Mahabeej : शेतकर्‍यांसाठी अविरत झटणारे ‘महाबीज’

Seed Production : ‘महाबीज’ या ब्रँड नावाने प्रसिद्ध असलेले भारतातील सर्व राज्य बियाणे महामंडळांमधील सर्वात मोठे आणि अग्रणी असे ‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’ आहे.
Mahabeej Bhavan
Mahabeej BhavanAgrowon

Mahabeej Seed Company : ‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’ अर्थात ‘महाबीज’ची स्थापना राष्ट्रीय बियाणे प्रकल्पाद्वारे कंपनी कायदा १९५६ अंतर्गत करण्यात आली असून, प्रत्यक्ष कार्यास दिनांक २८ एप्रिल १९७६ पासून सुरुवात झाली आहे. जेव्हा देशामध्ये उच्च गुणवत्तेच्या अधिक उत्पादनक्षम बियाण्यांचा तुटवडा भासू लागला आणि उत्पादनक्षम बियाण्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना व्हावा, याकरिता प्रत्येक राज्यात बियाणे महामंडळाची निर्मिती झाली. सोबतच राष्ट्रीय स्तरावर ‘राष्ट्रीय बीज निगम’ची निर्मिती झाली. मात्र या सगळ्यांमध्ये सर्वात मोठे व अग्रगण्य असे ‘महाबीज’ आहे. असा समज आहे, की, सरकारी व्यवसाय नफ्यात राहत नाही, पण ‘महाबीज’ त्याला अपवाद आहे.

‘महाबीज’ ही सातत्याने नफ्यात चालणारी एकमेव शासनाची अंगीकृत संस्था आहे. महामंडळाच्या भागभांडवलामध्ये महाराष्ट्र शासनाचा ४९ टक्के, राष्ट्रीय बीज निगम लिमिटेडचा ३५ टक्के, बीजोत्पादक शेतकर्‍यांचा १३ टक्के व कृषी विद्यापीठांचा ३ टक्के सहभाग आहे. याचाच अर्थ महाबीज केंद्र शासन, राज्य शासन, कृषी विभाग, कृषी विद्यापीठे व शेतकरी या सगळ्यांच्या समन्वयातून उभी राहलेली शेतकरीहिताची संस्था आहे.

त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘महाबीज’ शेतकऱ्यांची कंपनी म्हणून नावरूपास आली आहे. ‘महाबीज’मध्ये १३ टक्के भागभांडवल शेतकऱ्यांचे आहे, म्हणजेच आठ हजार शेतकरी थेट ‘महाबीज’चे भागधारक आहेत. याचाच अर्थ शेतकरी केवळ ग्राहकच नाही, तर ‘महाबीज’चा मालकही आहे. म्हणजेच ‘महाबीज’ ही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांनी चालविलेली संस्था आहे.

भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी व महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाचे सचिव यांच्याकडे महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्षपद असून, दैनंदिन कामकाज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी) यांच्याद्वारे नियंत्रित करण्यात येते. संचालक मंडळाची घडण ही भागभांडवलाच्या प्रमाणात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांसहित ११ नियुक्त सदस्य आणि भागधारक शेतकऱ्यांमधून निवडणूक प्रक्रियद्वारे निवडून आलेले २ सदस्य, अशा १३ सदस्यांनी पूर्ण होते. ‘महाबीज’चे नोंदणीकृत, तसेच मुख्य कार्यालय विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या अकोला या मुख्य शहरात आहे.

‘महाबीज’ची राज्यामध्ये सहा विभागीय कार्यालये व २६ जिल्हा कार्यालये असून, त्याद्वारे महामंडळाचे विपणन तथा उत्पादन कार्य हाताळण्यात येते. ‘महाबीज’चे स्वमालकीचे २३ अत्याधुनिक बीजप्रक्रिया केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रात स्थापित करण्यात आलेली आहेत. महामंडळाच्या कार्यप्रणालीमध्ये संशोधन व विकास आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाचे खास महत्त्व आहे. ‘संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन’ हे महामंडळाचे ब्रीद आहे.

