Desi Cow Breeding : दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसपासून होते. याला गोवत्सद्वादशी सुद्धा म्हणतात. आपल्या संस्कृतीत गाय गोधन, गोमाता म्हणून पूजनीय आहे. वसुबारसेला गाय-वासराची पूजा केली जाते. प्राचीन काळापासून भारतीय समाज आणि ग्रामीण अर्थकारणामध्ये गोधनाचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, पंचगव्य आणि जमीन सुपीकतेसाठी शेणखताला महत्त्वाचे स्थान आहे. ‘देशी गोवंश’ ही भारतीय सांस्कृतिक ठेवण आहे.
भारताचा विचार केला तर दरवर्षी २३०.५८ दशलक्ष टन दूध उत्पादित होते. कृषी अन्न संघटनेच्या डेअरी मार्केट रिव्ह्यू - २०२३ अहवालानुसार २०२३-२४ मध्ये देशातील दूध उत्पादन २३६.३५ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २.५ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. दरडोई दुधाची उपलब्धता ४५९ ग्रॅम प्रति दिवस आहे. भारतामध्ये ४९ टक्के दूध म्हशींपासून, २७ टक्के दूध संकरित गाई आणि २० टक्के दूध देशी, गावठी गाईंपासून मिळते. तसेच तीन टक्के दूध हे शेळी आणि इतर पशुधनापासून १ टक्का दूध उत्पादित होते.
पशुपालनास शास्त्रीय पद्धतीची जोड दिली तर गाई, म्हशी, शेळीच्या दूध उत्पादनात अपेक्षित वाढ शक्य आहे. भारतीय गोवंशाला स्थानिक हवामानात जुळवून घेण्याची शक्ती निसर्गाने दिली आहे. याकडे जगभरातील पशुतज्ज्ञ भविष्यातील संशोधनाच्या दृष्टीने पाहत आहेत. सकस दूध देण्याची क्षमता, निकृष्ट दर्जाचा चारा पचविण्याची क्षमता, काही रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता यांसारखे गुणधर्म देशी गोवंशामध्ये आहेत. देशातील एकूण पन्नास देशी गोवंशापैकी महाराष्ट्राचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगरी पट्ट्यात डांगी, कोकणामध्ये कोकण कपिला, मराठवाड्यात देवणी, लाल कंधारी, विदर्भात गवळाऊ, कठाणी गोवंश प्रसिद्ध आहेत. अभ्यासू पशुपैदासकारांनी या जाती परंपरेने जपून ठेवल्या आहेत.
देशी गोवंश कमी दूध उत्पादन देणारा असला तरी स्थानिक हवामानात तग धरण्याच्या क्षमतेमुळे त्यांचे संवर्धन महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन देशी गोवंश संवर्धन करणाऱ्या पशुपालकांना तांत्रिक साह्य देऊन या विविध गोवंशाच्या गुणवत्तेत सुधारणा शक्य आहे. ज्यामुळे दूध उत्पादन क्षमता वाढेल आणि शाश्वत गोपालन साध्य होईल. जातिवंत पैदास, लिंग वर्गीकृत रेतमात्रा, भ्रूण प्रत्यारोपणातून जातिवंत पैदास गोठ्यात तयार करता येते.
त्यादृष्टीने राज्यातील प्रयोगशील पशुपालकांनी आश्वासक पावलेदेखील टाकली आहे. याचबरोबरीने माहिती तंत्रज्ञानाची जोड देखील आवश्यक आहे. तापमान आर्द्रता निर्देशांक प्रणालीचा वापर करून गोठ्यातील तापमान आणि आर्द्रता यांचा अभ्यास करून जनावरांतील उष्णतेमुळे होणाऱ्या ताणाचा परिणाम कमी करता येतो. आयओटी सेंसर्स वापरून जनावरांचे आरोग्य, आहार आणि प्रजनन स्थितीची नोंद ठेवता येते. आयओटी प्रणालीचा वापर करून दूध उत्पादनाची नोंद आणि अधिक उत्पादनासाठी उपाययोजना करणे सहज शक्य आहे. यामुळे देशी गोवंशाच्या जनुकीय गुणधर्मांचे संरक्षण होईल आणि त्यांची दूध उत्पादकता वाढेल.
