
मी पुण्यात जिथं काम करतो तिथल्या परिसरात वेगवेगळ्या राज्यातून अनेक गरजू कुटुंब-कबिल्याचं (Family In Need) पोट भरण्यासाठी येऊन राहतात. त्यांचं हे भुकेसाठीचं स्थलांतर त्यांच्या पाचवीलाच पुजलंय असं नेहमी वाटत राहतं. त्यात कोणी टाइल्स बसवायचं काम करतं. कोणी प्लास्टरच्या कामात प्रवीण असतो. कोणी शटरिंगच्या कामातून आपलं घर चालवत असतो, तर ज्याला काहीच येत नसतं तो बिगारी बनून गवंड्यांच्या हाताखाली रोजंदारीवर येत असतो.
असे अनेक बिगारी वेगवेगळ्या रस्त्यांवर, लेबर अड्ड्यावर उपलब्ध असतात. अशाच प्रकारचं एक बिगारी जोडपं मी जिथं काम करतो त्या परिसरात कामाला येत होतं. सकाळी कामाला जाताना ते त्यांच्या मुलाला अन् मुलीला झेडपीच्या शाळेत सोडायचे.
कन्नड भाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा येत नसतानाही केवळ लिहिता वाचता यावं या उद्देशानं त्यांनी पोरांना मराठी शाळेत घातलं होतं. पोरं शिकून सवरून मोठी झाल्यावर त्यांना किमान बिगारी म्हणून राबावं तरी लागणार नाही. एवढा छोटासा त्यांचा उद्देश होता.
ती पोरं आईबापाच्या स्वप्नासाठी शाळेत अ-ब-क-ड गिरवायची. आईबापाला कामावरून सुटायला उशीर होई. मग ती पोरं आमच्या ऑफिसच्या बाहेरच्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला बसून अभ्यास करण्यात मग्न असायचे. त्या दोघांना तसं पाहून माझं बालपण डोळ्यात उतरायचं. एक दिवस ते दोघे तिथं बसून अभ्यास करत असताना पाणी पिताना मी त्यांना पाहिलं. त्यांच्या हातातली पाण्याची बाटली खूपच चेंबून गेली होती.
घाण झाली होती. म्हणून मला राहवलं नाही. मी पटकन एका दुकानात गेलो, दोन चांगल्या बाटल्या घेऊन आलो अन् त्यांना दिल्या. त्यांचा आनंद पाहून मलाही बरं वाटलं. पण, दुसऱ्या दिवशी सकाळीच नेहमीच्या वेळेला ती पोरं शाळेत जायच्या आधी मला भेटायला आली. दोन्ही बाटल्या पॅकिंगसहित मला परत करत तो मुलगा म्हणाला, ‘‘साहेब, आमची आई म्हटली, की आपण त्यांचं काहीच काम केलं नाही मंग त्यांच्याकडून बाटल्या का बरं घेतल्या?’’
मी तर चक्रावूनच गेलो. दप्तर पाठीवर टाकीत त्या पोराची बहीण म्हणाली, ‘‘आईनी सांगितलंय की तुमच्या बाटल्या तुम्हांला घ्या, अशी फुकाट घ्यायची सवय लागल्याली चांगली नसतीयं.’’ मी मनात विचार केला की प्रचंड पैसा असूनही ‘आरटीई’ स्कीममधून मुलांचं शिक्षण फुकट व्हावं म्हणून आटापिटा करणाऱ्या माणसांपेक्षा हे अशिक्षित बिगारी तर हजार पटीने स्वाभिमानी आहेत. अन् असे संस्कारच चांगले नागरिक घडवत असतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.