Vatpournima 2024 : वटवृक्ष संवर्धनाचा करूया संकल्प

Vatpornima : आज वटपौर्णिमा. या दिवशी महिला आपल्या पतीला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. या मागील पौराणिक कथा काहीही असली तरी वटवृक्षाचे संगोपन आणि संवर्धन गरजेचे आहे, हा संदेश या दिवशी सर्वदूर पोहोचला पाहिजे.
Banyan Tree
Banyan TreeAgrowon

गंगा बाकले

Banyan Tree Conservation : आपल्या भारतीय संस्कृतीत जमीन, आकाश, पाणी, अग्नी, झाडे आणि पशू-पक्षी यांना विशेष स्थान आहे. जगातल्या अनेक संस्कृतींपेक्षा आपली संस्कृती निसर्गपूजक आहे. वेळोवेळी आपण भारतीय निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. निसर्गातील एक घटक झाड आहे आणि हिंदूधर्मात वटपौर्णिमा हा सण विवाहित महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

आपल्या पतीदेवाला दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत केले जाते. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाचे झाड दीर्घकाळ टिकणारे आहे. त्याचे संगोपन आणि संवर्धन करणे याकरिता वटपौर्णिमा हा सण महत्त्वाचा आहे. या सणाच्या मागे पौराणिक कथा आहे. सावित्रीचा पती सत्यवान याचा मृत्यू तीन दिवसांवर येऊन ठेपला होता. त्या वेळी सावित्रीने तीन दिवस उपवास करून वडाच्या झाडाखाली व्रत आरंभिले आणि यमाच्या तावडीतून आपल्या पतीला सोडवले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले म्हणून हा सण सर्वत्र साजरा केला जातो.

उपवास करून महिला आपले व्रत आणि सावित्रीचे व्रत पालन करतात. असा हा प्राचीन धार्मिक कथेचा भाग सांगितला जातो. पण मला वाटते, पुराण काळातील बुद्धिमान सावित्री वटवृक्षाचे उपयोग जाणत असावी. म्हणून तिने मूर्च्छित सत्यवानाला वडाच्या झाडाखाली झोपवले; कारण वडाचे झाड इतर झाडांच्या तुलनेत सगळ्यात जास्त प्राणवायू हवेत सोडते. तिला माहीत होते, की तिच्या मृतवत पतीला त्या वेळेस प्राणवायूची सगळ्यात जास्त गरज होती. त्यामुळे तिने वडाचे झाड निवडले.

सत्यवानाला पुन्हा आयुष्य मिळाले. वडाच्या झाडाला अक्षयवृक्ष असेही म्हणतात. हे विज्ञान सर्वांनीच जाणले पाहिजे. आजच्या आधुनिक काळात एकूण परिस्थिती पाहता आणि कोरोनासारख्या महामारीत माणसाचा प्राण किती महत्त्वाचा होता, हे सर्वांना कळलेले आहेच. सजीवांना आणि मानवालाही जीवन जगण्यासाठी प्राणवायूची आवश्यकता आहे. त्यामुळे वृक्षांचे जतन करणे अगत्याचे ठरलेले आहे.

Banyan Tree
Tree Conservation : वृक्षसंवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी घ्यावी

महत्त्व वटवृक्षाचे

वडाच्या झाडाला वटवृक्ष म्हटले जाते. सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंचीपर्यंत हे झाड वाढते. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोहोचतात. त्यांना पारंब्या असे म्हणतात. जमिनीपर्यंत पोहोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो आणि त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो.

मी लहानपणी माझ्या वडिलांच्या गावाकडे शेतात गेल्यावर वडाच्या झाडावर चढायचे. खेळ खेळायचे. वडाच्या झाडाचे पाने शेळ्या मस्त खातात. मग मी वरून झाडाचे एक-एक पिवळे पान तोडून त्यांना खाऊ घालायचे. त्यांचेही पोट भरायचे आणि पोषण व्हायचे. अशा रीतीने या झाडाच्या पानांचा उपयोग मी केलेला आहे.