Mahabeej Bhavan
Mahabeej Seed : रब्बी हंगामासाठी 'महाबीज'चा बियाणे पुरवठा सुरू

मानांकित बीज परीक्षण प्रयोगशाळा

महामंडळाच्या अकोला (१९८२), परभणी (१९८५) व जालना (२०२०) या तीन बीज परीक्षण प्रयोगशाळा कार्यान्वित असून, या तिन्ही बीज परीक्षण प्रयोगशाळा महाराष्ट्र शासनाने बियाणे कायदा १९६६ अंतर्गत ‘राज्य बियाणे प्रयोगशाळा’ म्हणून अधिसूचित केल्या आहेत. अकोला येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेस ॲग्रिकल्चर टुडे या समूहातर्फे ‘सार्वजनिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट बीज परीक्षण प्रयोगशाळा’ म्हणून सन्मानित केले गेले आहे.

महामंडळाच्या तिन्ही प्रयोगशाळांचे कामकाज हे भारतीय किमान बीज प्रमाणीकरण मानकांच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून चालत आहे. अकोला येथील बीज परीक्षण प्रयोगशाळा ही अत्याधुनिक बीज परीक्षण चाचण्या जसे की, एलिझा, बियाणे आरोग्य आणि डीएनए फिंगरप्रिंटिंग करण्यास सुसज्ज आहे.

येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेस ‘नॅशनल ॲक्रिडेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लेबॉरेटरीज’ (एनएबीएल) संस्थेचे मानांकन घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तिन्ही बीज परीक्षण प्रयोगशाळांची वार्षिक बियाणे परीक्षण क्षमता सुमारे ७५,००० ते ८०,००० नमुने असून, यामध्ये बियाण्याची आर्द्रता, भौतिक शुद्धता, उगवणक्षमता, टेट्राझोलियम चाचणी, क्षेत्रीय उगवण चाचणी, आनुवंशिक शुद्धता चाचणी, एलिझा इत्यादी विविध चाचण्यांचा अंतर्भाव आहे. क्षेत्र स्तरावरील चाचण्यांकरिता महामंडळाकडे ‘महाबीज सेंटर ऑफ एक्सलन्स’, पैलपाडा येथे संपूर्ण विकसित समर्पित प्रक्षेत्र आहे.

अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेचे वेगळे महत्त्व

राष्ट्रीय सुरक्षिततेमध्ये अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेचे वेगळे महत्त्व असून, त्या दृष्टीने महामंडळ गळीतधान्य, तृणधान्य, कडधान्यवर्गीय पिके व हिरवळीचे खत, तसेच व भाजीपाला पिके इत्यादी पिकांचे शेतकऱ्यांना अंदाजे आठ लाख क्विंटलपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध करून देते. त्याची अंदाजे वार्षिक उलाढाल ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

चकित करणारी बियाणे उत्पादनक्षमता

उच्च गुणवत्ता असलेल्या बियाण्यांचे उत्पादन करणे हे ‘महाबीज’चे पायाभूत बलस्थान आहे. ‘महाबीज’ची प्रचंड बियाणे उत्पादनक्षमता केवळ आश्चर्यचकित करणारी आहे. दरवर्षी खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात अडीच लाख एकर क्षेत्रावर बीज उत्पादन केले जाते. ५० हजार शेतकरी बीजोउत्पादकांचे श्रम त्यात एकवटलेले असतात. त्यांच्या श्रमातून जवळजवळ १० लाख क्विंटल बीजउत्पादन केले जाते.

१० लाख क्विंटल बियाण्यांचे प्रोसेसिंग करण्याची क्षमता असलेली महाराष्ट्रातील एकमेव कंपनी म्हणजे ‘महाबीज’. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात व कर्नाटक या राज्यात ‘महाबीज’तर्फे, आयोजकांमार्फत बीजोत्पादन कार्यक्रम राबविला जातो. बीजोत्पादन करताना बियाण्यांचा गुणनांक वाढविण्याच्या दृष्टीने दरवर्षी नव्याने प्रसारित आणि अधिसूचित झालेल्या वाणांच्या बियाण्यांचा अंतर्भाव त्यात केला जातो आणि त्यानुसार, शिस्तबद्ध पद्धतीने, पायाभूत बियाण्याचे वाटप बीजउत्पादकांना केले जाते.

शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा

‘महाबीज’द्वारे प्रत्येक पिकामध्ये बीजोत्पादकांना इन्सेटिव्ह दिला जातो. बाजार समितीचा सर्वाधिक भाव जो असेल त्यानुसार, नवीन वाणास २५ व जुन्या वाणाला २० टक्के एवढा जास्तीचा भाव बीजोत्पादकांना सोयाबीन पिकामध्ये दिला जातो. त्यामुळे बीजोत्पादकांना खूप चांगला भाव मिळतो व ते ‘महाबीज’शी कायम संलग्न राहतात. याचा अर्थ बीजोत्पादन करूनसुद्धा ‘महाबीज’कडून शेतकऱ्यांना लाभ मिळतो आणि तेच बियाणे प्रमाणित करून शासकीय अनुदानावर ‘महाबीज’ शेतकऱ्यांना विक्री करते, त्यामुळे त्यांना दुहेरी लाभ मिळतो.

९८ टक्के प्रमाणित बियाण्यांची विक्री

मुबलक प्रमाणामध्ये बीजोत्पादन घेऊन उच्च गुणवत्तेचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे, हे ‘महाबीज’चे उद्दिष्ट होते. त्यामुळे ‘महाबीज’ आजही मुख्यत्वे प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा शेतकऱ्यांना करते. बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या देखरेखीखाली प्रक्रिया विभागाद्वारे अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून योग्य वेळेत बियाणे प्रक्रिया पूर्ण केली जाते.

शासकिय बीजपरीक्षण मापदंडानुसार, उगवण शक्ती, भौतिक शुद्धता इत्यादीमध्ये पात्र बियाणे संवेष्ठित व प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे मुक्त झालेले प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येते. महामंडळाच्या विक्रीमध्ये ९८ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणित बियाणांचा वाटा आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे ‘महाबीज’ला अनमोल सहकार्य लाभते.

विपणन विभागाचा

तत्पर सेवेत हातखंडा

उच्च गुणवतेच्या बियाण्यांचे अखंड उत्पादन करत राहणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच महत्त्वाचे आहे ते बियाणे शेतकरी बांधवांपर्यंत त्यांच्या मागणीच्या प्रमाणात, निर्धारित वेळेत आणि रास्त दरात पोहोचविणे. या बाबतीत ‘महाबीज’च्या विपणन विभागाचा हात कोणी धरू शकणार नाही. ‘महाबीज’चे ७०० खासगी विक्रेते आणि ३०० सहकारी विक्रेते मिळून एक हजार विक्रेत्यांचे एक मोठे जाळे सर्वदूर पसरलेले आहे.

त्यामुळे राज्यात कोठल्याही कानाकोपऱ्यांतील शेतकऱ्याला ‘महाबीज’चे बियाणे सहज उपलब्ध होऊ शकते. महाराष्ट्राबाहेर मध्यप्रदेश, छत्तीसगढ, ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या इतर राज्यांतसुद्धा ‘महाबीज’चे बियाणे वितरकांमार्फत पोहोचते. केवळ ५० पेक्षा अधिक पिकांचे बियाणेच नाही, तर, त्यांच्या २५० पेक्षा अधिक वाणांचे वितरण गेली चार दशके ‘महाबीज’ सातत्याने करीत आली आहे. त्यात सर्व प्रकारची तृणधान्ये, गळीतधान्ये, कडधान्ये, सुधारित भाजीपाला, वैरण पिके इत्यादी सर्व प्रकारच्या बियाण्यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, ‘महाबीज’ दीड लाख लिटरपेक्षा जास्त जैविक खते, दीड लाख किलो जैविक बुरशीनाशके आणि हिरवळीचे खत यांचेही दरवर्षी विपणन करते. शेतकऱ्यांना रास्त दरात व निर्धारित वेळेमध्ये बियाणे उपलब्ध करून देणे, पीक प्रात्यक्षिक, शेती कार्यशाळा, शेती दिन इत्यादीद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येते.

