Suicide : आत्महत्यांना प्रतिबंध घालूया

आत्महत्या रोखण्याच्या प्रयत्नांच्या मधील सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल, तर ती म्हणजे मानसिक आरोग्य आणि आजार या विषयी आपल्या समाजात असलेले प्रचंड अज्ञान आणि गैरसमज.
Farmer Suicide
Farmer SuicideAgrowon

आत्महत्या रोखण्याच्या (Suicide Prevention) प्रयत्नांच्या मधील सगळ्यात मोठी अडचण जर कोणती असेल, तर ती म्हणजे मानसिक आरोग्य (Mental Health) आणि आजार या विषयी आपल्या समाजात असलेले प्रचंड अज्ञान आणि गैरसमज.

शरीराचा आजार आपण जितक्या सहजपणे स्वीकारतो तसा मनाचा आजार अजिबात स्वीकारत नाही. मनाचे आजारपण हे अजूनही आपल्या समाजात लपवून ठेवण्याची गोष्ट समजली जाते.

‘मनाचा आजार हा काहीतरी कलंक आहे,’ असे आपल्या समाजात त्याकडे बघितले जाते. स्वाभाविकपणे मानसिक आजाराचा उपचार घेण्यापेक्षा लोक तो लपवण्याचा प्रयत्न करतात.

Farmer Suicide
Farmer Suicide : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना लवकरच मदत

यामधून जर कोणी उपचारापर्यंत पोहोचला, तर मानसिक उपचारांच्या विषयी असलेल्या प्रचंड गैरसमजांमुळे पूर्ण उपचार घेतला जात नाही. ‘मानसोपचार तज्ज्ञ (Psychiatrist) फक्त झोपेच्या गोळ्या देतात’, ‘त्यांच्या औषधांची सवय लागते!’

अशा अनेक गैरसमजांना बळी पडून लोक उपचार पूर्ण करत नाहीत. आत्महत्येचे विचार बोलून दाखवणाऱ्या व्यक्तींबद्दल देखील खोलवर रुजलेले गैरसमज आपल्या समाजात आहेत. ‘आत्महत्येचा विचार बोलून दाखवणारे लोक हे नाटक करत असतात’ अथवा ‘जो गरजते है वो बरसते नही’ असा आपल्याकडे मोठा गैरसमज आहे.

प्रत्यक्षात जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचे विचार बोलून दाखवते तेव्हा ती, ‘‘माझे मन माझ्या ताब्यात राहत नाही आहे आणि मला मदतीची गरज आहे’’ असे सांगत असते. त्याकडे आपण खूप संवेदनशीलतेने बघणे आवश्यक आहे.

Farmer Suicide
Farmer Suicide : कर्जबाजारी, नापिकीला कंटाळून १८१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मानसशास्त्रातील अनेक अभ्यास असे सांगतात, की आत्महत्या करण्यापूर्वीच्या आठवड्यात बहुतांश लोक हे आपल्या जवळच्या व्यक्तीकडे थेट किंवा अप्रत्यक्षपणे हा विचार बोलून दाखवत असतात.

अत्यंत ताणाच्या प्रसंगी स्वतःला इजा करून घेण्याचे विचार हे ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांच्या मनात येत असतात.

या पार्श्‍वभूमीवर आपण आपल्या जवळच्या व्यक्तीची भावनिक अस्वस्थता ऐकण्यासाठी उपलब्ध आहोत ही मोठी गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीचे आत्महत्येचे विचार शांतपणे एकून घेणे आणि त्याला योग्यप्रकारे मार्गदर्शन करणे ही आव्हानात्मक गोष्ट आहे.

यामध्ये आपण जर भावनिक प्रथमोपचार कसे द्यावेत याचे जर छोटे प्रशिक्षण घेतले असेल, तर आपण अधिक प्रभावीपणे हे काम करू शकतो. अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण समाजात चांगले ऐकणारे मानस मित्र/मैत्रिणी तयार करू शकतो.

शासनाच्या कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी असे प्रशिक्षण अनिवार्य करायला हवे, केवळ भावनिक प्रथमोपचार देखील सर्व काही करू शकतील असे समजणे बरोबर नाही.

आत्महत्या रोखण्याच्या प्रयत्नातील ती केवळ पहिली पण अत्यंत महत्त्वाची कडी आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यावर अशा प्रत्येक मानस मित्र/मैत्रिणीनी तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञाच्या सोबत जोडलेले असणे आवश्यक आहे.

त्यामुळे आत्महत्येच्या विचारांचे गांभीर्य आणि तीव्रता ओळखायला शिकणे आणि मानसोपचार तज्ज्ञाच्या देखरेखीखाली हे करणे अत्यंत आवश्यक आहे.

जगभरात आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नात अशा गेट कीपर/भावनिक मदत देणारा द्वाररक्षकाचे महत्त्व दिसून आले आहे. काही वेळा मनात आत्महत्येचे विचार येणे हे तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजाराचे देखील लक्षण असते.

यामध्ये व्यक्तीला भास आणि भ्रम होत असतात. अशा वेळी उपचार हे तज्ज्ञाच्या थेट निगराणी खालीच होणे आवश्यक असते, हे पण आपण ध्यानात घ्यायला पाहिजे.

‘आत्महत्या करणे’ हे कमकुवत पणाचे लक्षण आहे, असे आपल्याकडे खोलवर रुजलेला आणखी एक गैरसमज आहे. सोशल मीडियावर अनेक लोक असे विचार व्यक्त करताना दिसतात. आपण हे समजून घेतले पाहिजे, की आत्महत्येचे विचार मनात येणे हे टोकाच्या भावनिक अस्वस्थतेचे लक्षण आहे.

ही अस्वस्थता कोणालाही अनुभवला येऊ शकते. आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन ही देखील आत्महत्या टाळण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट ठरू शकते. परिवर्तन संस्थेमार्फत चोवीस तास आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन (७४१२०४०३००) चालवली जाते.

नुकत्याच राज्य आणि केंद्र शासनाने देखील अशा हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करणे आवश्यक आहे. या मोफत हेल्पलाइन असून, यावरची माहिती गोपनीय ठेवली जाते.

मोकळेपणाने मदत मागूया आणि मदत करूया, हा विचार मनात बाळगला तर आपल्याला अनेक शेतकरी आत्महत्या थांबवता येतील असा विश्‍वास वाटतो.

(लेखक परिवर्तन संस्थेत मनोविकार तज्ज्ञ आहेत.)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com