त्यांनी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे असे सांगून पुरोगामी चळवळीला थोडे का असेना बळ दिले.९२८४१६९६३४(लेखक ‘सकाळ ॲग्रोवन’चे मुंबई प्रतिनिधी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.