विक्रेत्यांना वेळेत बियाणे पुरवठा, विक्रीपश्चात सेवा व विस्तार इत्यादींचे पाठबळ देऊन, बियाणे विक्रीवर माफक सूट व सवलती देण्यात येतात. महामंडळाद्वारे राज्य व केंद्र सरकारच्या बियाणे पुरवठा विषयक योजनांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यात येतो. यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन व सर्वात मोठे म्हणजे कृषी विभागाचे सकारात्मक सहकार्य आणि मनापासून सहभाग लाभतो. त्यामुळे ‘महाबीज’ गेली ४७ वर्षे शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.

आठ लाख क्विंटल बियाणे साठवण

महाबीजच्या सगळ्या केंद्रांमध्ये प्रक्रिया झालेल्या बियाण्यांचा साठा करण्यासाठी सुसज्ज गोदामे आहेत. त्यांची एकूण साठवणूक क्षमता जवळजवळ आठ लाख क्विंटल आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या गोदामांची उभारणी करण्यात आलेली आहे. बियाणे हवेशीर, कोरडे राहण्यासाठी गोदामांमध्ये टर्बोव्हेंटिलेटर, उबदार खिडक्या बसविल्या आहेत, तसेच गोदामातील तापमान कमी ठेवण्यासाठी पीपीजीआय शीटसह उष्णतारोधक शीट्सची छपरे बसविलेली आहेत. खालच्या फळ्यांवर ठेवलेल्या बियाण्यांना खेळती हवा मिळावी म्हणून काँक्रीटच्या जमिनीवर वजनाने हलक्या अशा एचडीपीईच्या सच्छिद्र पॅलेट्सचा वापर ‘महाबीज’ करते.

Mahabeej Bhavan
Mahabeej : ‘महाबीज’च्या भागधारकांना प्रतिशेअर १७ रुपये लाभांश

संशोधनातही आघाडी

काळानुसार हवामानात, जमिनीच्या कसदारपणात बदल होत असतो. या बदलांना अनुसरून नवीन बियाण्यांचे संशोधन करणे आवश्यक असते. काळाची ही गरज ओळखून, १९९२ मध्ये स्वतःच्या संशोधन विभागाची स्थापना करून ‘महाबीज’ने आपल्या वाटचालीत महत्त्वाचे आणि महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आणि उच्च गुणवत्तेचे स्वतःचे संशोधित ‘संकरित देशी कापूस-सीएफएल-९०४, उडीद-विजय, संकरित मका-उदय, मूग-उन्नती, संकरित सूर्यफूल-भास्कर, संकरित आणि सुधारित भाजीपाला वाणांमध्ये भेंडी-तन्वी, भोपळा-ईश्वर, शिरी दोडका-ऐश्वर्या, चोपडा दोडका- दिव्यांका, वांगी-जयंत आणि यशवंत, गवार-गौरी, चवळी-पार्वती’ ही वाणे शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून दिलीत.याशिवाय इतर पिकांमध्येसुद्धा संशोधन सुरू असून, लवकरच तीही लागवडीसाठी उपलब्ध होतील, असा महाबीज संशोधन विभागाचा विश्वास आहे.

अत्याधुनिक ऊतिसंवर्धन प्रयोगशाळा

सन २००२ मध्ये व्यावसायिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणावर ऊतिसंवर्धित केळीची रोपे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावीत या उद्देशाने नागपूरला महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र या अत्याधुनिक ऊतिसंवर्धन प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली. या संशोधनामुळे रोगमुक्त केळीची रोपे मोठ्या प्रमाणावर तयार होऊ शकली. केळीव्यतिरिक्त पपई व बांबू हे येऊ घातलेले प्रकल्प आहेत.

२०१७ मध्ये महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र, नागपूरला भारत सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन विभागाची मान्यता मिळालेली आहे. यानंतर २०२० मध्ये नॅशनल सर्टिफिकेशन सिस्टम फॉर टिश्यूकल्चर रेज्ड प्लँट्स, नवी दिल्लीनेसुद्धा मान्यता दिलेली आहे. अभिमानाची बाब म्हणजे, महाबीज जैव तंत्रज्ञान केंद्र, नागपूर ही प्रतिष्ठित मान्यता मिळविणारी, संपूर्ण भारतामध्ये एकमेव निमशासकीय संस्था आहे.

