
Latur News : मांजरा व तेरणा नद्यांच्या संगमापासून काही अंतरावर कर्नाटकात असलेल्या कोंगळी उच्चस्तरीय बंधाऱ्याचे सर्व दरवाजे न उघडल्यामुळे बॅकवाटर महाराष्ट्रात नदीकाठच्या शेतात घुसले. यामुळे काढणीला आलेल्या मूग, उडीद व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.
तीन पैकी दोन दरवाजे उघडल्यामुळेच हा प्रकार घडल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली असून, अद्याप त्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. बॅकवॉटरमध्ये अचानक वाढ झाल्याचे अधिकारी सांगत असले तरी पिकांची नुकसान भरपाई कोण देणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामुळे मांजरा नदीला पूर आला. नदीवर एकूण २७ उच्चस्तरीय बंधारे असून, पूर आल्यानंतर दारे उघडून त्याचा विसर्ग करण्यात येतो. यामुळे पाणी पुढे कर्नाटकात जाते. यामुळे नदीपात्रात पाणीपातळीत वाढ होत नाही व नदीकाठच्या शेती व पिकांचे नुकसान होत नाही.
गेली अनेक वर्षे या पद्धतीने पाणी विसर्गाचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे. यंदा मात्र या नियोजनाला कर्नाटकातील जलसंपदा विभागाने छेद दिला. मुख्य नदी असलेल्या मांजराला रेणा व तेरणा या उपनद्या येऊन मिळतात व मांजरा नदी तशीच पुढे कर्नाटकात जाते. मांजरा व तेरणा नद्यांच्या औराद शहाजानी शिवारातील संगमाजवळ वांजरखेडा कोल्हापुरी बंधारा असून, त्यापुढे काही अंतरावर मांजरा नदीवर कोंगळी (ता. बसवकल्याण, कर्नाटक) येथे उच्चस्तरीय बंधारा (बॅरेज) आहे.
या बॅरेजला तीन दरवाजे आहे. नदीला पूर आल्यानंतर पाणीपातळीत वाढ झाली होती. यामुळे कोंगळीच्या तीनही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करणे आवश्यक होते. मात्र कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. केवळ दोनच दरवाजे उघडून विसर्ग सुरू ठेवला. यामुळे पाण्याला पुढे जायला संधी न मिळाल्याने बॅकवॉटर तयार होऊन नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली व हे पाणी नदीकाठच्या शेतात घुसले. यामुळे मूग, उडीद व सोयाबीन पिके पाण्याखाली येऊन मोठे नुकसान झाले.
धरणे भरल्यानंतचा अनुभव आताच
मांजरा व निम्न तेरणा प्रकल्प भरल्यानंतर दोन्ही नदीपात्रांत पाणी सोडले जाते. त्यानंतर नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन मांजरा व तेरणा नदी संगमावर पूर परिस्थिती निर्माण होते. २०२१ व २०२२ मध्ये दोन्ही धरणे भरल्यानंतर नदीत पाणी सोडले,
तेव्हा हा अनुभव नदीकाठच्या शेतकऱ्यांना आला होता. ऑक्टोबरमध्ये येणारा हा अनुभव कोंगळी बॅरेजचे दरवाजे न उघडल्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र तीनही दरवाजे उघडल्याचा दावा करून बॅक का वाढले, याबाबत कानावर हात ठेवले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.