Life Education Activities : आधुनिक मानसशास्त्रावर आधारित जीवन शिक्षण उपक्रम

Indian Agriculture : पुढच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील किमान तीन लाख शेतकऱ्यांनी आधुनिक मानसशास्त्रावर आधारित अभ्यासक्रमाचा अतिशय नेटका अभ्यास करावा आणि पुढच्या तीन वर्षांमध्ये तीस लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचवावा. मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये प्रवेश केला, त्या टप्प्याला माझ्यासाठी आज चार दशकांकडून अधिक काळ लोटला आहे.
Life Education Activities
Life Education ActivitiesAgrowon
Published on
Updated on

डॉ. आनंद नाडकर्णी

Sahyadri Farms : ‘सह्याद्री फार्म्स’ ही कंपनी आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेली संस्था. या संस्थेच्या नेतृत्वाने उद्यमशीलतेचा एक नवा मापदंड महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी तयार केला. परंतु ही उद्योजकता जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे वेगवेगळे मार्ग तयार करणे हा विषय महत्त्वाचा. दिनांक १ मे २०२२ रोजी ‘कर्ता शेतकरी’ या मालिकेचा शुभारंभ शेतकरी कार्यकर्त्यांसमोर झाला.

सह्याद्री फार्म्सचे मोबाईल ॲप आहे ‘फार्म सेतू.’ त्या ॲपवर एकेक भाग अपलोड होऊ लागला. चार भाग झाले की एक प्रतिसादपत्र भरणे आवश्यक असायचे. त्याशिवाय पुढचा भाग ‘उघडायचा’ नाही. या शिकण्यामध्ये नियमितपणा राखायचा तर शेतकरी गटांसाठीचे प्रेरक तयार करायला हवेत. त्यांना नाव दिले गेले ‘शेतकरी मित्र.’

नोव्हेंबर २०२२ पर्यंत या गटाने ४२ भागांचा हा कार्यक्रम तर पाहिलाच पण प्रत्येक दहा भागांनंतर त्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण शिबिर आखण्यात आले. ही जबाबदारी पेलली आमच्या संस्थेच्या शिल्पा जोशी आणि डॉ. सुवर्णा बोबडे या मानसशास्त्रज्ञांनी.


प्रौढ जीवनामध्ये आपल्या सगळ्यांची ‘अभ्यास करण्याची’ सवय हळूहळू बाजूला पडत जाते. अशा वेळी शेतकऱ्यांच्या छोट्या गटांसाठी या भागांचे नियमित प्रसारण करता येईल. पण त्यासाठी ‘शेतकरी मित्र’ अर्थात, प्रेरक-प्रशिक्षक मोठ्या संख्येने तयार व्हायला हवेत.

तर असे प्रशिक्षण देणारे संपूर्ण ‘मॅन्युअल’ म्हणजे ‘प्रशिक्षण-मार्गदर्शक ग्रंथ’ तयार करता येईल का? अशी कल्पना आली. आनंदाची गोष्ट म्हणजे, शेतकरी मित्रांचे ‘थेट प्रशिक्षण’ घेतल्यामुळे, सुवर्णा आणि शिल्पाने हा संपूर्ण ग्रंथ आता तयार केला आहे.

महाराष्ट्रातल्या कोणत्याही शेतकरी समूहातील कार्यकर्त्यांसाठी आता ‘कर्ता शेतकरी’ मनआरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे सर्व भाग अधिक प्रशिक्षण देण्यासाठी लागणारे मार्गदर्शक पुस्तक या दोन्ही गोष्टी तयार झालेल्या आहेत.

Life Education Activities
Sahyadri Farms : ‘सह्याद्री फार्म्स’कर्मचाऱ्यांना देणार ७० कोटींचे शेअर्स

‘फार्म-सेतू’ ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याला काही मर्यादा दिसत होत्या. प्रेक्षकांचे असे मत होते, की हा कार्यक्रम प्रत्येक कुटुंबाने पाहायला हवा. त्यासाठी काय बरं करता येईल? ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांच्याबरोबर फोनवर संभाषण झाले आणि त्यांनी, या वृत्तवाहिनीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून सर्व भागांचे क्रमाने प्रसारण करण्याचे मान्य केले.