राज्याच्या बियाणे बाजारावर ‘महाबीज’चा अंकुश

‘महाबीज’ची राज्यातील बियाणे बाजारात अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. ‘महाबीज’चा राज्यातील प्रमुख पिकांत मोठा विक्री वाटा आहे. उदाहरणार्थ, सोयाबीन ४५ टक्के, हरभरा ६५ ते ७० टक्के, गहू ६५ टक्के, ज्वारी ८० ते ८५ टक्के, कडधान्ये ४५ टक्के, धान/भात ३५ ते ४० टक्के, हिरवळीचे खत पिके ८० ते ९० टक्के, चारापिके ६५ ते ७० टक्के इत्यादी. त्यामुळे ‘महाबीज’च्या बियाणे किमतींचा संपूर्ण बियाणे बाजारावर परिणाम होतो. आजही अशी परिस्थिती आहे, की जोवर ‘महाबीज’चे बियाणे दर बाजारात जाहीर होत नाहीत, तोवर इतर कंपन्या आपले बियाणे दर जाहीर करीत नाहीत. ‘महाबीज’चे बियाणे दर कायम रास्त असल्यामुळे इतर कंपन्यांना आपले दर अवास्तव ठेवता येत नाहीत. अशाप्रकारे ‘महाबीज’चे बियाणे किमतींवर अप्रत्यक्ष नियंत्रण राहते. याचाच परिपाक म्हणजे शेतकऱ्यांना बाजारात सर्व बियाणे रास्त दरात मिळू शकतात.

‘महाबीज’ची रोपवाटिकाही अव्वल

गेल्या दोन दशकांपासून ‘महाबीज’ रोपवाटिकांद्वारे शेतकरी बांधवांना, तसेच इतर ग्राहकांना ५०० हून अधिक प्रकारची फुलझाडे, ऊतिसंवर्धित केळी, पपई, फळझाडे, शोभिवंत झाडे, भाजीपाला व कुंपणासाठी लागणाऱ्या झाडांची गुणवत्तापूर्ण रोपे व रोपवाटिकेशी संबंधित साहित्य रास्त दरात उपलब्ध करुन देण्यात येते. महामंडळाद्वारे बगीचा विकसित करण्याचे कार्यसुद्धा केले जाते.

महामंडळाच्या रोपवाटिकांद्वारे शासकीय, निमशासकीय, खासगी, तसेच स्वयंसेवी संस्था यांना वृक्षारोपण, तसेच उद्यान विकसित करण्यासाठी लागणारी रोपे सवलतीच्या दरात पुरविलीजा तात. सद्यःस्थितीत अकोला, पैलपाडा, खामगाव व नागपूर येथे ‘महाबीज रोपवाटिका’ कार्यरत असून, भविष्यात अमरावती, जळगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, श्रीरामपूर इत्यादी ठिकाणी ‘महाबीज रोपवाटिके’चा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

१६ वेळा राष्ट्रीय पुरस्कार

महामंडळाचे एकूण ४६८ मनुष्यबळ ही महामंडळाची शक्ती आहे. या शक्तीच्या सातत्यपूर्ण व अथक प्रयत्नांमुळेच महामंडळास आजपर्यंत १६ वेळा अत्यंत मानाचा असा ‘राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.

‘महाबीज’ची संशोधित, सुधारित, संकरित वाणे

सोयाबीन

नवीन वाण

पीडीकेव्ही अंबा

फुले दुर्वा

फुले संगम

फुले किमया

एमएयूएस-६१२

एमएसीएस-१२८१

जेएस-२०३४

जेएस-१५८

प्रचलित वाण

जेएस-३३५

जेएस-९३०५

जेएस-९५६०

एमएयूएस-७१

डीएस-२२८

ज्वारी

संकरित

एसपीएच-१६३५

सीएसएच-९

सीएसएच-१४

सीएसएच-३५

महाबीज संशोधित संकरीत

महाबीज-७०४

महाबीज-७

संशोधित

भाग्यलक्ष्मी-२९६

दुधी भोपळा

संकरित संशोधित

ईश्वर

संशोधित वाण

सम्राट

हरभरा

नवीन वाण

फुले विक्रम जॅकी-९२१८ विजय

फुले विक्रांत दिग्विजय

पीडीकेव्ही कांचन

फुले विश्वराज

पीडीकेव्ही कनक

सुपर अन्नेगिरी

प्रचलित वाण

जॅकी-९२१८

दिग्विजय

बारीक वाण

विजय

तूर

जुने वाण

मारोती

आशा

नवीन वाण

बीडीएन-७१६

बीडीएन-७११ (पांढरी)