केरळ राज्यात नामशेष होत चाललेल्या वेचुर गोवंश संवर्धनासाठी स्थानिक पशुपालकांचा वेचुर संवर्धन ट्रस्ट, केरळ स्थानिक गोपैदासकार संघटना कार्यरत आहे. कर्नाटक राज्यात कासारगोड ड्वार्फ कॉन्झर्व्हेशन सोसायटी, वाडकरा गोसंवर्धन ट्रस्टसारख्या संस्था स्थानिक गोवंशाचे संवर्धन करीत आहेत. महाराष्ट्रात खिलार, लाल कंधारी, गवळाऊ, देवणी गोवंशाचे पशुपैदासकार संघटनेच्या माध्यमातून चांगले संवर्धन झाले आहे. कोकण कपिला, डांगी गोवंश संवर्धनासाठी पशुपालकांचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्येक भागात स्थानिक गोधन संवर्धनासाठी सक्षम पशुपैदासकार संघटनांची लोकसहभागातून उभारणी ही काळाची गरज आहे. यासाठी कृषी विद्यापीठे, ‘माफसू’ आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाने पुढाकार घेतला पाहिजे.
शाश्वत शेती, रोजगाराची संधी
गीर, साहिवाल, ओंगोल गोवंशाची वातावरणात तग धरण्याची क्षमता, रोगप्रतिकार शक्ती या गुणांनी ब्राझील, केनिया, अर्जेंटिना, अमेरिका या देशांमधील पशूतज्ज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतात आढळणाऱ्या देशी गाईंमध्ये प्रामुख्याने साहिवाल, गीर, थारपारकर, राठी, लालसिंधी गोवंश दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. या गोवंशाची दररोज दूध उत्पादनाची एकूण सरासरी आठ ते नऊ लिटर आहे. शास्त्रोक्त पद्धतीने आपणास या दूध उत्पादनामध्ये वाढ करणे शक्य आहे. महाराष्ट्राचा विचार करता डांगी, लाल कंधारी, देवणी पशुपालकांनी शास्त्रीय पद्धतीने पैदास धोरणाचा अवलंब करून या देशी गाईंच्या दूध उत्पादनात वाढीत सातत्य ठेवले आहे.
पशुधनाच्या शाश्वत विकासासाठीचे धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे राजीव गांधी सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी प्रकल्पाच्या माध्यमातून देशी गोवंशावर वातावरण बदलामुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सुरू आहे. आता केवळ गोवंश संगोपन आणि दूध उत्पादन वाढ यावर न थांबता मानवी आणि पशू आरोग्य, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, सौर ऊर्जेवर आधारित डेअरी, उपचारात वनौषधींचा वापर, शेण-गोमूत्रापासून सेंद्रिय खत निर्मिती उद्योग, रसायन अंशमुक्त आरोग्यदायी दूध उत्पादन, भ्रूण प्रत्यारोपण, रक्तजल तपासणी, आरोग्य तपासणी, चारा उत्पादन आणि चारा प्रक्रिया इत्यादी विषयांबाबत पशुपालकांनी एकत्र येऊन लक्ष केंद्रित करावे. देशी गाईंच्या दुधाबरोबर तूप, पनीर, दही इत्यादी पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हे लक्षात घेता देशी गाईंचे आरोग्यदायी दूध, प्रक्रिया पदार्थाचे उत्पादन आणि विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ काही युवा पशुपालकांनी तयार देखील केली आहे.
जमिनीची सुपीकता, मानवी आरोग्याची जपणूक आणि ग्रामीण पातळीवर महिलांच्या लघू उद्योगासाठी देशी गोवंशाची चांगली साथ मिळू शकते. गोवंश संवर्धन हे शाश्वत शेती, रोजगार, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरणीय संतुलनाला जोडून घेणे काळाची गरज आहे. जमिनीची खालावत चाललेली सुपीकता, वाढते प्रदूषण हा पीक उत्पादन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने गंभीर विषय झाला आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण सेंद्रिय खतांची मागणी लक्षात घेता देशी गोवंशाच्या संगोपनाबरोबर गांडूळ खत, गोखूर खत, जिवामृत, दशपर्णी अर्क, गोमूत्र अर्कापासून कीडनाशके, विविध पिकांसाठी जैविक मिश्रण निर्मितीतून कौटुंबिक अर्थकारणास गती देता येईल. या दिशेने काही प्रमाणात प्रयत्न देखील सुरू झाले आहेत. तेव्हा आजच्या वसुबारस सणाचे औचित्य साधून देशातील सुजाण पिढीने देशी गोवंश संवर्धन आणि विकासाचा संकल्प करायला हवा.
(लेखक ‘ॲग्रोवन’चे मुख्य उपसंपादक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.