त्यानंतर तांत्रिक बाबींसाठी, कायदेशीर बाबींसाठी खूप ऊहापोह आणि काथ्याकूट झाला पण त्यातून सहमतीचा आलेख तयार झाला. जानेवारी २०२३ पासून, ‘एबीपी माझा’ डिजिटल प्लॅटफॉर्मवर आठवड्याचे एपिसोड येऊ लागले. तेच भाग आवाहन आय.पी.एच. आणि सह्याद्री फार्मसच्या यू-ट्यूब चॅनेलवर सुद्धा दिसू लागले.

सध्या यातील काही भाग अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर फिरू लागले आहेत. मी कामानिमित्त महाराष्ट्रात फिरतो तेव्हा एखाद्या छोट्या गावात जरी थांबलो तरी अचानक एखादा त्याचा मोबाईल माझ्यासमोर धरत विचारतो, ‘तुम्हीच ना यातले डॉक्टर गुर्जी?’
राजकुमारने या कार्यक्रमात माझे हे नवीन संबोधन तयार केले आहे.

‘गुर्जी’ हा अगदी मराठमोळा शब्द आहे. ‘सर’ या शब्दातही आदर आहेच, पण ‘गुर्जी’ शब्द थेट खळ्यातला अन् शिवारामधला आहे.

पुढच्या काही महिन्यांमध्ये हे सर्व एपिसोड जनार्पण होणार आहेत. पण त्यांचा नियोजनबद्ध प्रसार व्हायचा तर भरपूर प्रयत्न करावे लागतील. महाराष्ट्रातल्या तमाम कृषी विद्यापीठांतील प्राध्यापकांना आता हा कार्यक्रम शिकवता येईल आणि त्यांच्याद्वारे कृषी क्षेत्राचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला थेट विद्यार्थिदशेपासूनच मनआरोग्याची दिशा सापडेल.

अशा विस्तृत प्रसारासाठीच्या रस्त्यांचा शोध घेताना अर्थातच पुढचे नाव आले ‘ॲग्रो वन’ या दैनिकाचे. सध्या या प्रकल्पामध्ये दोन साधने आहेत. बेचाळीस दृकश्राव्य भाग आणि त्यांचे प्रशिक्षण कसे द्यावे हे सांगणारी मार्गदर्शक पुस्तिका.

मी गंमतीने म्हणतो, की ‘बाल-भारती’ आणि ‘किशोर-भारती’ ही साधने आहेत. आता हवे आहे ‘कुमार-भारती’चे पुस्तक आणि त्यासाठी हवा आहे ‘ॲग्रोवन’सारखा सशक्त मंच.

‘ॲग्रोवन’मध्ये मे महिन्यापासून क्रमशः ‘कर्ता शेतकरी’ हा अभ्यासक्रम आता शब्दरूपात तुमच्यासमोर येऊ लागला आहे. विज्ञानाचे पुस्तक वाचा आणि यू-ट्यूबवर जाऊन एखाद्या ऑनलाइन ॲकेडमी अप्लिकेशनमध्ये असतात तसे व्हिडिओ पाहा. किंवा व्हिडिओ पाहिल्यावर पुस्तक वाचा. नेमका हाच हेतू असणार आहे या लेखमालेचा.

साधारणपणे एका एपिसोडचा आशय एका लेखामध्ये पकडण्याचा प्रयत्न असेल आमचा. वाचकांनी स्क्रीनवरचा भाग पाहून नंतर लेख वाचावा किंवा उलटे करावे. मानसशास्त्रामधल्या माहितीचे एक वैशिष्ट्य असे आहे की वाचताना, ऐकताना सगळे छान, साधे, सरळ वाटते पण नंतर लक्षात ठेवण्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतात.

कृषी क्षेत्राशी संलग्न असणाऱ्या कुणालाही विचारा. सगळे प्रश्‍न येऊन भिडतात ते मनालाच. आपल्या विचार आणि भावनांचे नियोजन (मॅनेजमेंट) योग्य पद्धतीने करता येणे ही सगळ्याच शेतकरी बांधवांची गरज आहे.

आपल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये आपण आधार घेतला आहे, विवेकनिष्ठ मानसशास्त्र, अर्थात Rational Emotive Behaviour Therapy (REBT) या प्रणालीचा. अमेरिकेमध्ये डॉ. अल्बर्ट एलीस या मानसशास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या पद्धतीचा एक भक्कम धागा पोहोचतो मराठी मातीमधल्या संतपरंपरा आणि भागवत धर्मापाशी. म्हणजेच, ही पद्धती जरी पाश्‍चिमात्य असली तरी ती भारतीय परंपरेच्या अनुकूल दिशेने जाणारी आहे.