गोदावरी (पांढरी)

पीकेव्ही तारा

फुले राजेश्वरी

मूग

संशोधित

उन्नती

उत्कर्ष

प्रचलित वाण

बीएम-२००२-१

बीएम-२००३-२

पीकेव्हीएम-४

पीकेव्ही एम-८८०२

शिरी दोडका

संकरित संशोधित सुधारित वाण

ऐश्वर्या पुसा नसदार

मुळा

सुधारित संकरित मुळा

पुसा चेतकी धवल क्रांती

जापनीज व्हाईट -

गहू

जीडब्ल्यु-४९६, जीडब्ल्यु-१३४६,

पुसा वणी (एचआय-१६३३), एकेडब्ल्यु-४६२७, फुले समाधान, पीडीकेव्ही सरदार, पूर्णा, पोषण, एमएसीएस-६२२२, लोक-१

उडीद

संशोधित वाण प्रचलित वाण

एमयू-४४ एकेयू-१०-१

विजय (पीडीकेव्ही ब्लॅक गोल्ड)

एकेयू-१५

टीएयू-१

वैरण पीक महाबीज

न्युट्रिफीड, शुगरग्रेज, मका आफ्रिकन टॉल, सं. मका, पीएसी-७४०, स्पीडफीड, बाजरा नं.१, मॅक्स साईलेज

हिरवळीचे खत

ढेंचा (भूमिपुत्र), बोरू/ताग-वसुधा

द्रवरूप जैविक खत

रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी, महाजैविक

जैविक खत : ट्रायकोडर्मा

बाजरी

संकरित एएचबी-१२०० एफई

संशोधित महाबीज-१००५

सुधारित धनशक्ती

संकरित संशोधित भेंडी : तन्वी

काकडी : पूना खिरा

संशोधित चोपडा दोडका : दिव्यांका

वाटाणा : महाबीज गोल्ड, एपी-३

मल्टीकट कोथिंबीर : सुगंधा-२

पालक : ऑल ग्रीन

मेथी : गायत्री, पीईबी

कांदा : एएफडीआर

(ॲग्रि फाऊंड डार्क रेड),

एएफएलआर (ॲग्रि फाऊंड लाईट रेड)

गाजर: पुसा केसर

रब्बी ज्वारी : मालदांडी, पीकेव्ही क्रांती, फुले वसुधा, फुले, रेवती, फुले सुचित्रा, परभणी शक्ती (पीव्हीके-१००९), परभणी सुपर मोती

धान/भात : अति बारीक, मध्यम, बारीक, जाड

महाबीज ऊतिसंवर्धित केळी : ग्रँड नैन

‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’ (महाबीज) ही शेतकऱ्यांसाठी हिताची संस्था असून, गेल्या ४७ वर्षांपासून अविरत कार्यरत आहे.
- ना. धनंजय मुंडे, कृषिमंत्री, महाराष्ट्र
‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’ (महाबीज) ही शासकीय योजना योग्यरीत्या राबवून शेतकऱ्यांचे हित जोपासणारी संस्था आहे.
- अनूप कुमार (भा.प्र.से.), अध्यक्ष, महाबीज तथा अपर मुख्य सचिव (कृषी), मुंबई
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बीजोत्पादन, तसेच रास्त दरामध्ये बियाणे विपणन याद्वारे दुहेरी फायदा ‘महाबीज’ ही संस्था देतच आली आहे. याशिवाय चोख नियोजन, योग्य वेळी योग्य निर्णयक्षमता, केंद्र शासन, राज्य शासन व कृषी विभाग यांच्याशी समन्वय साधणे, या सर्व गुणांमधून गेल्या ४७ वर्षांपासून ‘महाबीज’ शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे.
- सचिन कलंत्रे (भा.प्र.से.), व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com