या झाडाच्या संदर्भाने व्यापक प्रमाणात माहिती जाणून घेतली. तेव्हा समजले की, भारतातील अनेक शहरात आणि गावागावांत प्राचीन आणि दीर्घायुषी वडाचे वृक्ष आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. महाराष्ट्रातील पेमगिरी गावातील वटवृक्ष, गुजरातमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कलकत्त्याच्या शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून त्याच्या सावलीत चार-पाच हजार लोक बसू शकतात.

शिवफूट वनस्पती उद्यानातील वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. चेन्नई येथील अडयारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि साताऱ्याजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. बिहारमध्येही मोठमोठे वटवृक्ष आहेत. महाराष्ट्रात पातूरजवळ असलेल्या अंबाशी गावातील वटवृक्ष सुमारे दीड एकर परिसरात पसरलेला आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे गावाच्या हद्दीतील यल्लमा मंदिराजवळील रत्नागिरी-नागपूर महामार्गावर असलेले ४०० वर्षांचे वडाचे झाड नुकतेच कोसळले आहे. वडाचे झाड किमान एक हजार वर्षे जगते.

Banyan Tree
Tree Plantation : दहा लाख झाडे लावणार

पूर्वी सगळीकडे रस्त्याच्या दुतर्फा वडाची असंख्य झाडे होती. आता रस्ते मोठाले आहेत पण वडाची झाडे फारच कमी दिसतात. भौतिक विकास होत असताना आपण निसर्गाकडे डोळेझाक करतो. पूर्वी महामार्गाने वडाच्या झाडाच्या सावलीतून वाहनाने प्रवास करताना उन्हाची तीव्रता जाणवत नसे. प्रवास आल्हाददायक वाटत असे. आता झाडांची संख्या घटल्यामुळे आणि गतिमान तसेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे झाडांऐवजी गाडीतील वातानुकूलित यंत्रणा सुरू करून आपला प्रवास सुरू आहे.

हे ठीक आहे पण बरोबर नाही. झाडे हे आपले जीवन आहे. त्यांची लागवड आणि संवर्धन करणे अशा सणांच्या संदर्भाने कृती करता येते. मी माझ्या पद्धतीने एका वडाच्या झाडाचे संगोपन आणि संवर्धन पोटच्या पोरांसारखे करत आहे. लोकचळवळ गरजेची आहे. या जगात विशेषतः महिलांनी लक्षात घेतले पाहिजे की, वृक्ष लागवडीचे काम पुण्याचे आहे. तेच आपले खरे सोबती आहेत. कोरोनाच्या काळात आपल्या पतीदेवाचे एका जन्माचे नाते क्षणात संपू लागले. पण आपल्याला जीवन जगण्यासाठी सर्व अर्थाने वृक्षच जन्मोजन्मी राहिले पाहिजेत. हा संकल्प आणि सिद्धी खऱ्या अर्थाने वटसावित्री पौर्णिमेचा अर्थ आहे.

वेगवेगळे पक्षी, वानर व माकडे यांना वडाची फळे खूप आवडतात. वडाची फळे लालचुटूक, गोलाकार आणि पानांच्या देठालगत जोडीजोडीने असतात. राघू-मैना अशी फळे खाताना मी अनेकदा पाहिलेली आहेत. फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मेपर्यंत असतो. पानांच्या पत्रावळी जेवणाकरिता उपयोगाच्या आहेत. मुळे-पाने-चीक आणि साल या सर्वांचा औषध म्हणून उपयोग होतो. चीक जखमा भरून काढण्यासाठी आणि दातातील वेदना थांबवण्यासाठी वापरतात.

वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून आणि उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केसांची वाढ होते. अशा या बहुगुणी उपयोगामुळे धार्मिक अंगाने या झाडाला महत्त्व दिलेले असावे. एक दिवस त्याची पूजा करणे प्रासंगिक आहे, पण नित्यनेमाने झाडाची देखभाल गरजेची आहे. कारण वड आपला राष्ट्रीय वृक्ष आहे. आपण भारतीय या राष्ट्रीय वृक्षाकरिता समर्पित भावना ठेवूयात! खरे राष्ट्रप्रेम यातून अधोरेखित करूया!!

(लेखिका प्राथमिक पदवीधर शिक्षिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com