म्हणूनच हा आशय प्रत्येक कुटुंबापर्यंत तर पोहोचायला हवाच पण तो विविध भारतीय भाषांमध्येही रूपांतरित व्हायला हवा. आम्ही मराठी आशयाचे डबिंग (भाषा-परिवर्तन) आणि सबटायटलिंग (संहितामुद्रण) करण्यासाठीचा एक प्रकल्प तयार केला आहे.

त्यासाठी योग्य आर्थिक मदत मिळावी असे प्रयत्न सुरू आहेत. या साऱ्या प्रकल्पाची दिशा, सर्व प्रगतिशील आणि विचाराने तरुण असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विकासाची आहे. आपल्या भाषेतला, आपल्या संस्कृतितला पण आधुनिक मानसशास्त्रावर आधारित असा हा एक प्रकारचा ‘जीवन शिक्षण उपक्रम’ आहे.

Life Education Activities
Eknath Shinde : मुख्यमंत्री शेतकरी नेत्यांकडून जाणूण घेणार शेतीचे प्रश्‍न

पुढच्या तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रातील किमान तीन लाख शेतकऱ्यांनी या अभ्यासक्रमाचा अतिशय नेटका अभ्यास करावा आणि पुढच्या तीन वर्षांमध्ये तीस लाख शेतकरी कुटुंबांपर्यंत पोहोचवावा अशी इच्छा आम्हा सर्व कार्यकर्त्यांची आहे.

मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये प्रवेश केला, त्या टप्प्याला माझ्यासाठी आज चार दशकांकडून अधिक काळ लोटला आहे. मनाचे आरोग्य म्हणजे निव्वळ मानसिक आजारांवरचे उपचार नव्हेत तर मनामनांमध्ये विवेकाचे दिवे प्रज्वलित करून अज्ञानाचा अंधार दूर करण्याची निरंतर प्रक्रिया आहे असे ज्ञानेश्‍वर माउलींनी आपल्याला सांगितलेच आहे.

याच हेतूने कटिबद्ध अशी आमच्या संस्थेची वाटचाल सुरू आहे. माउलींची कृपाच म्हणायची, की आमच्यासारख्या शहरी भागात काम करणाऱ्या व्यावसायिकांना महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या घरात पोहोचण्याचे भाग्य मिळाले आहे. त्याचे श्रेय निश्‍चितच ‘सह्याद्री फार्म्स‘चे. या प्रकल्पाच्या निमित्ताने, आमच्यासारखी मंडळी जी आजवर फक्त सर्व तऱ्हेच्या शेतीमालाची ग्राहकच होती त्यांना या बळीराजासाठी काहीतरी ज्ञान-माहिती देण्याची संधी मिळते आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी जनतेच्या प्रबोधनाची यात्रा काही नवीन नाही. संतांपासून ते कृषी क्षेत्रातील संशोधक, संघटक आणि संस्थांमार्फत ही मालिका अविरतपणे सुरू आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता या ग्रंथाच्या विसाव्या प्रकरणामध्ये सांगतात ः
समाज झाला रूढीबद्ध । तेथे सांगावे सिद्धांत शुद्ध ।
समाजकार्याहि करावे विशद । वेळ पडेल त्यापरी ।।

आपला कर्ता शेतकरी प्रकल्प या ‘शुद्ध सिद्धांत मालिके’तील ताजा मणी आहे.

पुढे तुकडोजी महाराज जणू ‘कौन्सिलिंग’ या शब्दाची व्याख्याच आपल्यासमोर मांडतात.
प्रसंग पाहोनि उपदेशावे । सत्य तत्त्व तें न सोडावें ।
सत्यचि गोड करोनि सांगावे । वेळ काळादि पाहोनि ।।
एकविसाव्या शतकाच्या या पूर्वार्धामध्ये प्रबोधनाचा म्हणजेच ‘उपदेशाचा‘ हा प्रयोग तुमच्या आमच्यासाठी, सत्य गोड करून सांगण्याचा ठरावा हीच कामना!

ई-मेल - kartashetkari@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com